बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 28 ऑगस्ट 2022 (12:59 IST)

राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून गांधीजी आणि चंद्रशेखर यांच्या पंक्तीत सामील होतील?

"ना मला शंकराचार्य बनायचंय ना विनोबा भावे. ही यात्रा निश्चितच राजकीय आहे, पण मला ही यात्रा पारंपरिक राजकारणापासून वेगळी ठेवायची आहे. मला असं वाटतं की ज्या सामान्य लोकांना बदल हवाय त्यांच्यासाठी ही यात्रा आहे. या पदयात्रेसाठी मी लेखी निवेदन दिलंय, सर्व राजकीय पक्षांशी संपर्क साधलाय. मला वाटतं की ही पदयात्रा कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित राहू नये."
 
ही चर्चा आहे भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर आणि ज्येष्ठ पत्रकार उदयन शर्मा यांच्यातली. 1983 साली चंद्रशेखर यांनी जी पदयात्रा काढली होती त्याविषयी त्यांनी शर्मांना मुलाखत दिली होती.
 
चंद्रशेखर यांची ही पदयात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली तेव्हा सलग चार दिवस उदयन शर्मा त्यांच्यासोबत होते. त्यांनी ही पदयात्रा कव्हर केली होती.
 
बघायला गेलं तर चंद्रशेखर यांनी 1962 मध्येच राज्यसभेत एन्ट्री केली होती. त्यांनी पदयात्रेची घोषणा केली तेव्हा ते एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष होते.
 
त्यांच्या या पदयात्रेची अनेकांनी खिल्लीही उडवली. विशेष म्हणजे यात त्यांच्याही पक्षाचे अनेक लोक सामील होते.
 
त्यांच्या या पदयात्रेवर अनेक आरोप झाले. त्यांना पक्षापेक्षा आपली प्रतिमा मोठी करायची आहे असं सुद्धा बोललं गेलं. त्यांच्याच पक्षातील अनेकांचं म्हणणं होतं की ते पक्षापेक्षा जास्त स्वतःला महत्व देतात. पण चंद्रशेखर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना ज्या गोष्टी समजावू शकले नाहीत त्याच गोष्टी भारताला समजावायला ते बाहेर पडले आणि त्यांनी पाणी, कुपोषण, आरोग्य अशा पाच मुद्द्यांना धरून पदयात्रा काढली. आजही या पदयात्रेच राजकीय महत्त्व अबाधित आहे.
 
त्यांनी काढलेल्या पदयात्रेनंतर बरोबर सात वर्षांनी म्हणजेच 1990 मध्ये ते भारताचे पंतप्रधान झाले. पण या पदयात्रेमुळे त्यांना पंतप्रधान होण्यात काही हातभार लागला का? आजही यावर चर्चा झडतच असतात.
 
चंद्रशेखर यांनी लावलेल्या तर्काप्रमाणे भारताच्या 90 कोटी (1983) लोकसंख्येपैकी 17 कोटी लोकसंख्या पदयात्री आहे. ना त्यांच्याकडे सायकल आहे ना बस.
 
पण आज अचानक चंद्रशेखर यांच्या पदयात्रेची आठवण काढायचं कारण काय?
 
आता भारताचा पायी दौरा करण्याची एक संकल्पना पुढे आली आहे. काँग्रेसने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत 'भारत जोडो' नावाची पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. ही पदयात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू होणार असून या यात्रेचं मुख्य आकर्षण आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी.
 
त्यामुळे भारतात अशा कित्येक पदयात्रा झाल्यात त्यांचा इतिहास पाहणं क्रमप्राप्त ठरतं आहे.
 
पण हा इतिहास बघण्याआधी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर एक नजर मारुया..
 
भारत जोडो यात्रा
हल्लीच झालेल्या काँग्रेसच्या उदयपूर अधिवेशनात 'भारत जोडो' यात्रा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी करणार असल्याचं निश्चित झालंय. ही यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता कन्याकुमारीतून सुरू होईल आणि तब्बल 150 दिवसांनी काश्मीर मध्ये जाऊन तिचा शेवट होईल.
 
'मिले कदम, जुडे वतन' ही भारत जोडो यात्रेची टॅगलाईन आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून 3570 किलोमीटर अंतर कापण्यात येईल.
 
या पदयात्रेत दररोज सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तासात 20 किलोमीटर अंतर पायी कापण्यात येईल. ही यात्रा 12 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून काढण्यात येईल.
 
