बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (22:15 IST)

उत्तर प्रदेश : जीन्स घातली म्हणून 17 वर्षांच्या तरुणीची हत्या, काय आहे हे प्रकरण?

राजेश कुमार आर्य
नेहा पासवान 17 वर्षांची होती. ती नववीत जाणार होती. शिक्षण पूर्ण करुन तिला पोलीस अधिकारी बनायचं होतं. पण तिचं हे स्वप्न तिच्याबरोबरच संपुष्टात आलं.
 
20 जुलैला तिचा मृतदेह तिच्या घरापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावरच्या एका पुलावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
 
नेहाच्या आई शकुंतला देवी यांनी आजोबा-आजी आणि काका-काकू यांच्यावर आरोप केला आहे. नेहा जीन्स परिधान करणं बंद करत नव्हती म्हणून त्यांनी तिला मारून-मारून तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केलाय.
 
हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्याच्या महुआडीह परिसरातील सवरेजी खर्ग गावातील आहे. या गावात राहणाऱ्या अमरनाथ पासवान यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. त्यापैकी नेहा तिसऱ्या क्रमांकाची मुलगी. अमरनाथ पासवान लुधियानामध्ये मजुरीचं काम करतात. घटना घडली त्यादिवशीही ते लुधियानामध्येच होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घरी पोहोचले.
 
घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं हे आम्ही नेहाच्या आई शकुंतला देवी यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
"नेहाचा सोमवारचा उपवास होता. तिनं सकाळी पूजा केली होती. सायंकाळी आंघोळीनंतर जीन्स टॉप परिधान केला आणि परत पुजा केली. पुजेच्या वेळी कोणी काही म्हटलं नाही. पण नंतर आजी-आजोबा आणि काका-काकू यांनी तिच्या जीन्स परिधान करण्यावर आक्षेप घेतला.
 
"त्यावर जीन्स परिधान करण्यासाठीच तयार केली आहे, त्यामुळं मला ती वापरायची आहे. मला शिकायचं आहे, समाजात राहायचं आहे, असं नेहानं म्हटलं," अशी माहिती शकुंतला देवी यांनी दिली.
 
"नेहाचं उत्तर ऐकल्यानंतर तिचे आजी-आजोबा तिला जीन्सही परिधान करू देणार नाही आणि शिकूही देणार नाही, असं म्हणाले. त्यानंतर आजी-आजोबा आणि काका-काकू यांनी तिला मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला," असंही त्यांनी सांगितलं.
 
नेहाला मारहाण केल्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानं रुग्णालयात नेत असल्याचं सासू-सासरे आणि दीर तसंच जावांनी सांगितलं, असं शकुंतला देवी म्हणाल्या.
 
नदीवरच्या पुलावर मिळाला मृतदेह
"त्या सर्वांनी नेहाला रुग्णालयात नेण्यासाठी ज्या पद्धतीनं रिक्षामध्ये टाकलं, त्यावरून तिचा मृत्यू झाला आहे, असं मला वाटलं, " असंही त्यांनी सांगितलं.
 
शकुंतला देवी यांनी तीन वेळा रिक्षात बसून मुलीसोबत जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना रिक्षात बसू दिलं नाही आणि ते सगळे रिक्षा घेऊन निघून गेले, असंही त्या म्हणाल्या.
 
ते चौघं घरी आले. नेहा रुग्णालयात दाखल असून, ती आता ठीक आहे असं त्यांनी शकुंतला देवी यांना सांगितलं. मात्र डॉक्टरांनी बोलायचं नाही असं सांगितल्याचंही ते म्हणाले.
त्यानंतर शकुंतला देवी यांनी त्यांच्या नातेवाईकांना या घटनेबाबत माहिती दिली. नातेवाईक आले आणि नेहाला पाहण्यासाठी देवरियाच्या जिल्हा रुग्णालयात गेले. पण तिथे ती नव्हती.
 
मंगळवारी सकाळी त्यांना कळलं की, गंडक नदीवर तयार करण्यात आलेल्या पटनवा पुलावर एका तरुणीचा मृतदेह लटकत आहे. शकुंतला देवींच्या नातेवाईकांनी जाऊन पाहिलं, तर तो नेहाचाच मृतदेह होता.
 
नेहाचा मृतदेह नदीत फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण तिचा एक पाय पुलामध्ये अडकला, असा आरोप नेहाच्या नातेवाईकांनी केला आहे.
 
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नेहाचा मृतदेह काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पण तिच्या कुटुंबाला अजूनही पोस्टमार्टम रिपोर्टची प्रत मिळालेली नाही.
 
शकुंतला देवी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नेहाचे आजोबा परमहंस पासवान, आजी भगना देवी, काका व्यास पासवान आणि काकू गुड्डी देवी, काका अरविंद पासवान आणि काकू पुजा देवी, चुलत भाऊ, राहुल पासवान आणि पन्नेलाल पासवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
एफआयआरमध्ये अरविंद पासवान यांचे मित्र राजू यादव आणि रिक्षाचालक हसनैन यांच्या नावांचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 147, 302 आणि 201 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
"या प्रकरणात पोलिसांनी आजोबा-आजी आणि एका काकाला ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे,'' असं पोलिस उप-अधीक्षक श्रीयश त्रिपाठी यांनी बीबीसी हिंदीबरोबर बोलताना सांगितलं.
 
