शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (15:31 IST)

श्री रेणुका देवी माहात्म्य अध्याय ३

Shri Renuka Devi Mahatmya bhag 3
रेणुकराजाची संततीची इच्छा अगस्तिऋषींनी पूर्ण केली.
 
इकडे रेणुकराजा सार्‍या काश्मीर देशाचा अधिपति झाला त्यावेळी त्यास अत्यंत कुशलगति व देशभक्त असे मंत्रि व सेनापति लाभले होते. इतकेच नव्हे तर त्याच्या राज्यामध्ये नीति व सदाचार संपन्न असेच प्रजाजन होते. अशा या सद्‌भक्तिसंपन्न राजाचे कुभोद्‍भव अगस्तिमुनि गुरु होते. अशी राजाची प्रथम कन्यका भोगावती ही त्याची पट्टराणी होती. या राणीच्या सहाय्याने व गुरुच्या आशिर्वादाने रेणुकराजा अत्यंत गौरवाने राज्यकारभार चालवीत असता आपणास संतति नसल्याची चिंता त्यास जाणवू लागली आणि त्याकरिता त्याने संततीच्या आशेने १०-२० कुमारिकांशी विवाहही केला; तरीसुद्धा त्यास संतति झाली नाही. यामुळे राजा अत्यंत उदास झाला. आपण राज्यकारभार पाहण्याचे सोडून देऊन त्याने तो आपल्या पट्टराणीचा चुलत भाऊ चंद्रकांत याजवर सोपविला व मंत्र्यांनाही चंद्रकांताशी सहकार्य करून दक्षतेने राज्यकारभार चालविण्याबद्दल प्रजाजनांसमक्ष सूचना देऊन आपण पट्टराणी भोगावती व काही थोडा परिवार घेऊन तीर्थयात्रेस जाणेकरिता निघाला. गया-हरिद्वार-केदार-बद्रा इत्यादी क्षेत्रांची यात्रा संपवून राजा काशीयात्रेस आला. तेथे गंगास्नान करून विश्वनाथ-विशालाक्षी-अन्नपूर्णा-कालभैरवादि देवतांना रुद्राभिषेक, कनकाभिषेक व कुंकुमार्चनादि करवून पंचक्रोशाचे विधान आचरीत असता त्यांना अकस्मात्‌ अगस्त्यगुरुचे दर्शन झाले. राजाराणींनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळी गुरुंनी त्यांना तुमचे कल्याण असो असा आशिर्वाद दिला व राजधानी सोडून किती दिवस झाले, राज्यकारभार कोणावर सोपविला वगैरेची चौकशीहि केली आणि ते राजास म्हणाले, राजा तुला व तुझी पत्‍नी भोगवती हिला कसल्यातरी चिंतेने ग्रासले असावे असे तुमच्या मुखावरून दिसते. तरी सर्व काही मला सांगा. श्री विश्वेश्वर तुमची सारी चिंता दूर करील. हे ऐकून राजा म्हणाला, "हे सद्‌गुरु मी काय सांगू ? आम्हास संतति नसल्यामुळे आम्ही जननिंदेस पात्र होत आहोत याचेच आम्हास दुःख होत आहे व त्याच्या शांतिकरिता राज्यभार चंद्रकांतावर सोपवून आम्ही तीर्थयात्रा करीत आलो व श्री विश्वेश्वरानेच आम्हास आपल्या पाद दर्शनाचा योग घडवून आणला. हे गुरो ! आपली कृपा आम्हावर व्हावी. राजाचे भक्तियुक्त वचन ऐकून अगस्ति ऋषि म्हणाले, "राजा तुझी भेट झाली, बरे झाले, तू या काशिक्षेत्रातील सर्व विधाने आटोपून त्रिवेणी संगमाच्या पुण्यस्थानी पुत्रकामेष्टी यज्ञास आरंभ कर. या यज्ञाच्या मुखातून एक कन्यका उद्‍भवेल. ती कन्यका जगद्‌द्धोर करील. या यज्ञकार्यामध्ये मी तुझ्याशी सहकार्य करीन." असे म्हणून त्यांनी राजास निरोप दिला. या गुरुवाक्याने राजाराणी संतोष पावली व त्यांनी आनंदाने या क्षेत्रातील आपली विधाने संपवून ते आपल्या राजधानीस परत आले आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे आपण हाती घ्यावयाच्या यज्ञकार्याची माहिती सर्वास सांगून त्याच्या साधनसामुग्रीची त्यांनी तातडीने जुळवाजुळव केली व चंद्रकांताचा भाऊ सूर्यकांत याजवर राज्यकारभार सोपवून चंद्रकांत व इतर मंत्रिपरिवारासमवेत रेणुकराजा त्रिवेणी संगमावर आला.
 