या प्रवासात तीन प्रकारच्या पादचाऱ्यांचा समावेश असेल.
 
 
या पदयात्रेतील 100 लोक असे असतील ज्यांना 'भारत यात्री' म्हणून ओळखलं जाईल. हे यात्री प्रवासात सुरुवातीपासून शेवटपर्यंत असतील. राहुल गांधीही यामध्येच असतील.
 
तर 100 अतिथी यात्री असतील. हे यात्री अशा राज्यातून असतील जिथे ही यात्रा जाणार नाहीये.
 
100 प्रदेश यात्री असतील ज्यांच्या राज्यातून ही यात्रा पुढे जाईल.
 
अशा प्रकारे या पदयात्रेत एकावेळी एकूण 300 पदयात्री सहभागी होणार आहेत.
 
या यात्रेकरूंच्या मुक्कामासाठी विविध प्रकारच्या कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. यातच त्यांच्या झोपण्याची, जेवणाची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
भारत जोडो यात्रेची नेमकी गरज का?
या पदयात्रेचं महत्त्व सांगताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, "या यात्रेच्या माध्यमातून, भारतामध्ये फोफावणारी आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय तणाव बाजूला सारून भारत एकसंध करण्याचा प्रयत्न केला जाईल."
 
या तीन मुद्द्यांवर सविस्तर माहिती देताना ते म्हणाले, "भारतात महागाई, बेरोजगारी, जीएसटीमुळे आर्थिक विषमता आली आहे. देशात जात, धर्म, भाषा, खाद्यपदार्थ, पेहरावावरून सामाजिक ध्रुवीकरण होतय. तर तपास यंत्रणांच्या गैरवापरामुळे केंद्र आणि राज्यांमध्ये दुरावा निर्माण होतोय."
 
मात्र, काँग्रेसच्या या पदयात्रेचं राजकीय महत्त्वही सांगितलं जातं आहे फक्त दोन राज्यात स्वतःच तर दोन राज्यात आघाडीचे सरकार राहिलं असताना काँग्रेसने ही पदयात्रा काढली आहे.
 
2014 ते 2022 या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या 49 निवडणुका झाल्या, त्यापैकी 39 निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे.
 
आता तर काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबतही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
 
सप्टेंबर महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार होती. मात्र आता या महिन्यातच पदयात्रा काढण्यात येणार आहे.
 
शिवाय 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात लढण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांकडून रोज नवनवीन नावं पुढं आणली जात आहेत.
 
तेच दुसरीकडे विरोधकांच्या ऐक्यामध्ये फूट पडल्याच्या बातम्याही दर आठवड्याला येत असतात.
 
त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्या नजराही राहुल गांधींच्या या पदयात्रेकडे रोखल्या आहेत. काँग्रेसलाही याची जाणीव आहे.
 
त्यामुळे काँग्रेस या पदयात्रेत पक्षाचा झेंडा न घेता तिरंगा घेऊन जाईल. या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी लोहियावादी, डावे, समाजवादी, काँग्रेसचे हितचिंतक आणि सामान्य लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
 
ज्याप्रमाणे चंद्रशेखर यांनी आपली पदयात्रा सर्वांसाठी खुली ठेवली होती अगदी त्याचप्रमाणे काँग्रेसनेही पर्याय खुला ठेवलाय. इतर राजकीय पक्षही या पदयात्रेत सामील होऊ शकतात.
 
विशेष म्हणजे राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेदरम्यान काही राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार असून संसदेचं अधिवेशनही चालणार आहे.
 
या पदयात्रेत राहुल गांधी भारत यात्री गटात आहेत. त्यामुळे ते आता निवडणूक प्रचार आणि संसदेच्या कार्यक्रमात सहभागी होणार का? हे पाहणं तितकंच आवश्यक ठरणार आहे.
 
भारतातील पदयात्रांचा थोडक्यात आढावा
राहुल गांधींची पदयात्रा म्हटलं की आधी आठवते ती महात्मा गांधी, चंद्रशेखर, विनोबा भावे यांची पदयात्रा.
 
पदयात्रांचा इतिहास पाहता 20 व्या 21 व्या शतकापूर्वीही पदयात्रा काढल्या जात होत्या.
 
शंकराचार्यांच्या आधी गौतम बुद्धांनी तर नंतरच्या कालखंडात गुरू नानक आणि महात्मा गांधींनी अशी पदयात्रा काढली होती.
 
