शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (16:21 IST)

श्री रेणुका देवी माहात्म्य अध्याय ४

Shri Renuka Devi Mahatmya adhyay 4
जमदग्नी-रेणुकादेवीना इंद्राने कामधेनु दिली व जमदग्नीनी दिलेल्या प्रसादाच्या सेवनाने रेणुकादेवीस रामभद्र इत्यादि पुत्र झाले ती कथा
 
मार्कंडेय मुनींनी धर्मराजास जमदग्नी-रेणुकादेवीच्या विवाहाची हकीकत सांगून पुढील रेणुका माहात्म्य सांगितले ते मी तुम्हास सांगतो. असे म्हणून सूत शौनकादि ऋषींना सांगू लागले. "हे शौनकादि मुनिजनहो, रुचिकमुनि-सत्यवती यांच्या आज्ञेत असलेले जमदग्निमुनि आधीच वेदशास्त्रपारंगत, तपोनिष्ठ, उज्वलमूर्ति होते; आणि आपली पतिव्रता पत्‍नी रेणुकादेवी इच्यासह संतोषाने काळ कंठित अतिथि अभ्यागतांचाहि प्रेमाने आदर-सत्कार करीत होते. यामुळे सिद्धाचलाए महात्म्यही फारच वाढले व तेथे कितीतरी ऋषी येऊन राहिले. इंद्रादि देवही याच्या दर्शनासाठी येथवर येऊन त्यांचा यथोचित आदर सत्कार स्वीकारून आश्चर्यचकीत होऊन यांच्या सहाय्याकरिता कामधेनु-कल्पवृक्ष चिंतामणी-पारिजातादि दिव्यवस्तु देऊन रुचिकमुनि-सत्यवती यांचा निरोप घेऊन आपापल्या स्थानास निघून जात. अशा रीतीने रेणुकादेवी-जमदग्नी यांना विना विशेष बल प्राप्त झाले. रुचिकमुनि-सत्यवती संतुष्ट होऊन त्यांनी रेणुकादेवीस गृहस्थाश्रमाचे मम समजावून सांगितले व म्हणाले. ’रेणुकादेवी. तू दररोज आमच्या पूजेकरिता उत्तरवाहिनी मलापहारी नदीचे शुद्धोदक आणून देतेस त्याचप्रमाणे जमदग्नीच्या पूजेकरिता शुद्धोदक आणुन द्यावे व त्याच उदकाने पतीची पादपूजाही तू करावी. तुझ्या अतिथी सेवा सहाय्याकरिता शिवलिंगपूजानिष्ठ असे लिंगमुनि-तृप्तिमुनि परशुमुनि इत्यादि सेवा सहाय्याकरिता शिवलिंगपूजानिष्ठ असे लिंगमुनि-तृप्तिमुनि परशुमुनि इत्यादि सिद्ध पुरुषांना मी येथेच राहणेबद्दल सांगितले आहे. आता आम्ही आमचे मूलस्थान चे आदिमोहरा क्षेत्र तेथे राहणेकरिता प्रयाण करणार आहोत असे रेणुकादेवी-जमदग्नी व इतर ऋषिनाही सांगून बोलवावयास आलेल्या शिष्यांसमवेत रुचिकमुनि-सत्यवती आदिमोहरा स्थानाकडे निघून गेले.
 
इकडे जमदग्नि ऋषींनी अनुग्रह करून दिलेल्या प्रसादाने रेणुकादेवीस वसु विश्वावसु-बृहद्‌भानु-बृहत्कण्व असे अनुक्रमे चार पुत्र झाले. पुढे जमदग्नी ऋषींनी राजे व अनेक ऋषिश्रेष्ठींना बोलावून सर्व देवताप्रीत्यर्थ शांतिहोम वगैरे करून सर्वांना प्रसाद देऊन पाठविले. या यज्ञास अर्पिलेला चरुप्रसाद सिद्धमंत्रानी तयार केला होता तो रेणुकादेवीला दिला व तो तिने अत्यंत भक्तिने ग्रहण केला या प्रसादाच्या महात्म्याने पुढे रेणुकादेवीस वैशाख शुद्ध अक्षय्य तृतीयेच्या शुभदिवशी श्रीनारायणच जन्माला आल्याप्रमाणे राम नावाचा पुत्र झाला व त्याच समयास कार्तवीर्याच्या राजवाड्याचे शिखर एकाएकी वीज पडून झाड कोसळून पडावे त्याप्रमाणे धडाधड कोसळून पडले व दुष्ट क्षत्रियाचे कुल सर्व हादरुन गेले. इतकेच नव्हे तर या क्षत्रिय राजस्त्रियांच्या गळ्यातील मंगळसुत्रेही डळमळू लागली या भयंकर घटनेने कार्तवीर्य घाबरून गेला व असा हा दुर्घट प्रसंग आपणावर कशामुळे प्राप्त झाला असावा हे त्याने आपली माता राकादेवी हिला चिंतातूर होऊन विचारले. तेव्हा राकादेवी म्हणाली, "हे वीरपुत्रा, श्रीगुरु दत्तात्रेयांची तुजवर पूर्ण कृपा आहे. तेव्हा कोणत्याही देवदानवाकडून तुला बिलकुल भीती नाही, असे असता तू कसली चिंता करतोस ? तू मात्र गुर्वाज्ञेप्रमाणे स्त्री-हत्या, गोहत्या, शिशुहत्या व ब्रह्महत्या या पंच महापातकापासून अलिप्त रहा." असे सांगून व नित्याप्रमाणे शिवलिंग पूजा करून व त्याचा प्रसाद घेऊन तुझ्या राज्यकारभाराकडे लक्ष देत असा त्याग उपदेश करून त्याचे समाधान केले.
 
