रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (09:56 IST)

शैलीपुत्री : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा या देवीची आराधना

दुर्गेचे पहिले रूप 'शैलीपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.
 
या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.
 
एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे.
 
परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडिलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.
 
सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही.
 
सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाइकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले.
 
आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्‍याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली. पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.
 
देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते.