शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 जानेवारी 2022 (15:20 IST)

उत्तर प्रदेश निवडणूक भाजप: योगी आदित्यनाथ गोरखपूरमधूनच लढणार, भाजपचा निर्णय

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या गोरखपूर शहर मतदारसंघातूनच उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे.
 
तर, "योगी आदित्यनाथ हे कधी मथुरा, कधी अयोध्या, कधी प्रयागराज तर कधी देवबंदमधून लढतील, असं सांगितलं जात होतं. पण, भाजपनं त्यांना त्यांच्या घरी (गोरखपूर) परत पाठवलं आहे. आता त्यांना गोरखपूरमध्येच राहावं लागेल. जनतेनं परत पाठवायच्या आधीच भाजपनं त्यांना परत पाठवलं आहे," असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
 
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपनं आज 107 उमेदवारांची यादी जारी केली आहे. यात विद्यमान 83 आमदारांपैकी 63 आमदारांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर 20 जणांना तिकीट नाकारण्यात आलं आहे.
 
यावर बोलताना अखिलेश यादव म्हणाले, "आता भाजपनं ज्यांचं तिकीट कापलंय, त्यांना आपण समाजवादी पक्षात प्रवेश देणार नाही."
 
दरम्यान, भाजपचे उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या परिषदेत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
 
धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं, "भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत दोन प्रमुख निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर येथून उमेदवार असतील. तर केशवप्रसाद मौर्य प्रयागराज जिल्हातील सिरथू येथून उमेदवार असतील."
 
प्रधान यांच्या घोषणेनंतर योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार या चर्चांवर आता पडदा पडला आहे.
 
403 जागांच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप 300 हून अधिक ठिकाणी यश मिळवेल, असा विश्वास धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला.
 
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले, "या निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे. 2014मध्ये लोकांनी केंद्रात नरेंद्र मोदी यांना संधी दिली. तेव्हा आमचे सरकार देशाचे गरीब, दलित, वंचितांसाठी कार्यरत राहिल, सर्वांबरोबर काम करणारं सरकार देऊ असं मोदींनी सांगितलं होतं. गरीब कल्याणाबद्दल एक नवा विश्वास मोदी यांच्या सरकारमुळे समोर आला."
 
"तसंच, योगी आदित्यनाथ सरकारने गेल्या पाच वर्षात गुंडांच्या, भ्रष्टाचारी लोकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या पाच वर्षात दंगामुक्त शासन योगीजींनी दिले आहे. नवी वैद्यकीय कॉलेजेस, महाविद्यालयं, रस्ते बांधणी, विमानतळं होत आहेत. गेल्या पाच वर्षांत आम्ही कल्याणकारी, सर्वमान्य सरकार दिले आहे. आम्हाला पुन्हा एकदा यश मिळेल."
 
या पत्रकार परिषदेत योगी आदित्यनाथ, केशवप्रसाद मौर्य यांच्या उमेदवारीसह इतर पहिल्या दोन टप्प्यातील 95 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
 
योगी आदित्यनाथ यांचा आजवरचा प्रवास
'यदा यदा हि योगी' हे योगी आदित्यनाथांच्या जीवनावरचं पुस्तक विजय त्रिवेदी यांनी लिहिलं आहे. 1972मध्ये गढवाल नावाच्या गावी योगी यांचा जन्म झाला. अजय मोहन बिष्ट म्हणजे योगींचा सुरुवातीपासूनच कल राजकारणाकडे होता.
 
अजय बिष्ट यांना महाविद्यालयीन दशेत फॅशनेबल, चमकदार, तंग कपडे आणि डोळ्याला गॉगल्स लावण्याचा शौक होता. 1994 मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ते योगी आदित्यनाथ झाले.
 
ते लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचे. महाविद्यालयात असताना छात्रसंघाच्या निवडणुका लढवू इच्छित होते मात्र अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेनं त्यांना तिकीट दिलं नाही. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली पण ते हरले.
 
अजय बिश्त यांनी बीएसस्सीचं शिक्षण गढवालमधल्या श्रीनगर इथल्या हेमवती नंदन बहुगुणा विदयापीठातून पूर्ण केलं आहे.
 