इकडे सिद्धाचलावर श्री रामाचा जन्म झाल्यानंतर १२ वे दिवशी नामकरण कार्यासाठी जमदग्नी ऋषींच्या आज्ञेने सर्व जमले व त्यांनी दर्भानी तयार केलेल्या पाळण्यात मुलास निजवून मंगलगीते गात त्यास रामभद्र असे नाव ठेवले आणि या सिद्धाचल पर्वतास श्री रामशृंग असे नामाभिधान दिले तेव्हापासून या पर्वतीस रामशृंग हे नाव प्राप्त झाले. देवतानाही या मंगल प्रसंगी रामभद्रावर पुष्पवृष्टी केली. सर्वत्र देवदुंदुभिचा निनाद व्यापून राहिला. देवकन्यकांनी मृदंग आदिवाद्यांच्या तालावर नृत्य केले व नागकन्यकानी गायन केले. रामभद्राच्या जननाचे महत्व वर्णन करीत जमदग्नी-रेणुकादेवींनी केलेले आदरातिथ्य सर्वांनी स्वीकारले व नंतर तेथे जमलेले सर्व लोक आपापल्या ठिकाणाकडे गेले. इकडे रामभद्र मोठा होता होता ८ वर्षाचा झाला, तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याचा उपनयन संस्कार यथाविधि केला. पुढे रामभद्र जमदग्नि ऋषींकडून वेद वगैरे शिकून आश्रमातील सर्व ऋषि व ऋषिपत्‍नींना अत्यंत पूज्य असा झाला. या सुमारास क्षत्रियांचा फार उपद्रव होऊ लागल्यामुळे गालव-मतंग-शांडिल्य-कौंडिण्य इत्यादि ऋषि रामशृंग पर्वतावर आले व त्यांनी आपणास क्षत्रियांकडून होणार्‍या उपद्रवाची हकीकत जमदग्नींना सांगितली त्यावर त्यांनी त्या सर्वांना आपल्या आश्रमातच राहण्यास सांगितले व ठेवून घेतले. पुढे क्षात्र प्रसादाच्या तेजाने उत्पन्न झालेल्या या जमदग्नीने उग्र तपाचरण करून उग्रमूर्ति अशा क्रोध देवीस प्रसन्न करून घेतले व त्या दुष्ट क्षत्रियांना चांगली बुद्धी शिकविण्याचा मनांत निश्चय केला त्या दुष्ट क्षत्रियाचे दुष्ट आचरन रामभद्राच्या कानावरही आले होते. तेव्हा त्यांना जागे करण्याच्या उद्देशाने धनुर्विद्या संपादन करणेकरिता आपल्या वडिलांची परवानगी घेऊन रामभद्र कैलासास गेला. इकडे नित्याप्रमाणे रेणुकादेवीने मलापहारी नदीचे पाणी आणून पतीच्या पूजेची तयारी केली व आपण आपली सोमवारची पूजा यथाविधि करून सर्वांच्या प्रीतीस पात्र झाली.
 
यावेळी मीन चैत्रमासाचा पुण्यकाल आला म्हणून जमदग्नी मुनींच्या आज्ञेने बरोबर एक ऋषिकुमार घेऊन मलापहारी नदीचे पाणी आणणेकरिता रेणुकादेवि गेली. त्यावेळी तेथे कितीतरी राजस्त्रिया मलापहारी नदीमध्ये स्नान करून नानातर्‍हेची व नाना रंगानी मिश्रित अशी अत्यंत उंची वस्त्रे नेसत होत्या व विविधप्रकाअरची दिव्याभरणे घालून जणू आपल्या वैभवाचे प्रदर्शनच करीत होत्या. हे रेणुकादेवीने प्रत्यक्ष पाहिले व ती मनात म्हनाली, ’मी रेणुकाराजाची आवडती कन्या असून काय उपयोग ? पित्याने दिलेली उंची वस्त्राभरणे सर्व सोडून पतीच्या आज्ञेप्रमाणे मला वल्कले नेसून रुद्राक्ष माला धारण करावी लागली ना ? हे खरोखरीच माझे दुर्भाग्य होय." असे मनात चंचलवृत्तीने तिने नदीमध्ये स्नान केले व ती घागर भरून घेऊन निघाली. तेव्हा बरोबर असलेल्या ऋषिकुमारास ती म्हणाली, ’बाला, नित्याप्रमाणे मलापहरी नदीचे उदक नेण्यास आज मला उशीर झाला आणि यामुळे जमदग्नी मुनि माझेवर खचित कोपणार तेव्हा तो ऋषिकुमार म्हणाला, ’आई थोडासा उशीर जाला म्हणून काय झाले ? तुमची यात काही चूक नाही." रेणुकादेवी म्हणाली, "काहीही असो, अशापूर्ण अशा या स्त्रीजन्माला धिःकार असो ! असे मनात रेणुकादेवी पश्चातापपूर्वक म्हणाली. व जमदग्नी ऋषींचे जवळ आली तेव्हा ऋषींनी अंतरदृष्टीने तिचा मनोभाव व पश्चात्ताप समजून घेतला, व ते तिला म्हणाले, ’प्रिये रेणुकादेवी, आज तुला नदीहून येणेस उशीर झाला, त्याचे कारण काय बरे?" हे ऐकून रेणुकादेवी म्हणाली, "मी तरी काय सांगू? आज नदीवर कित्येक नरनारी स्नान करून उंची वस्त्रे नेसून व दिव्याभरणे घालून नटलेली मी पाहिली व मलाही अशा प्रकारची वस्त्रे नेसण्याचा व अलंकार घालण्याचा काल केव्हा येणार आहे अशा विचारात मी मग्न होते म्हणून मला उशीर झाला. याशिवाय दुसरे काही कारण नाही." अशी आपल्या मनातील खरी गोष्ट तिने सांगितली, त्यावर जमदग्नी ऋषि म्हणाले, बरे आहे यात तुझी काहीच चूक नाही. आशापूर्ण अशा स्त्रीजन्माचे मर्मच हे आहे त्यास कोण काय करणार ? काहीही असो, तुझी इच्छा मी पूर्ण करणारच."
 
