रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (08:16 IST)

रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून दिलं ट्रेनच्या फेऱ्या मोजण्याचे काम, लाखोंची फसवणूक

indian railway
हाताला काम नाही, काम नाही म्हणून प्रगती नाही अशा अगतिकतेत अडकलेल्या तरुणांना रेल्वे नोकरीसाठी प्रशिक्षण देत असल्याचं भासवत चक्क ट्रेन्स मोजण्याचं काम देण्यात आलं.नोकरी देण्याचं आमिष दाखवून या तरुणांकडून लाखो रुपये लुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली पोलीस या केसचा तपास करत असून, या घोटाळ्यात 28 तरुणांना दररोज किती ट्रेन्स येतात याची मोजदाद करायला लावल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
आपल्याला भारतीय रेल्वेत नोकरी मिळेल या आशेने या तरुणांनी हे काम केलं.
 
माजी लष्करी अधिकाऱ्याने नकळतपणे या तरुणांची कथित घोटाळे बहाद्दरांशी भेट घडवून दिली होती. या अधिकाऱ्यानेच पोलिसांना या घोटाळ्याची माहिती दिली.
 
नोकरीच्या शोधातील तरुणांनी कथित घोटाळेबहाद्दरांना 2,00,000 एवढी रक्कम दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
स्थानिक प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात दिलेल्या बातम्यांमधून याबाबतचा तपशील उघड झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळ्याची नोव्हेंबर महिन्यातच चौकशीला सुरुवात केली. पण याबाबतच्या गेल्या काही दिवसात समोर आल्या.
ही तरुण मंडळी तामिळनाडूची होती. कथित घोटाळेबहाद्दरांनी या तरुणांना नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर उभं राहून किती ट्रेन्स येतात आणि जातात याची मोजणी करायचं काम दिलं.
 
या तरुणांनी नोकरी मिळेल या विचाराने महिनाभर दररोज आठ तास खपून हे काम इमानेइतबारे केलं. पीटीआय वृत्तसंस्थेने यासंदर्भातली बातमी दिली आहे.
 
तिकीट तपासनीस, वाहतूक नियंत्रक तसंच कारकून म्हणून तुम्हाला काम मिळेल असं आश्वासन या तरुणांना देण्यात आलं होतं. जगभरात सर्वाधिक लोकांना रोजगार मिळवून देणाऱ्या आस्थापनांमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो.
 
कोव्हिड संकटानंतर घर चालवण्यासाठी नोकरी-व्यवसाय तसंच कामाच्या शोधात होतो. त्यामुळे हे काम स्वीकारलं असं एका तरुणाने सांगितलं.
“आम्ही दिल्लीला प्रशिक्षणासाठी गेलो. आम्हाला एकच काम होतं- ट्रेन्स मोजायच्या. हे काय काम असं आम्हालाही वाटलं. पण ज्याने आम्हाला हे काम दिलं तो आमच्या शेजाऱ्याचा चांगला मित्र होता. आम्ही काय करत होतो हे आठवून लाज वाटते,” असं या तरुणाने सांगितलं.
 
सुब्बुस्वामी या माजी लष्करी अधिकाऱ्याने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “तामिळनाडूतल्या विरुधनगर या परिसरातल्या तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न करतो. कोणत्याही आर्थिक लाभाच्या हेतूने मी हे करत नाही”, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.
 
सिवारामन नावाच्या माणसाशी माझी भेट झाली. राजकारणी, मंत्री यांच्याशी ओळखी असल्याने सरकारी नोकरी मिळवून देऊ शकतो असा दावा त्याने केला.
 
त्याने सुब्बूस्वामी आणि बाकी तरुणांची आणखी एका माणसाशी भेट घडवली. त्या माणसाने या तरुणांची खोटी वैद्यकीय चाचणीही घेतली. त्या माणसाने नंतर फोन घेणं बंद केल्याचं या तरुणांनी सांगितलं.
नोकरी मिळेल असा दावा करणाऱ्या घोटाळेबहाद्दरांना पैसे देण्याकरता काही लोकांकडून पैसे उसने घेतल्याचं या तरुणांनी सांगितलं.
 
नोकर भरती क्षेत्रात अनेक घोटाळे देशात उघडकीस येतात. कायमस्वरुपी आणि दर महिन्याला ठोस उत्पन्न मिळवून देणारी नोकरी ही असंख्य तरुणांची गरज असते. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली होती. रेल्वेत नोकरी लावून देतो असं आमीष त्या दोघांनी शेकडो तरुणांना दिलं होतं.

 Published By- Priya Dixit