स्वतंत्र भारतातील पदयात्रा बघायला गेलं तर, आचार्य विनोबा भावे (1951), माजी पंतप्रधान चंद्रशेखर (1983), वायएसआर (2003) चंद्राबाबू नायडू (2013) दिग्विजय सिंह यांची नर्मदा यात्रा (2017) यांचा समावेश होतो. काही इतिहासकार यात बाबा आमटेंनी काढलेली पदयात्राही जोडतात.
 
गौतम बुद्ध, गुरू नानक, विनोबा भावे यांच्या पदयात्रा या महात्मा गांधी, चंद्रशेखर, वायएसआर, चंद्राबाबू नायडू, दिग्विजय सिंह यांच्या राजकीय पदयात्रेपेक्षा वेगळ्या असल्याचं इतिहासकार सांगतात.
 
राजकारणाशी संबंधित असलेल्या व्यक्तीने जर पदयात्रा काढली तर ती नेहमीच राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं सांगितलं जातं.
 
त्यामुळे राहुल गांधींची पदयात्राही राजकीय आहे.
 
त्यामुळे प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे अशी पदयात्रा काढून राहुल गांधींना महात्मा गांधी, चंद्रशेखर, विनोबा भावे यांच्या लीगमध्ये उभं राहायचं आहे का? बाकीच्या राजकीय पदयात्रा तर अलीकडच्या काळातल्या आहेत.
 
यावर आधीच निष्कर्ष काढण्यापेक्षा जुन्या पदयात्रांचा उद्देश आणि त्यांना मिळवलेलं यश यावर सारासार चर्चा करणं आवश्यक आहे.
 
गांधीजींची दांडी यात्रा
भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध एक छोटीशीच पण शक्तिशाली अशी पदयात्रा काढली होती. ही पदयात्रा होती दांडीयात्रा.. या यात्रेमुळे गांधीजी संबंध भारतात प्रसिद्ध झाले.
 
त्या काळी भारतात एका मनासाठी म्हणजेच 40 किलो मिठासाठी 10 पैसे मोजावे लागायचे. सरकारने त्यावर वीस आणे म्हणजेच किमतीच्या साडेबारा पट कर लावला.
 
गांधीजींनी ठरवलं की हा अन्यायकारक मीठाचा कायदा आपण मोडायचा. त्यांनी अहमदाबादपासून 241 किमी अंतरावर असलेल्या दांडीपर्यंत पदयात्रा काढायचं ठरवलं.
 
त्यांच्यासोबत 79 कामगार होते. खुद्द महात्मा गांधींही या पदयात्रेत सामील झाले होते. त्यावेळी गांधीजींचं वय 61 वर्षे होते. ते रोज 24 किमी चालायचे. त्यांच्यासाठी घोड्याची सोय सुद्धा करण्यात आली होती पण गांधीजी चालतच राहिले. एवढं चालून चालून त्यांच्या पायाला फोड आले होते.
 
आज राहुल गांधी आणि महात्मा गांधींच्या या यात्रेची तुलना करता भले ही गांधीजींची यात्रा तुलनेने लहान असेल मात्र या यात्रेला मिळालेलं यश मोठं होतं. ज्याची तुलनाच करता येणार नाही.
 
आज राहुल गांधी 52 वर्षांचे आहेत. आणि बातम्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे ते एका दिवसात 20 किलोमीटर अंतर कापणार आहेत.
 
गांधींच्या या यात्रेच्या उद्देशाबद्दल गांधीवादी लेखक कुमार प्रशांत बीबीसीशी बोलताना सांगतात, "गांधीजींच्या दांडी यात्रेमागे दोन उद्देश होते. एक म्हणजे काँग्रेसचं पुनरुज्जीवन आणि दुसरं म्हणजे मीठावर लावलेल्या जाचक करातून सूट मिळवणे."
 
कुमार प्रशांत सांगतात, "दांडी यात्रेच्या या दोन उद्देशांवरच बोलायचं ठरवलं तर भारताच्या इतिहासात अशी दुसरी कोणती पदयात्रा झालीच नसेल. 241 किमीचा प्रवास 25 दिवस सुरू होता. या आंदोलनाने केवळ मीठाचा कायदाच मोडला नाही तर संपूर्ण देशात चळवळ सुरू झाली."
 
वरीष्ठ पत्रकार राम बहादूर राय सांगतात की, "काँग्रेसचे बडे बडे नेते गांधींच्या या पदयात्रेच्या विरोधात होते. आणि तरीही गांधींच्या दांडी यात्रेने भारतीयांमध्ये स्वातंत्र्याचा नवा संकल्प निर्माण केला."
 