जमदग्नीनी रेणुकादेवीस मंगळसूत्राचा महिमा प्रत्यक्ष पटवून दिला.
 
"हे रेणूकादेवी तुला वस्त्राभरणे देऊन, तुझी वस्त्राभरणांनी नटण्याची इच्छा मी पूर्ण करणार. श्री मल्लिकार्जुन लिंगाच्या मस्तकावर अर्पिलेल्या अक्षतापैकी (तांदळाचा एक दाणा) घेऊन तून पूबल्लिचा राजा धर्मवर्धन याजकडे जा व त्यास या तांदळाच्या वजनाइतके सुवर्ण घेऊन येण्यास मी तुला पाठवले आहे असे सांग म्हणजे तो तुला पाहिजे तितके सोने देईल. याविषयी तू काही संशय घेऊ नकोस. तुझ्याबरोबर या ऋषिपुत्रास घेऊन जा व तुझी मनीषा पूर्ण झाली म्हणजे आजच्या प्रदोष पूजेच्या वेळी तू येथे ताबडतोब निघून ये." असे जमदग्नी ऋषींनी रेणुकादेवीस सांगितले नंतर रेणुकादेवीस त्यांच्या आज्ञेप्रमाणे एका ऋषीकुमारास बरोबर घेऊन पूबल्लि राजाकडे गेली. या रेणुकादेवीच्या दर्शनाने राजा व राणि दोघेही संतुष्त झाले व त्यांनी देवीचा सत्कार करून तिला भद्रासनावर बसविले व ऋषिपुत्रासही तिच्याजवळच बसवून त्यांना नमस्कार केला आणि त्यांना म्हणाले, "हे देवी, आपण आम्हास दर्शन देऊन फार दिवस झाले. आज आपल्या दर्शनाने आम्ही कृतार्थ झालो नंतर कुशलमति राणीनेही देवीना व , ऋषिकुमारास नमस्कार केला तेव्हा राजाने रेणुकादेवीस तिच्या येण्याचे प्रयोजन विचारले. त्यावर देवीने त्यांचा भक्तिभाव जाणून त्यांना सांगितले की, ’माझे पति जमदग्नीऋषि यांनी तुम्हाकडून या तांदळाच्या दाण्याच्या वजनाइतके सुवर्ण घेऊन येणेस मला सांगितले आहे. म्हणून मी आपल्याकडे आले आहे तेव्हा हा तांदळाचा दाणा आपण घ्यावा असे सांगून रेणुकादेवीने तो त्यांचेकडे दिला. राजाने तो दाणा भक्तिभावाने घेतला व आपल्या राणीस तो म्हणाला की, हा काहीतरी चमत्काराचा प्रसंग असावा असे दिसते. त्यावर राजा-राणी दोघांनीही विचार केला व ते रेणुकादेवीस म्हणाले, "देवी, आम्ही तुमची इच्छा पुर्ण करतो" असे म्हणून त्यांनी आपल्या मंत्र्यास बोलावले व सोने वजन करण्याचा काटा (तराजू) आणणेस आणि रेणुकादेवीच्या समक्षच तराजूच्या एका पारड्यामध्ये राजाने बोटात घातलेल्या रत्‍नजडित आंगठ्या घातल्या. पारडी मात्र वर खाली झाली नाही. तांदळाचा दाणा घातलेली पारडी जमिनीवरच बसली व आंगठ्या घातलेली पारडी मात्र वर उठली हे पाहून राजा-राणी त्याचप्रमाणे त्यांचे मंत्री आश्चर्यचकित झाले. व जमदग्नी ऋषींनी ही आमच्या भक्तीची कसोटी चालविली असावी असे मनात आणून मंत्र्यास यापेक्षाही मोठी तागडी आणणेस व ती आपल्या बागेतील बिल्ववृक्षास बांधून तीत आपल्या भांडारातील सर्व नवरत्‍नखचित सुवर्णादि अलंकार घालून वजन करणेस सांगितले. त्याप्रमाणे मंत्र्याने एका पारडीत तांदळाचा दाणा व दुसरीत राजभांडारातीस सर्व सुवर्ण आणून घातले तेव्हा तांदळाचा दाणा असलेली पारडी भूमी सोडून किंचित वर उठली. नंतर राजाने राणीस तिचे सर्व अलंकार पारडीत घालणेस सांगितले. राणीने त्याप्रमाणे सर्व अलंकार घातले पण तांदळ्याच्या दाण्याइतके वजन झाले नाही. त्यावर राजाने आपल्या मंत्र्यास एकीकडे बोलावून विचारले की आमच्याजवळील सर्व द्रव्य संपले आता कसे करावयाचे ? त्यावर मंत्री म्हणाला, "आपण काही चिंता करू नका मी माझ्याकडील सुवर्णादि अलंकार आणून पारडीत घालून ती पारडीबरोबर करतो." असे मंत्री म्हणाला तोच राजगुरु सोमेश्वरांचे तेथे आगमन झाले. त्यांनी रेणुकादेवीला तेथे पाहून राजास विचारले, ’हे राजा, काय हे तुझे सुदैव ! आजच्या या पुण्य अशा पर्वकाली रेणुकादेवीनी एकाएकी तुम्हास दर्शन दिले हा तुमचा पुण्यप्रभाव होय." हे गुरुवाक्य ऐकून राजा-राणी व मंत्रीवर्यही म्हणाले, महाराज आमची मनीषा पूर्ण झाली’ असे म्हणून त्यांनी सोमेश्वर गुरुंना साष्टांग प्रणिपात केला. गुरुंनी रेणुकादेवीच्या आगमनाची सर्व हकीकत ऐकून घेतली व ते राजास म्हणाले "हे राजा, हा काल तुझ्या भक्तीच्या कसोटीचा आहे, हे नीट लक्षात घे आता राणि कुशलमति हिच्या मंगळसूत्रातील तू घातलेला तुझ्या नावाचा एक सौभाग्यसुत्रमणि वगळून इतर सर्व मणि त्या पारडीत घाल म्हणजे त्या दोन्ही पारड्या बरोबर होतील.’ ही गुरुंची आज्ञा ऐकून त्याप्रमाणे राजाने आपल्या राणीकडून मंगळसूत्रातील इतर सर्व मणि घेतले व ते आपल्या गुरुंच्या हाती दिले; त्यांनी स्मितमुखाने ते पारड्यात घातले. त्याबरोबर ती दोन्ही पारडी बरोबर झाली. हे पाहून तेथे जमलेले सर्व लोक विस्मित झाले व त्यांनी पार्वती परमेश्वराचा व रेणुकादेवीचा अत्यंत भक्तीने जयजयकार केला. या राजा-राणीच्या भक्तिभावास प्रसन्न होऊन रेणुकादेवी म्हणाली, "आता ही सर्व आभरणे माझी झाली. तेव्हा सर्व आभरणे घेऊन मी लागलीच आमच्या आश्रमाकडे जाते.’ हे ऐकून राजाने आपल्या मंत्र्यास बोलावले व सर्व अलंकार एका पेटीत घालून रेणुकादेवी व ऋषिकुमार यांना रथातून घेऊन जमदग्नि ऋषींच्याकडे जाऊन त्यांना सर्व अलंकार अर्पण करण्यास सांगितले व गुरुच्या प्रदोष पूजेकरिता जलदीने परत येणेस कळविले, मंत्र्याने राजाज्ञेप्रमाणे रेणुकादेवी व ऋषिकुमार यांना जमदग्नीकडे पोचवून बरोबर आणलेली अलंकारादि पेटीही उघडून दाखविली व ते सर्व अलंकार ऋषींना अर्पण केले. ते पाहून जमदग्नी रेणुकादेवीस म्हणाले, "देवी, तुमची इच्छा पूर्ण झाली ना ? बरे झाले. आता हे सर्व अलंकार तुम्ही दररोज वापरून तुमची हौस पुरी करून घ्यावी.’ हे ऐकून रेणुकादेवी स्मित मुखाने खाली मान घालुन उभी राहिली. हे पाहून जमदग्नी मुनी रेणुकादेवीस म्हणाले. "रेणुका, तुजबरोबर दिलेला तांदळाचा दाणा इकडे आण." त्यावर रेणुकादेवीने आपल्याजवळचा तांदळाचा दाणा त्यांना दिला. तो घेऊन मंत्र्यास म्हणाले, ’हे सर्व अलंकार या तांदळाच्या दाण्याइतके वजनात भरले ना ? बरे झाले ? हे ऋषींचे बोलणे ऐकून मंत्री म्हणाले, "ऋषिवर्य, हे एवढेच दागिने नव्हे तर आमच्या राणीच्या मंगळसूत्रातील गुरुंनी बांधलेली सोन्याची ताळी वजनाला घातले तेव्हाच ते वजन बरोबर भरले. ती ती ताळी मजजवळ आहे, ती आपण घ्या." असे म्हणून मंत्र्याने जमदग्नी ऋषींना अर्पण केली. ती ताळी ऋषींनी आपल्या हातात घेतलि व किंचित हास्य वदनाने त्यांनी एक सोने वजन करण्याचा काटा आणून तिच्या एका पारडीत तांदळाचा दाणा व दुसरीत ती सोन्याची ताळी घातली. त्याबरोबर दोन्ही पारडी बरोबर भरली व हलू लागली. हे सर्व रेणुकादेवीनी त्याचप्रमाणे इतर ऋषीपत्‍नीनी व मंत्र्यानीही पाहिले व ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यावर जमदग्नी ऋषी मंत्र्यास म्हणले, ’हे मंत्रिवर्या, या तांदळाच्या दाण्याचे वजनाचे मंगळसूत्रातील सोन्याची एकच ताळी (मणि) पुरेशी झाली तेव्हा हेबाकीचे सर्व अलंकार तुम्ही जास्तीचे आणल्यासारखे झाले, रेणुकादेवी, हे जास्तीचे अलंकार तू देणार आहेस काय ? असे ऋषींनी किंचित हास्यमुखाने तिला विचारले. तेव्हा आता मी यापुढे कसल्याच अलंकाराची अपेक्षा करणार नाही असे रेणुकादेवी म्हणाली, स्त्रियांच्या सौभाग्यास इतर अलंकारापेक्षाही विवाह समयी गुरुंनी बांधलेली मंगलसूत्रातील ताळीच मुख्य आहे. या ताळीची बरोबरी इतर कोणत्याही अलंकाराने होत नाही हे आपण मला प्रत्यक्ष पटवून दिले. यामुळे मी पश्चात्ताप पावून धन्य झाले. रेणुकादेवी मंत्र्यास म्हणाली, "हे मंत्रीवर्या, तुमच्या राजा-राणीच्या भक्तीची कीर्ती सर्वत्र पसरली. आता हे सर्व अलंकार नेवून तुमच्या राजास परत द्या त्यावर जमदग्नीनी आपणाजवळ असलेली राणीची ताळीही त्यांचेकडे दिली व ती पूर्वीप्रमाणे मंगळसूत्रात घालून वापरावी असे सांगून मंत्र्यास आशिर्वादपूर्वक निरोप दिला पुढे जमदग्नी ऋषीच्या सदोष पूजेसाठी मलापहारी नदीचे पाणी आणणेकरिता रेणुकादेवीनी ऋषीची आज्ञा घेऊन गेली व सर्पाची चुंबळ आणि मातीची घागर करुन नेहमीप्रमाणे शुद्धोदक घेऊन आली व त्यांची पादपूजा करून तिने पादतीर्थ सेवन केले.
 