निवडणूक हरल्यानंतर काही महिन्यातच जानेवारी 1992 रोजी बिश्त यांच्या घरी चोरी झाली. यामध्ये एमएससी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रंही गेली. प्रवेशासंदर्भात मदत मागण्यासाठी बिश्त पहिल्यांदा महंत अवैद्यनाथ यांना भेटले. दोन वर्षाच्या आतच त्यांनी दीक्षा घेतली. महंत अवैद्यनाथ यांचे उत्तराधिकारीही झाले.
 
दीक्षा घेतल्यानंतर फक्त नाव बदलत नाही तर आधीच्या आयुष्याशी असलेले पाश तोडून टाकले जातात. 2020 मध्ये आजारी असल्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी योगी यांनी एक वक्तव्य जारी केलं होतं. कोरोना संकटाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन राबवण्यासाठी मी वडिलांच्या अंत्यसंस्कार विधींना उपस्थित राहणार नाही असं मुख्यमंत्री योगींनी म्हटलं होतं.
 
दीक्षा घेतल्यानंतर आदित्यनाथ योगी यांनी अधिकृत दस्तावेजांमध्ये वडिलांच्या नावाच्या रकान्याठिकाणी आनंद बिश्त यांच्याऐवजी महंत अवैद्यनाथ यांचं नाव लिहायला सुरुवात केली. महंत अवैद्यनाथ राम मंदिर आंदोलनाचा चेहरा होते. गोरखपूरचे खासदार म्हणून ते चारवेळा निवडून आले होते. गोरखपूर मंदिराचे ते महंत होते.
 
गोरखनाथ मंदिर आणि सत्तेचं जुनं नातं आहे. महंत अवैद्यनाथ यांच्या आधी महंत दिग्विजय नाथ यांनी हे ठिकाण राजकारणाचं प्रमुख केंद्र म्हणून नावारुपाला आणलं. तेही गोरखपूरचे खासदार होते.
 
1950 मध्ये महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस झाल्यानंतर ते म्हणाले, त्यांचा पक्ष सत्तेत आला तर पाच ते दहा वर्षांसाठी मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतील. सरकार भारताच्या हिताचं आहे हे दाखवून देण्यासाठी ते असं करणार होते.
 
नाथ संप्रदायाचं सनातनीकरण
ऐतिहासिकदृष्ट्या बघितलं तर नाथ संप्रदायात हिंदू आणि मुस्लीम असा भेदभाव केला जात नाही. मूर्तीपूजाही केली जात नाही. एकेश्वरवादी नाथ संप्रदाय अदैतावर विश्वास ठेवतात. त्यांच्या मते ईश्वर एकच आहे. त्याचा अंश सर्वांमध्ये आहे. आत्मा आणि परमात्म्याला ते वेगवेगळं मानत नाहीत.
 
मुघल शासक जहांगीर यांच्या कार्यकाळात एका कवीने लिहिलेल्या चित्रावलीत गोरखपूरचा उल्लेख आढळतो. 16व्या शतकातील या रचनेत गोरखपूरला योगींचा भला देश असं म्हटलं आहे.
 
सध्याच्या गोरखनाथ मंदिराबाहेरच्या ओळीही हेच सूचित करतात- हिंदू ध्यावे देहुरा, मुसलमान मसीत/ जोगी ध्यावे परम पद, जहां देहुरा ना मसीत.
 
याचा अर्थ होतो- हिंदू मंदिरात तर मुस्लीम मशिदीत प्रार्थना करतात. पण योगी त्या परमात्म्याला साद घालतात तो मंदिरातही नाही आणि मशिदीतही नाही.
 
गोरखपूरचे पत्रकार मनोज सिंह यांच्या मते महंत दिग्विजय नाथ यांच्या कार्यकाळात पीठाचं सनातनीकरण व्हायला सुरुवात झाली. मूर्ती पूजा सुरू झाली आणि राजकीयीकरणही सुरू झालं.
 