या दृष्टिकोनातून पाहिल्यास राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेवर महात्मा गांधींच्या दांडीयात्रेचा प्रभाव दिसतो.
 
या यात्रेच्या माध्यमातून भारताला एकसंध बांधण्याचा उद्देश जरी असला तरी काँग्रेसवरचं मळभ अजूनही हटलेलं नाही असं बरेच राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे निदान या यात्रेतून काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल अशी आशा तज्ज्ञांना वाटते.
 
चंद्रशेखर यांची पदयात्रा
स्वतंत्र भारतातही गांधीजींसारखी एक पदयात्रा काढण्यात आली होती. ती पदयात्रा माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी काढली होती.
 
6 जानेवारी 1983 रोजी ही यात्रा सुरू झाली आणि 25 जूनला दिल्लीत तिची सांगता झाली. या यात्रेदरम्यान चंद्रशेखर दररोज 45 किलोमीटर चालायचे. ही यात्रा 4200 किमी एवढी मोठी होती.
 
पिण्याचं पाणी, कुपोषणापासून मुक्ती, शिक्षण, आरोग्याचा अधिकार आणि सामाजिक समरसता हे या यात्रेचे पाच उद्देश होते.
 
पदयात्रेशी संबंधित बऱ्याच गोष्टी चंद्रशेखर यांनी आपल्या चरित्रात लिहिल्या आहेत.
 
एकेकाळी चंद्रशेखर यांचे माहिती सल्लागार म्हणून काम करणारे आणि आज राज्यसभेचे उपसभापती असणारे हरिवंश यांनी त्या पदयात्रेविषयी बरीच माहिती दिली.
 
त्यांनी चंद्रशेखर यांच्यावर 'चंद्रशेखर-द लास्‍ट आइकन ऑफ आइडियोलॉजिकल पॉलिटिक्‍स' नावाचं पुस्तक देखील लिहिलंय.
 
"चंद्रशेखर यांनी पदयात्रा सुरू करताच त्यांच्या पक्षात (जनता पार्टी) वादंग निर्माण झालं होतं. या वादामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्या दरम्यान पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू होती. पण या कुरबुरींविषयी पक्षबाहेर बोलता येत नव्हतं. यामुळे त्यांचा कोंडमारा होत होता. त्यांना या सगळ्या गोष्टी सोडून बाहेर पडायचं होतं. त्यांच्या मनात पदयात्रेचा विचार आला. त्यांनी यासंदर्भात चाचपणी करायला दोन नेत्यांना दक्षिण भारतात पाठवलं. या नेत्यांनी परत आल्यावर हा विचार निरर्थक असल्याचं सांगितलं. पुढे त्यांच्याकडे दोन तरुण आले ज्यांना समाज परिवर्तनासाठी काम करायचं होतं. चंद्रशेखर यांनी यात्रा सुरू केली आणि हा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचं देखील जाहीर केलं."
 
हरिवंश यांनी चंद्रशेखर यांच्या पुस्तकातल्या या गोष्टी बीबीसीशी बोलताना शेअर केल्या.
 
चंद्रशेखर आपल्या पुस्तकात लिहितात, "त्या पदयात्रेनंतर विरोधी पक्षाच्या राजकारणात पडणं माझी चूक होती. या पदयात्रेनंतर मला भारत यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करायचा होता पण मला ते करता आलं नाही. या यात्रेत जनजागृतीचा प्रयत्न केला असता तर त्याचे दूरगामी परिणाम झाले असते, पण तसं घडलं नाही."
 
म्हणजेच खुद्द चंद्रशेखर यांनीच ही यात्रा अयशस्वी झाल्याचं म्हटलं आहे.
 
हरिवंश पुढे सांगतात, "चंद्रशेखर यांनी 3500 रुपये खिशात घेऊन ही यात्रा सुरू केली होती. यात्रेत जे लोक सहभागी झाले होते तेच रस्त्यात जेवणाचा खर्च उचलायचे, गावकरी जेवण द्यायचे. दिल्लीत येता येता त्यांनी साडे सात लाख रुपये वाचवले. या पैशातून त्यांनी देशभरात भारत यात्रा केंद्रांची निर्मिती केली. या केंद्रात त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य नव्हता."
 