जमदग्नी ऋषींच्या व्रतभंगासाठी क्षत्रिय रानाने कपटसिद्धांना पाठविले आणि रेणुकादेवीने त्यांना तेथील गुहेत गुप्त केले ती कथा
 
इकडे कार्तवीर्य व इतर क्षत्रिय राजांना जमदग्नी ऋषींच्या वाढत्या कीर्तीच प्रभाव सहन होईनासा झाला म्हणून त्यांनी ऋषींचा व्रतभंग करण्याचा दुष्ट बेत योजून आपणाजवळ असलेल्या कपट साधूंना बोलावले व ते त्याना म्हणाले, "हे साधूवर्यहो, तुम्ही अष्टमासिद्धिमध्ये पारंगत आहात. तुम्ही रामशृंग पर्वतावर जाऊन तेथे काही दिवस वास्तव्य करावे व जमदग्नी ऋषींचा व्रतभंग करवून शांडिल्यादि ऋषींना ते स्थान सोडून जाणेचा उपदेश करावा व नंतर इकडे ताबडतोब यावे." असे त्यांना सांगून कार्तवीर्य व इतर राजधानी त्या कपटसाधूंना रामश्रृंग पर्वतावर पाठविले. हे साधू एका टोळीने जमदग्नी ऋषीपाशी आले व त्यांना नमस्कार करून म्हणाले, "हे ऋषिवर्यहो ! आपल्या तपाची कीर्ति तिन्ही लोकी प्रसिद्ध जाहली आहे. आम्ही आल्या आश्रमात काही दिवस राहून आपली सेवा करण्याकरिता आपल्या चरणांजवळ आलो आहोत, त्यास आपण अनुज्ञा द्यावी अशी विनंती करून ते सर्व एकीकडे जाऊन बसले. जमदग्नी ऋषींनी आपल्या ज्ञानदृष्टीने त्यांची कपटवृत्ती ओळखली व ते त्यांना म्हणाले, "बरे आहे. तुम्ही आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत या ठिकाणी वास्तव्य करावे." असे त्यांना सांगून त्यांनी एक जागा त्यांना दाखविली. पुढे १/२ दिवसातच ही त्यांची कपटवृत्ती गुप्तमुनि-लिंगमुनि-तृप्किमुनि यांनी रेणुकादेवीस कळविली. तेव्हा देवीनी या कपटीसिद्धांना एका गुहेत गुप्त रीतीने पाठवून त्यांनी तेथून बाहेर येऊ नये अशा रीतीने त्यांची व्यवस्था करून त्या दुष्टांना चांगला धडा शिकविला. ही बातमी सर्वत्र पसरलि आणि यामुळे या कपटवृत्तीचे मूळ जे कार्तवीर्य आणि क्षत्रिय राजे ते भयग्रस्त झाले.
 
जमदग्नी ऋषींनी घोर तपाचरण करून उग्रतर अशा क्रोधदेवीस प्रसन्न करून घेतले ती कथा
 
रामभद्र कैलासाहून रामश्रृंग पर्वतावर आला.
 
सूत - शौनकादि मुनि हो ! रामभद्र माता-पित्यांची आज्ञा घेऊन कैलास पर्वतावर गेला व तेथे तपश्चरण करून त्याने परमेश्वरास प्रसन्न करून घेतले आणि त्याचेकडून धनुर्विद्येचे शिक्षण घेऊन पार्वतीदेवीकडून अंबिकास्त्राची प्राप्ती करून घेतली व आनंदभरित होत तो रामशृंग पर्वतावर आला आणि आपल्या माता-पित्यास त्याप्रमाणे बंधुनाहि त्याने नमस्कार केला. बरेच दिवस न भेटलेल्या रामभद्राला सर्वांनी प्रेमाने आलिंगन दिले. जमदग्नी ऋषींनी त्याचप्रमाणे रेणुकादेवीनेही त्याला विजयी हो, चिरंजीव हो असा आशिर्वाद दिला. त्यांच्या प्रेमाने संतुष्ट झालेल्या रामभद्राच्या मनात माता-पित्याविषयी अत्यंत भक्ति उत्पन्न झाली व पुष्कळ दिवस सेवा सोडलेला रामभद्र पुनः माता-पित्यांच्या सेवेत तत्पर होऊन राहिला.
 