धार्मिक पुस्तकांचं प्रकाशन करणारे गोरखपूरस्थित गीता प्रेस वर पुस्तक गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया मध्ये लेखक पत्रकार अक्षय मुकुल, गोरखनाथ मंदिराशी त्यांच्याशी असलेले घट्ट ऋणानुबंधाविषयी लिहिलं आहे.
गीता प्रेसतर्फे प्रकाशित साहित्यामध्ये गोहत्या, हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा तयार करणं, हिंदू कोड बिल, संविधान धर्मनिरपेक्ष होणे वगैरे गोष्टींवर हिंदूचं मत तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये राजकीय क्षेत्रात सक्रिय मंदिरातील महंतांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 
नोव्हेंबर 2019 मध्ये अयोध्या मंदिर-मशीद वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटर हँडलवरून एक फोटो शेअर केला. रामशीळेसह गोरखनाथ मंदिराचे माजी महंत दिग्विजयनाथ, अवैद्यनाथ आणि परमहंस रामचंद्र दास त्या फोटोत होते.
 
फोटोला कॅप्शन होती- "गोरक्षपीठाधीश्वर युगपुरुष ब्रह्मलीन महंत दिग्विजयनाथ जी महाराज, परम पूज्य गुरुदेव गोरक्षपीठाधीश्वर ब्रह्मलीन महंत अवैद्यनाथ जी, महाराज आणि परमहंस रामचंद्र दास जी महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली"
 
2020 मध्ये अयोध्या इथे राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम योगी आदित्यनाथ यांच्या देखरेखीत पार पडला होता.
 
गोरखपूरहूनच मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास
1994 मध्ये महंत अवैद्यनाथ यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ झाल्यानंतर अजय बिष्ट यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. योगी आदित्यनाथ झाल्यानंतर त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवणं साहजिक होतं.
 
पाच वर्षांनंतर 26व्या वर्षी योगी आदित्यनाथ गोरखपूरचे खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांनी केवळ 6000 मतांनीच विजय मिळवला होता.
 
मनोज सिंह सांगतात, "त्यावेळी त्यांनी ठरवलं की भाजप पक्षाव्यतिरिक्त स्वतंत्र पाठिंबा हवा. यासाठी त्यांनी हिंदू युवा वाहिनी नावाची संघटना सुरू केली. वरकरणी ही सांस्कृतिक संघटना दिसत असली तरी प्रत्यक्षात ही योगींची सेना होती".
 
ते सांगतात, "हिंदू युवा वाहिनीचं कथित उद्दिष्टं होती ती म्हणजे धर्माचं रक्षण करणे, धार्मिक तणाव असतानाच्या काळात या संघटनेची स्थापना झाली होती. या संघटनेचं नेतृत्व करत असताना 2007 मध्ये योगी आदित्यनाथांना अटक झाली होती".
 
11 दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं. दहा वर्ष या केससंदर्भात कोणत्याही सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. 2017 मध्ये योगी आदित्यनाथ सत्तेत आले तेव्हा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गृह मंत्रालयाने सीबीसीआईडीला केस चालवण्याची परवानगी दिली नाही.
 
2014 मध्ये योगी आदित्यनाथांनी निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यानुसार त्यांच्या नावावर दाखल गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमं त्यांच्या नावावर लावण्यात आली आहेत.
 
डिसेंबर 2017 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने कायद्यात सुधारणा केली ज्याद्वारे राजकारण्यांविरोधात राजकीय हेतूने प्रेरित खटले मागे घेता येऊ शकतील. कुठले खटले राजकीय हेतूने प्रेरित आहेत हे ठरवण्याचा अधिकार सरकारने स्वत:कडे ठेवला.
 
हिंदू युवा वाहिनीने खासदार योगी आदित्यनाथ यांना बळकट केलं. नेता म्हणून त्यांची छाप गोरखपूरपल्याडही उमटली.
 
पूर्व उत्तर प्रदेशात हिंदू युवा वाहिनीच्या लोकांना तिकीट मिळावं यासाठी ते अडून बसत. भाजपने मानलं नाही तर त्या उमेदवाराविरोधात युवा वाहिनीचा उमेदवार उभा करायलाही ते मागे पुढे पाहत नसत.
 
