केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
कोरोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिले जाणार आहे. पश्चिम बंगालमधील रॅलीमध्ये बोलत असताना शहा यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करत आता त्यांची वेळ संपली असल्याचे म्हटले.
दीदींची वेळ संपली आहे. बंगाल निवडणूक संपेपर्यंत ममता दीदी जय श्रीराम' म्हणतील हे माझे आश्वासन आहे. भाजपच्या नेतृत्वात पुढील सरकार स्थापन होईल. मी शंतनू ठाकूर यांना आश्वासन दिले आहे की, मी येथे येऊन सीएएसंबंधी सर्व शंका दूर करणार आहे, असे शहा यांनी यावेळी सांगितले.
शहा यांनी यावेळी आयुष्यमान योजना लागू केली जाणार असल्याचे आश्वासन देत शेतकर्यांना वार्षिक थकबाकी व्यतिरिक्त सहा हजारांची मदत केली जाईल असे सांगितले. पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर केंद्र सरकार शरणार्थी कल्याण योजना' राबवणार आहे असेही ते म्हणाले.