शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2024 (09:33 IST)

विद्यापीठात वर्षातून दोनदा घेता येणार प्रवेश, UGCची घोषणा

भारतामध्ये जून - जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि एप्रिल - मे महिन्यात संपतं. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी UGCने दिलीय.
 
वर्षातून दोनदा अ‍ॅडमिशन्स होणार, म्हणजे नेमकं काय होणार? त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? युजीसीने नेमकं काय म्हटलंय?
 
विद्यापीठ अनुदान आयोग - UGC (University Grant Commission) ही संस्था देशातील विद्यापीठांतील शिक्षण, परीक्षा, संशोधन याविषयीचा दर्जा कायम राखण्याचं आणि त्यांच्यातला समन्वय साधणं, विद्यापीठांसाठीचे नियम - मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्याचं काम करते.
 
UGC ने काय निर्णय जाहीर केलाय?
देशातल्या विद्यापीठांना आता वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल असं विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलंय.
 
हा निर्णय विद्यार्थी आणि विद्यापीठं अशा दोघांनाही फायद्याचा ठरणार असल्याचं युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी म्हटलंय.
या निर्णयाविषयी सांगताना प्रा. एम. जगदीश कुमार म्हणाले, "भारतामध्ये सध्या आपली विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये वर्षातून एकदाच प्रवेश प्रक्रिया होते. जुलै किंवा ऑगस्टमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होतं आणि मे किंवा जूनमध्ये ते संपतं."
 
"पण भारतातली विद्यापीठं आणि कॉलेजांना वर्षातून दोनदा विद्यार्थ्यांना प्रवेश देता येण्याबद्दलचा निर्णय आम्ही आयोगाच्या गेल्या बैठकीत घेतला. त्यांना आताप्रमाणे जुलै-ऑगस्टमध्ये प्रवेश प्रक्रिया करता येईल आणि शिवाय त्यांना दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात दुसऱ्या बॅचचे प्रवेश करता येतील," जगदीश कुमार यांनी म्हटलं.
 
वर्षातून दोनदा प्रवेशाचे फायदे काय?
याविषयी बोलताना UGCचे अध्यक्ष सांगतात, "अनेक विद्यार्थ्यांची डमिशन जुलै-ऑगस्टमध्ये विविध कारणांमुळे चुकते वा होऊ शकत नाही. त्यांना आता संपूर्ण वर्ष वाट पहावी लागणार नाही. यातल्या काही कोर्सेससाठी जानेवारी महिन्यात प्रवेश घेण्याचा पर्याय त्यांच्याकडे असेल."
 
जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये सध्या वर्षातून दोनदा प्रवेशाची प्रक्रिया होते. म्हणजे अमेरिकेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फॉल (Fall) सीझनच्या अ‍ॅडमिशन्स होतात, तर जानेवारीमध्ये स्प्रिंग (Spring) सीझनच्या अ‍ॅडमिशन्स होतात.
 
वर्षातून दोनदा अ‍ॅडमिशन्स झाल्याने विद्यापीठांनाही त्यांच्याकडील टीचिंग लॅब, रिसर्च लॅब्ससारख्या पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून घेता येणार असल्याचं युजीसीने म्हटलंय.
 
यासोबतच भारतातील विद्यापीठांना जागतिक शैक्षणिक संस्थांशी सुसंगत प्रवेश प्रक्रिया पार पाडणं यामुळे शक्य होईल.
 
वर्षातून दोनदा प्रवेश झाले तर त्याचा फायदा इंडस्ट्रीलाही होणार असून, वर्षातून दोनदा कॅम्पस प्लेसमेंट होऊ शकतील असं जगदीश कुमार यांनी म्हटलंय.
 
यासोबतच यामुळे विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल, अधिकाधिक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील, असंही त्यांनी म्हटलंय.
 
कोणती विद्यापीठं वर्षातून दोनदा प्रवेश देणार?
जी विद्यापीठं आणि कॉलेजांकडे यासाठी गरजेच्या पायाभूत सुविधा आहेत, त्यासाठी लागणारा शिक्षक - सहायक वर्ग आहे आणि वर्षातून दोनदा अशा प्रकारचे प्रवेश देऊन कोर्सेस चालवण्याची क्षमता आहे, त्यांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया राबवता येतील.
 
त्यामुळेच विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा प्रवेश देणं हे विद्यापीठांसाठी बंधनकारक नसून याबाबतचा निर्णय विद्यापीठांनी घ्यायचा आहे.
ज्या विद्यापीठांना अशी वर्षातून दोनदा प्रक्रिया राबवायची आहे त्यांना आधी त्यांच्या धोरणांमध्ये बदल करून याचा स्वीकार करावा लागेल.
 
अ‍ॅकॅडमिक कौन्सिल, एक्झिक्युटिव्ह कौन्सिलने याचा स्वीकार करून संस्थात्मक नियम-धोरणांमध्ये बदल करावे लागतील.
वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याचा निर्णय झाल्यानंतर ही विद्यापीठं आणि कॉलेजेसना याविषयीची पुढील आखणी करावी लागेल.
दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रवेश घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते कोर्सेस उपलब्ध असणार, जुलै - ऑगस्ट आणि त्यानंतर जानेवारीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपक्रम कधी आणि कसे राबवणार यासाठीची आखणी करावी लागेल.

सोबतच कोर्स चालवण्यासाठी फॅकल्टी, स्टाफ यांची उपलब्धता, वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया राबवणारी यंत्रणा यागोष्टीही विचारात घ्याव्या लागतील.
यानंतरच याची अंमलबजावणी होऊ शकते.
 
Published By- Priya Dixit