मुख्यमंत्री झाल्यावरही पक्षासमोर आपलं म्हणणं ठामपणे मांडण्यात ते कधीही मागे हटले नाहीत. हिंदुत्वाच्या विचारधारेवर फोफावलेली लोकप्रियता आणि समर्थकांची ताकद हे यामागचं कारण आहे असं सबा नकवी यांना वाटतं.
 
त्या सांगतात, "असा पक्ष जो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नियंत्रणात आहे तिथे आदित्यनाथ आपलं म्हणणं मांडू शकतात, ते कोणत्याही नेत्याचे शागीर्द वगैरे नाहीत.
 
अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहजतेने बाजूला करण्यात आलं. पण योगी आदित्यनाथ यांना धक्का लावण्यात आला नाही. कारण इतक्या महत्त्वाच्या राज्याच्या प्रमुखपदावरच्या व्यक्तीला बाजूला करून कोणाला बसवणार"?
 
मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतल्याने कठोर प्रशासक म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. सिद्धार्थ कलहंस सांगतात, "हार्ड टास्कमास्टर म्हणून लोक त्यांना ओळखू लागले. त्यांच्या कलाने काम करावं लागेल हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. नाहीतर काम करता येणार नाही".
 
विजय त्रिवेदी यांच्या मते, केवळ निर्णय घेणं हा मुद्दा नाही, पुढच्या बैठकीत त्या निर्णयाचा पाठपुरावा करणं, काम झालं नसेल तर आवश्यक कार्यवाही किंवा कारवाई करणं ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कार्यपद्धती आहे.
 
पंतप्रधान मोदी यांचे उत्तराधिकारी?
योगी आदित्यनाथ यांची राजकीय ताकद एवढी वाढली आहे का की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी होऊ शकतील?
 
सबा नकवी यांना तसं वाटत नाही. त्यांच्या मते, "एक नेता म्हणून नरेंद्र मोदी यांच्यासमोर योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा लहानशी आहे. राजकारणात आगेकूच करण्यासाठी सहमतीची प्रक्रिया राबवणे तसंच कॉर्पोरेट जगताशी ताळमेळ साधणे हे गुण योगींकडे नाहीत.
 
जनतेत समर्थकांची फौज निर्माण केल्यानंतरही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची प्रशासकीय कार्यशैली लोकप्रिय नाही".
 
राज्य चालवण्याच्या आधी ते गोरखनाथ मंदिराच्या अंतर्गत अनेक शाळा, रुग्णालयं, अन्य संस्था-संघटनांचं नेतृत्व करत होते.
 
मनोज सिंह सांगतात, "मंदिराची उभारणी सरंजामशाही पद्धतीने करण्यात आली. सगळी सूत्रं योगी आदित्यनाथ यांच्या हाती होती. ते सरकारही अशाच पद्धतीने चालवतात. आमदार दूर राहिले, मंत्रीदेखील स्वत:चं म्हणणं सांगू शकत नाहीत".
 
विजय त्रिवेदी यांच्या मते, "योगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या आहेत. रणनीतींचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करणं, एकट्याने सरकार चालवणं, माध्यमांवर नियंत्रण ठेवणं या त्यापैकीच काही".
 
हिंदुत्वाच्या बरोबरीने विकासाच्या मुद्यावर योगी काम करू शकलेले नाहीत.
 
हे तेव्हा जेव्हा योगींनी माध्यमांचं स्वतंत्र दळ उभारलं आहे. लखनौ आणि गोरखपूरमध्ये स्वतंत्र चमू काम करतात. सरकारच्या बरोबरीने बाहेरच्या एजन्सीना कामाला लावण्यात आलं आहे.
 
तीन माध्यम सल्लागार आहेत. वृत्तपत्रं, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया या तीन प्रकारांसाठी स्वतंत्र मजकूर तयार होतो.
 
लखनौस्थित सिद्धार्थ कलहंस सांगतात, "आधीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर जाहिराती छापल्या तसंच प्रसारित केल्या जात आहेत. टेलिव्हिजन वाहिन्यांवर सरकारने केलेल्या कामांची महती दाखवणारे माहितीपट प्रसारित केले जात आहेत".