अशाप्रकारे काही दिवस गेल्यावर दुष्ट क्षत्रियांनी चालविलेल्या साधु-सत्पुरुषांच्या असहनीय छळाची वार्ता जमदग्नी ऋषींना समजली तेव्हा ते अत्यंत क्रोधाविष्ट झाले व त्यांनी आपले प्रखर नेत्र उघडले. त्याबरोबर रामश्रृंग पर्वतावरील वृक्ष वगैरे दग्ध होऊन गेले एवढेच नव्हे तर तेथील जलाशयही उष्ण होऊन त्यांची वाफ येऊ लागली. ती वाफ असह्य झाल्यामुळे तेथील ऋषी तसेच मृगपक्षीही घाबरे होऊन गेले. तेथे राहिलेले सर्व जमदग्नी ऋषींची स्तुतिस्तोत्रे गाउ लागले. हे जाणून ऋषींनी आपले प्रखर नेत्र मिटून वरुणाचे ध्यान केले त्याबरोबर वरुण त्यांचे सन्निध आला व त्याने तेथील असह्य अशी उष्णता शांत केली व तो तेथेच राहू लागला. तेव्हापासून या स्थानास वरुणतीर्थ असे म्हणू लागला. या तीर्थात स्नान केलेले पवित्र होतात. अशी ही जमदग्नी ऋषीच्या उग्रतर कोपाची महती सर्वत्र पसरली व ती कपटी क्षत्रियांना कळून आल्यावर ते आपले कपट कारस्थान गुप्त रीतीने चालवू लागले इकडे रामभद्रही पुनः आपल्या माता-पित्यांची आज्ञा घेऊन कैलासास पार्वती-परमेश्वराचे सन्निध राहू लागला.
 