10 जणांच्या विरोधात आरोप
ही हत्या जीन्स परिधान करण्याच्या कारणावरून झाली का, असा थेट सवाल आम्ही पोलिस उप-अधीक्षकांना केला.
 
त्यावर "मंगळवारी सकाळी आम्ही मुलीच्या आईशी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला असं काही सांगितलं नव्हतं. त्यावेळी त्यांनी धुतलेले कपडे वाळत घालण्यावरून वाद झाल्याचं सांगितलं. पण त्याचदिवशी सायंकाळी त्यांनी लेखी तक्रार दिली तेव्हा जीन्स परिधान करण्यावरून वाद झाल्याचं सांगितलं. त्यांच्या तक्रारीवरून महुआडीह पोलिसांनी 10 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे," असं त्यांनी सांगितलं.
 
तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
नेहाचे वडील अमरनाथ दगडांना पॉलिश करायचं काम करायचे. सहा महिन्यांपासून ते पंजाबच्या लुधियानामध्ये काम करत होते. त्यापूर्वी ते दिल्लीत काम करायचे.
 
अमरनाथ यांची सर्वात मोठी मुलगा निशा ही ग्रॅज्युएट आहे. ती घरी राहूनच शिलाई काम करते आणि कुटुंबाला हातभार लावते. निशापेक्षा छोटा भाऊ विशाल पासवान गुजरातच्या बडोद्यात रंगकाम करतो. तर सर्वांत लहान विवेक पासवान सातव्या वर्गात शिकतो.
नेहा आणि विवेक घरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरील श्रीमती शांती देवी उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत होते. नेहानं आठवीची परीक्षा दिली होती आणि ती नववीत जाणार होती.
 
"शिकून मोठी झाल्यावर पोलीस अधिकारी बनून कुटुंबासमोरच्या अडचणी दूर करेल, असं नेहा म्हणायची. पण तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही," असं शकुंतला देवी म्हणाल्या.
 
नेहाचे वडील अमरनाथ पासवान चार भाऊ आणि तीन बहिणींमध्ये सर्वात मोठे आहेत. त्यांचं कुटुंब मोडकळीला आलेल्या एका घरात राहतं. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कुटुंबाकडे अवघी एक बिघा (जमीन मोजण्याचं एक परिमाण) शेत जमीन असून ती त्यांच्या आई वडिलांच्या नावावर आहे.
 
शकुंतला देवी यांचे पती अमरनाथ पासवान यांनी मजुरी करून मुलांचं शिक्षण केल्याचं सांगितलं.
मुलांना शिक्षणासाठी किंवा काय परिधान करावं काय नाही, यासाठी कधीही अडवलं नाही, असं ते म्हणतात. मुलांनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे.
 
त्यांच्या वडिलांनी कधी मुलांच्या कपड्यांवरून किंवा इतर कशाची तक्रार केली का? असं आम्ही त्यांना विचारलं. त्यावर "माझ्या वडिलांनी कधीच मुलांच्या कोणत्याही गोष्टीची तक्रार केली नाही, असं त्यांनी सांगितलं."
 
मात्र शकुंतला देवी यांनी त्यांचे सासरचे लोक अनेक दिवसांपासून मुलांना त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी तिथं राहू नये, असंच सासरच्या मंडळींना वाटत होतं, असंही त्या म्हणाल्या. शकुंतला यांच्या बहिणीचा मुलगा अजय पासवान यानंही तसंच म्हटलं आहे.
 
गावात स्मशान शांतता
पोस्टमॉर्टमनंतर नेहाचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा, देह गाडीतून बाहेर काढण्यासाठी केवळ एकजण पुढं आला. दुसरं कोणीही आलं नाही, असं अजय पासवान यांनी सांगितलं.
 
नेहाचा मृतदेह अंत्य संस्कारासाठी नेला जात होता, तेव्हा गावकऱ्यांनी त्याचाही विरोध केला. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पोहोचले आणि सुरक्षा व्यवस्थेत तिच्या पार्थिवावर अंत्य संस्कार झाले, असंही अजय म्हणाले.
या प्रकरणी गावातील कोणीही काहीही बोलायला तयार नाही. गावचे प्रमुख (प्रधान) राजू राव गावात नव्हते आणि त्यांच्याशी फोनद्वारेही संपर्क होऊ शकला नाही.
 
माझी मुलगी तर या जगातून गेली आता आरोपींना फाशी व्हावी असं वाटत नसल्याचं शकुंतला देवी म्हणाल्या. आरोपींना या प्रकरणात जन्मठेप व्हावी आणि ते मरेपर्यंत तुरुंगात राहावे अशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
मी नेहाच्या घराकडं जात होतो, तेव्हा रस्त्यात तिची शाळाही दिसली. त्यावर 'पढी लिखी लडकी, रोशनी है घर की' असं लिहिलेलं होतं. नेहादेखील तिच्या कुटुंबासाठी अंधकारातला असाच 'रोशनी'चा किरण ठरली असती.