हरिवंश यांच्या मते, "या यात्रेतून लोकांमध्ये राजकीय भावना जागृत झाली. त्यामुळे चंद्रशेखर यांची पदयात्रा यशस्वी झाली असं म्हणता येईल. भारत यात्रा केंद्र हे चंद्रशेखर यांच्या पदयात्रेतील सर्वात मोठं यश असल्याचं ते सांगतात."
 
ज्या भागातून पदयात्रा पुढं सरकली त्या त्या भागात त्यांना व्यापक जनसमर्थन मिळालं. पण दिल्लीत मात्र तसा रिस्पॉन्स मिळाला नाही.
 
पदयात्रा संपल्याच्या दुसऱ्या दिवशी चंद्रशेखर दिल्लीच्या रामलीला मैदानावर गेले.
 
दिल्लीत त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार राम बहादूर रायही त्याठिकाणी पोहोचले.
 
राम बहादूर राय सांगतात, "त्या दिवशी रामलीला मैदानावर एकूण 100 ते 200 लोकच जमले होते. हे बघून मी निराश झालो, मी त्यांचं भाषण ऐकायलाही थांबलो नाही."
 
या सगळ्या अपेक्षाभंगानंतर राम बहादूर रॉय हे गांधीवादी विचारवंत धरमपाल यांच्याशी बोलले. रॉय यांनी धरमपाल यांना विचारलं की, दिल्लीवसीयांनी एवढी उपेक्षा का केली?
 
यावर धरमपाल म्हणाले, "तुम्ही 5 हजार किलोमीटरची पदयात्रा काढा नाहीतर 100 किलोमीटरची पदयात्रा काढा, पदयात्रा कधीच शौर्याच प्रतीक ठरत नाही. त्यामुळे अशा लोकांचं अभिनंदनही केलं जात नाही."
 
चंद्रशेखर यांच्या पदयात्रेचं यश फक्त पाच मुद्द्यात दडल्याचं राम बहादूर राय यांनी सांगितलं. हे पाच मुद्दे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात संगितले.
 
राहुल गांधी या लीगमध्ये सामील होणार का?
चंद्रशेखर यांच्या पूर्वीही आज नंतरही भारतात अनेक पदयात्रा झाल्या. पण महात्मा गांधींच्या पदयात्रेतून जी क्रांती निर्माण झाली तशी क्रांती आजतागायत निर्माण झालेली नाही.
 
मग राहुल गांधींच्या या पदयात्रेतून अपेक्षा ठेवाव्यात का?
 
यावर गांधीवादी विचारवंत कुमार प्रशांत सांगतात, "जर राहुल गांधींच्या पदयात्रेची तुलना करायचीच असेल तर ती चंद्रशेखर यांच्या पदयात्रेशीच करायला हवी. पण काँग्रेसला जर याचा इव्हेंट बनवायचा असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे. पण आज भारतात ज्याप्रकारे गोष्टी सुरू आहेत ते बघता मला असं वाटत की ही पदयात्रा यशस्वी व्हावी."
 
राजकीय पदयात्रांच्या यशाबद्दल राम बहादूर राय सांगतात की, "एक नेता म्हणून तुम्ही लोकांसाठी जे काही केलंय त्याचा सगळा परिणाम या यात्रेवर दिसून येतो. राहुल गांधींची ही पदयात्रा यात्रा नसून हा एक राजकीय कार्यक्रम आहे."
 
राहुल गांधी या यात्रेत किती दिवस टिकतील हा ही एक संशोधनाचा विषय असल्याचं बरेच जाणकार सांगतात.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. या राजीनामा पत्रात त्यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा खरपूस समाचार घेतला. ते आपल्या राजीनाम्यात लिहितात काँग्रेसने 'भारत जोडो' ऐवजी 'काँग्रेस जोडो' यात्रा सुरू करण्याची गरज आहे.
 
पक्षातील कुरबुरीला कंटाळून चंद्रशेखर यांनी पदयात्रा काढली तर बेजार झालेल्या काँग्रेसमध्ये जीव फुंकण्यासाठी गांधीजींनी दांडी यात्रा काढली. आज काँग्रेसची अवस्था बघता काँग्रेसला संजीवनीची गरज आहे. मात्र या दोन्ही पदयात्रांच्या अगदी मध्यात काँग्रेस सध्या उभी आहे.
 
पण ही पदयात्रा यात्राचं राहणार की त्याचा पॉलिटिकल इव्हेंट होणार यावे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या नजराही लागून राहिल्या आहेत.