जमदग्नीच्या आश्रमामध्ये अद्‌भुत प्रसंग घडला ती कथा
 
रामश्रृंग पर्वतावरील ऋषी तसेच ऋषिपत्‍न्याही जमदग्नी-रेणुकादेवींची सेवा करीत व क्षत्रियांचे भय नाहीसे झाल्यामुळे आपली शिवलिंगार्चनादि नित्यकर्मे तसेच यज्ञयागादि कार्येही करू लागले. असे असता नित्याप्रमाणे रेणुकादेवी मलापहारी नदीचे शुद्धोदक आणण्याकरिता गेली तेव्हा त्या दिवशी चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या पत्‍नीबरोबर जलक्रीडा करीत होता. ते रेणुकादेवीनी पाहिले. तेव्हा आपणही आपल्या पतीसमवेत अशीच जलक्रीडा करावी अशी इच्छा रेणुकादेवीच्या मनात उत्पन्न झाली व त्या थोडा वेळ तेथे तशाच उभ्या राहिल्या व त्यांनी आपल्या मनास उपदेश केला की, हे मुर्ख मना ! मी ऋषिपत्‍नी असल्यामुळे या गंधर्वासारखे आचरण करणे हा माझा धर्म नव्हे. आज असा दुर्घट प्रसंग काय म्हणून मजवर आला ? असे म्हणून व आपल्या चंचल मनास उपदेश करून रेणुकादेवी पश्चात्ताप पावली व दुसरीकडे जाऊन तिने नदीत स्नान केले आणि आपले जाडे वस्त्र नेसून चुंबळ करण्याकरिता तेथे असलेल्या सापास धरावे म्हणुन तिने आपले हात पुढे केले, तेव्हा तो साप तिच्या हाती न लागता गुप्त झाला. यामुळे रेणुकादेवींची मनोव्यथा वाढली तरीही आपले समाधान आपणच करून घेऊन चिखलाची घागर करू लागल्या; तेही साध्य होईना. त्यावर शिवशिवा ! आज असे होण्याचे मुख्य कारण माझा चंचल स्वभावच होय आता खचितच ऋषि मजवर कोपणार असे म्हणून रेणुकादेवी गडबडीने ऋषिसन्निध आल्या. त्यावर ऋषि म्हणाले, "रेणुका, आज नित्याप्रमाणे तू अग्रोदक आणले नाहीस. का बरे? माझ्या नित्यक्रमात यामुळे भंग झाला ना ? याचे असेल ते कारण मला स्पष्ट सांग." असे क्रोधाविष्ट होऊन ऋषि तिला म्हणाले तेव्हा रेणुकादेवी हात जोडुन नम्रतेने म्हणाली, ऋषिवर्या, आज माझे मन चंचल होऊन भ्रांत झाले." चित्ररथ गंधर्वाचे दर्शन झाले वगैरेची सर्व हकीकत सांगून अश्रूपूर्ण नयनांनी अधोमुख अशी रेणुकादेवी राहिली. तिकडे लक्ष न देता क्रोधोद्दीपित असे जमदग्नी ऋषि तिला म्हणाले. हे नीच, नीतिभ्रष्ट स्त्रिये ! आज तुझे मन चंचल झाल्यामुळे माझ्या आश्रमास अत्यंत मलीनता आली आहे. "भर्ताच स्त्री कृतं पाप" या वाक्याप्रमाणे तुझे पाप मला लागले आहे आता तू येथे उभी राहु नकोस; जर राहशील तर तुला मी जाळून भस्म करून टाकीन समजले ना?" हे पतीचे बोलणे ऐकून व पतीच्या क्रोधाच्या ज्वाला सहन न होऊन रेणुकादेवीने आपला मलिन देह नाश करुन टाकण्याच्या उद्देशाने ते स्थान सोडण्याचा विचार केला व पश्चिमेकडील वनात प्रवेश केला. तेथे नानाविध कमलांनी त्याचप्रमाणे पोवळी वगैरेच्या वेलीनी, तसेच नाना प्रकारच्या वृक्षांनी शोभणारे एक सरोवर व त्या सरोवराजवळच एक वटवृक्ष तिला दिसला. त्या वृक्षाखाली बसून पतीच्या क्रोधाने कृष्ण झालेला आपला देह धिःकारून रेणुकादेवी दुःख करू लागली. असा काही काळ निघून गेल्यावर तिचे मन शांत झाले व ती निद्रवश झाली. तेव्हा तिच्या स्वप्नात दोन शिवयोगी सिद्ध येऊन तिला म्हणाले, "देवी येथे येऊन तू अशी दुःख का करू लागली आहेस ? आणि तुझे शरीर असे कृष्णवर्ण का झाले आहे ? काहीही असो. तू आता या सरोवरात सचैल स्नान करून हे जाडे वस्त्र नेस" असे म्हणून तेथे एक वस्त्र ठेवून गेले. हे जाणून रेणुकादेवी हात जोडून म्हणाली, "मजसारख्या पापी स्त्रीजवळ आलेले आपण कोण बरे महात्मे आहात ? ते मला सांगा." त्यावर ते म्हणाले. हे देवी, आम्ही एकनाथ, जोगिनाथ म्हणून सिद्ध आहोत व येथे जवळच असलेल्या पर्णकुटीत आम्ही राहतो. या सुगंधवतीचा राजा आम्ही करीत असलेल्या अतिथींच्या उपकारास त्याचप्रमाणे आमच्या लिंगार्चनासही सहाय्य करतो. तुम्ही आता दुःख न करता लवकर स्नान करून आमच्या वासस्थानाजवळ असलेल्या शिवलिंगाची पूजा वगैरे करावी म्हणजे तुमची व्यथा दूर होईल’ असे सांगून ते सिद्ध गुप्त झाले. अशा प्रकारचे स्वप्न पडलेले पाहून रेणुकादेवी जागी झाली व सभोवताली पाहते तो तेथे कोणीच नाही. तेव्हा ती आश्चर्यचकित झाली व खाली पाहू लागली त्यावेळी तिला एक जाडे वस्त्र दिसले. त्याबरोबर ती म्हणाली, "अहो! हे माझे सुदैवच असावे. असे म्हणून सिद्धांच्या आज्ञेप्रमाणे तिने त्या सरोवरात स्नान केले आणि ते जाडे वस्त्र नेसली व त्या सिद्धांचे दर्शन घ्यावे या उद्देशाने पुढे जाऊ लागली. तेव्हा हिच्या पापाचे क्षालन झाले हे सर्व जगास जाहीर करण्याकरिताच चंद्र देवाचे आगमन झाले की काय असा चंद्रोदय झाला, व अंधार नाहीसा झाला. त्यामुळे रेणुकादेवी संतोष पावून त्या सिद्धयांचे नाव घेत त्यांच्या आश्रमात पोचल्या तेव्हा देवीच्या डोक्यावर जलबिंदु पडले व त्यांचा ताप थोडासा शांत झाला. रेणुकादेवीने आश्चर्याने वर पाहिले तेव्हा त्यांना तेथे त्या सिद्ध्यांच्या चंदनी पादुका दिसल्या. या पादुकांवरील जलबिंदू माझ्यावर पडल्यामुळेच माझ्या देहाचा ताप थोडासा शांत झाला हे निःसंशय म्हणुन त्या पादुका घेऊन रेणुकादेवी पुनः सरोवराकडे गेल्या आणि त्या पादुका त्या सरोवराच्या पाण्यामध्ये धुवून तेथे पुनः तिथे स्नान केले. त्यामुळे रेणुकादेवीचा देह ताप समूळ नष्ट झाला व तिचे कृष्णवर्ण झालेले शरीर पुनः पूर्वीसारखेच उज्वल झाले. हा सर्व चमत्कार पाहुन त्या साधूचे महात्म्य गात आनंदतिशयाने रेणुकादेवीनी त्या पादुका आपल्या गळ्यात घालून त्या सिद्धांच्या आज्ञेप्रमाणे शिवलिंगपूजा केली आणि त्याचे पादतीर्थ व त्यांनी दिलेला पंचामृत प्रसाद सेवन करून त्यांची स्तुति-स्तोत्रे गात त्या तेथेच विश्रांतीसाठी बसल्या.
 
