शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Updated : शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (12:27 IST)

रंगीबिरंगी चनियाचोली

वेगवेगळ्या रंगीबेरंगी चनियाचोली घालून एकत्र नाचणार्‍यांना पाहून असंच वाटतं जणू असंख्य फुलपाखरं एकत्र येऊन थिरकत असावीत....
 
तरूण-तरूणींना वर्षभर सर्वात जास्त ज्या सणाचा वेध लागलेला असतो. तो सण म्हणजे 'नवरात्रीमधील दांडिया हा नृत्यखेळ तर सर्वांच्या आवडीचाच. नटूनथटून साजशृंगार करून दांडियाच्या तालावर अविरत आणि बेधुंद होऊन नाचत राहाणं, जणू आजच्या तरूणाईचा एक छंदच झाला आहे. मग यासाठी त्यांची तयारीही महिने आधीपासूनच सुरू होते. 
 
दांडिया नृत्य आणि वेगवेगळ्या नृत्यप्रकाराला जसं नवरात्रीत महत्त्व आहे तितकंच महत्व दांडिया नृत्य करतात घातल्या जाणार्‍या चनियाचोलीलाही आहे. नुसत्याच घालून नटूनथटून फुलपाखरांगत नाचणार्‍या मुलींकडेच लोकांचं लक्ष जास्त वेधलं जातं. 
 
लहेंगा घागराचोली, चनियाचोली किंवा शरारा या सर्व नावांनी ओळखल्या जाणाया चनियाचोलीच्या पेहरावाला नवरात्रीच्या सणात फार मागणी असते. 
 
अलीकडे नुसतं शुद्ध कॉटनच नव्हे तर नेट, सिफॉन सिल्क, जॉर्जेट, जरी सैंटिन आणि क्रेपमध्येही चनियाचोली मिळू लागल्या आहेत.
 
वेगवेगळ्या रंगामधील प्लेन किंवा प्रिंटेड आणि संपूर्ण एम्ब्रॉयडरीने भरलेली चोळी मुली वेगवेगळ्या पॅटनमध्ये शिवतात. 
 
चनियाचोलीच्या पेहरावात सर्वात महत्त्वाची ओढणी असते. एरवी तर मुली डोक्यावर पदर घेत नाहीत, पण हा पेहराव घातल्यावर मात्र ओढणीचा पदर घेतल्याने चनियाचोलीचा पेहरावा परिपूर्ण होतो. 
 
चनियाचोलीमधून दिसणारं उघडं अंग झाकण्यासाठी या ओढणीचा उपयोग जरी होत असला, तरी दांडिया नृत्य प्रकारात घेरदार चनियाबरोबरच भरजरी लहरती ओढणीही फार महत्त्वाची असते. नाचतना ओढणीचं टोक हातात घेऊन थिरकणंदेखील या नृत्य प्रकारामध्ये येतं. 
 
चनियाचोलीचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर प्लेटस आणि एम्ब्रॉयडरी असलेली घेरदार चनिया आणि भरजरी चोळी आहे. पण यामध्येही वेगवेगळे प्रकार दिसून येतात. काही चनियाचोली जरदोसी जरी, मणी, खडे आणि रेशीम कामाने पारंपरिक डिझाईन करून तयार केलेली असते.