दुसरे दिवशी सूर्योदय होताच "गुरुवर्य, माझ्या पतीनी दिलेल्या शापापासून माझा उद्धार करा अशी देवीनी हात जोडून त्यांना प्रार्थना केली. त्यावर ते सिद्ध म्हणाले, ’देवी, तू त्याप्रमाणे तीन दिवस या सरोवरातील जलाने स्नान करून येथील शिवलिंगाच निष्ठापूर्वक पूजा कर व भक्तांच्या घरी भिक्षा मागून मिळालेल्या धान्याचा अर्धा भाग आम्हास देऊन उरलेला अर्ध्या भागाच अन्न तयार करून ते तू सेवन करव व तीन दिवसांनंतर तू तुझे पति जमदग्नी ऋषि यांचे दर्शन घे. असे झाले तरी तुला त्यांच्यापासून प्रायश्चित्त मिळून तू श्री शंकरांच्या आज्ञेने तीन निमिषांचे वैधव्य भोगून नंतर पुनः सुवासिनी होशील व जगद्वद्यही होशी. आता यापुढे तु कसलीही चिंता न करिता येथे राहून तुझे व्रत पुरे कर अशी सिद्धांनी आज्ञा केली. त्यावर एकनाथ-जोगिनाथ उत्कृष्टोभव (उद्‌भवो) असा नामोच्चार करीत भिक्षेने मिळालेल्या धान्यापैकी अर्धे धान्य रेणुकादेवी त्यांना अर्पण करून उरलेले आपण सेवन करू लागली. चौथ्या दिवशी रेणुकादेवीने स्नान-पूजा आटोपून गुरु-पादुका आपल्या बरोबर घेतल्या व रामश्रृंगावरील आपल्या पूजास्थानी ती जाऊन पोचली. तेव्हा हिला पाहून इतर ऋषिपत्‍नींनाही आनंद झाला, व त्यांची चिंताही दूर झाली. नंतर रेणुकादेवीने त्या गुरुपादुका आपल्या पूजास्थानी ठेवल्या व गुरुचे ध्यान करीत जमदग्नी ऋषींच्या स्थानाकडे जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार केला व उठून त्यांच्याकदे दयादृष्टीने हात जोडून ती मागे सरून उभी राहिली. तीन दिवस न भेटलेल्या रेणुकादेवीस पाहून ऋषि अत्यंत क्रृद्ध झाले व ते तिला म्हणाले, "हे महापापी स्त्रिये, तू पुनः मला भेटलीस! जा माझ्या समोर उभि राहू नकोस." हे त्यांचे क्रोधवचन ऐकून रेणुकादेवी कळवळून मागे सरून उभी राहिली.
 
या पुण्याश्रमामध्ये रेणुकादेवी व तिच्या चार पुत्रांच्या प्राणहत्येने उत्पन्न झालेली भीषण परिस्थिती
 
जमदग्नी ऋषींनी वसु-विश्वावसु-बृहद्‌भान-बृहत्कण्व या आपल्या चार पुत्रांना बोलावून ते त्यांना म्हणाले, ’या क्रूर व चंचल अशा स्त्रीचे डोके उडवा’ ही चांडाळीण आमच्या आश्रमात राहून उपयोगी नाही. असे संतापाने डोळ्यातून अग्निच्या ठिणग्या टाकीत त्यांनी सांगितले. पण ते पुत्र तसेच एकीकडे उभे राहिले. हे पाहुन "हे भ्रष्ट हो, पित्याची आज्ञा मुलांना मान्य असावयास पाहिजे. पण ती तुम्ही अवमानित आहात हे तुम्हास योग्य वाटते काय ? आता तुम्ही कोनताही संशय मनात न आणता माझी आज्ञा शिरसावंद्य मानून हिचा शिरच्छेद करा.’ त्यावर ते पुत्र त्यांना म्हणाले, "पित्यापेक्षाहि शंभर पटीने माता श्रेष्ठ आहे असे श्रृतिवाक्य आहे ते धिःकारून निरपराधी अशा या आमच्या मातेचा वध करून या मातृहत्या पापास धनी व्हावे काय ? आम्ही सर्वथा या मातेची हत्या करणार नाही’ असे म्हणून ते न भिता जमदग्नि ऋषिसमोर येऊन उभे राहिले. हे पाहून जमदग्नींचा क्रोध अनावर झाला व त्यांनी आपल्या पुत्रावर कोपास्त्राचा प्रयोग केला. तेव्हा ते सर्व मूर्च्छित होऊन जमिनीवर पडले. हे घातक कृत्य पाहून रेणुकादेवी पुत्रवात्सल्याने त्यांच्यावर पडुन अत्यंत दुःख करू लागली. ही दुःखद घटना व भीषण परिस्थिती पाहून तेथे असलेले ऋषि व ऋषिपत्‍न्या घाबरून गेल्या. इकडे जमदग्नींनी कैलासाकडे हात करून "रामभद्रा, रामभद्रा" अशी हाक मारली, त्याबरोबर रामभद्र येऊन आपल्या पित्याचे सन्मुख उभा राहिला. रामभद्र आलेला पाहून दुःख करीत असलेली रेणुका एकदम चट्टदिशी उठली आणि रामभद्राच्या तोंडाकडे पाहू लागली. तेव्हा जमदग्नी रामभद्रास म्हणाले, ’हे रामभद्रा ! चंचलमनाच्या व महापापी अशा या दुष्टेचे शिरच्छेदन करण्यास तुझ्या चारही भावांना सांगितले असता त्यांनी ते मान्य केले नाही. पहा, ते भूमीवर कसे निश्चेष्ट पडले आहेत. आता तू विलंब न करता हिचे शिरच्छेदन कर’ असे जमदग्नी ऋषी म्हणाले. तेव्हा परम ज्ञानी अशा रामभद्राने पित्यास प्रत्युत्तर न करता आपल्या हातातील अंबिका अस्त्राने रेणुकादेवीच्या शिरास स्पर्श केला, त्याबरोबर देवी भूमीवर पडली.
 
रामभद्राच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी त्याचप्रमाणे चारहीपुत्रांचा प्राण परत आणला व आपल्या जवळील क्रोध त्याग केला.
 
इतके झाल्यावर रामभद्राच्या पितृभक्तीने प्रसन्न झालेल्या जमदग्नीने त्यास संतोषाए आपल्याजवळ बसवून घेतले व त्याच्या मस्तकावर आपला हात फिरवून ते त्याला म्हणाले, "पुत्रा मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तुला जे मागावयाच असेल ते मागून घे.’ मी तुला ते तात्काळ देईन. त्यावर राम