रेणुकराजाने आरंभिलेल्या यज्ञकुंडामध्ये श्री रेणुकादेवीची उत्पत्ती
 
अगस्तिऋषींच्या आज्ञेप्रमाणे या यज्ञास येण्याकरिता रेणुकराजाने आधीच आमंत्रण दिलेले इंद्रादि अष्टदिक्पालक, अत्रि-वशिष्ठ-गार्ग्य-गौतम-पराशर-पौलस्त्यादि सर्व वेदशास्त्रपारंगत मुनिजन तसेच बरेचसे राजे-रजवाडे या सर्वांनी येऊन रेणुक राजास भेटी दिल्या. रेणुकराजा संतोष पावून त्याने अगस्तिऋषींच्या आचार्यत्वाखाली यज्ञकार्यास आरंभ केला. या यज्ञामध्ये पार्वती-परमेश्वर, लक्ष्मीनारायण इत्यादि समस्त देवतांप्रीत्यर्थ अग्निदेवास होमद्रव्ये विधानोक्त अर्पण होऊ लागली. आणि त्यातून निघालेल्या, सुगंधित अशा धूमाने आकाश व्यापून गेले, इतकेच नव्हे तर तेथे ऋषींच्या मुखाने निघालेल्या, ’वाहा’ काराचा निनादही सर्वत्र भरून राहिला. आता अगस्तिऋषी गायत्रीमंत्रपूर्वक पूर्णाहुति, अर्पण करणार तोच त्या यज्ञकुंडातून दिव्यवस्त्राभरणालंकृत, नवसुगंधीवस्तुविलेपित, सर्वांगसुंदर व सुकुमार कन्यका अग्निप्रभेप्रमाणे तेजस्वी आणि हास्यमुखी अशी प्रकट झाली. तेवढ्यात अग्नि देव शांत झाल्याने या कन्यकेवर आकाशातून आनंदसूचक पुष्पवृष्टि झाली व देवदुंदुभीचा आवाज सर्वत्र व्यापून राहिला. हे पाहून तेथे जमलेल्या सर्व लोकांनी जयजयकार केला आणि त्या सुलक्षणी कन्यकेच्या लावण्यातिशयाची तारीफ करून ही देवी की पार्वती, गौरी वा गंगांबिका, की सौभाग्यसंपन्न लक्ष्मी अशी शंका प्रकट करू लागले. तेव्हा अगस्तिऋषींनी तिला उचलून घेऊन प्रेमाने ह्रदयाशी कवटाळले, आणि रेणुकराजाच्या मांडीवर तिला बसवले. राजाच्या डाव्या बाजूस बसलेल्या भोगावती राणीस या कन्यकेस प्रेमलिंगन देण्याची इच्छा झाली आणि तिने आपले दोन्ही हात पुढे केले तेव्हा रेणुकाराजाने त्या कन्यकेस राणीच्या हाती दिले. राणीने तिला ह्रदयाशी धरले तेव्हा एकदम तिच्या स्तनांतून अमृतमय अशा दुग्धधारा वाहू लागल्या. राणीने त्या कन्यकेस स्तनपान करविले व तिला आपल्या मांडीवर बसवून घेतले; तेव्हा ती कन्यका आपले हातपाय हलवून नानाप्रकारचे बाललीलेचे चाळे करू लागली त्यावेळी देव लोकातून पुष्पवृष्टी झाली व देवदंदुभिचा आवाज ऐकू येऊ लागला. हे पाहून सर्व लोक संतोषभरित झाले व त्यांनी यज्ञसमाप्ति केली. नंतर रेणुकराजाने या कार्यास उपस्थित झालेल्या सर्व ऋषींना तसेच राजे लोकांना त्यांच्या इच्छेनुसार धन-कनक-वस्त्रादि देऊन त्यांचा सत्कार केला. मग सर्व लोक आपापल्या स्थानास निघून गेले.
 
रेणुकराजा गुरु अगस्ति ऋषिसमवेत आपल्या राजधानीस परत आला ती कथा
 
इकडे रेणुक राजा अगस्तिऋषींच्या आज्ञेप्रमाणे चंद्रकांत व मंत्री परिवार समवेत आपल्या राजधानीस परत आला त्यावेळी हे सर्व वैभव पाहिलेल्या प्रजेने सारे शहर पल्लवतोरणादिकांनी अलंकृत करुन राजाज्ञेप्रमाणे श्रीदुर्गादेवीस कनकाभिशेक व कुंकुमार्चन त्याचप्रमाणे गावातील हरिहरादि देवांची यथाविधि पूजा वगैरे केली. राजाने व भोगवती राणीने गुरुची पादपूजा करून पादतीर्थ प्राशन केली. मुलीची बाललीला संतोषाने पाहात असतानाच नामकरणाचा तेरावा दिवस प्राप्त झाला. त्या दिवशी रत्‍नखचित अशा पाळण्यात मुलीस निजवून सुवासिनींच्या कडून गुर्वाज्ञाप्रमाणे तिला "रेणुकादेवी" असे नाव ठेवविले. सुवासिनींनी आनंदाने मंगलगीते गाइली व राजा-राणीकडून सत्कार पावून त्या आपापल्या स्थानी परत गेल्या.
 
दुसरे दिवशी अगस्ति गुरुंनी आपली शिवलिंग पूजा वगैरे आटोपून राजाराणीस व चंद्रकांतास आपल्या सन्निध बोलावले व म्हणाले की, हे "सन्मान्य राजा, देवमाता अदिती देवीच अयोजित होऊन यज्ञकुंडात उद्‍भवून तुम्हास मुलगी म्हणून रेणुकादेवी या नावाने प्राप्त झाली. वसंतकालातील वैशाख शुद्ध द्वितीया मंगळवार हा हिचा जन्मदिवस होय. हिचा महिमा पुढे तिन्ही लोकात विशेष प्रसिद्ध होईल; हिचे पालनपोषण मात्र तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक करावे. आम्ही यानंतर दक्षिणेकडील विंध्यराजाच्या निमंत्रणाप्रमाणे तिकडे प्रयाण करून त्याच्या पुण्याश्रमात अनुष्ठानास बसणार आहोत. तुमच्यावर केव्हाही श्री दुर्गादेवीची कृपा आहेच." असे सांगून राजा-राणींनी दिलेल्या गुरुदक्षिणेचा स्वीकार करून आणि त्यांन आशिर्वाद देऊन अगस्ति ऋषि आपल्या शिष्यांसमवेत विंध्यराजाच्या स्थानास गेले, अशी ही कथा सूत ऋषींनी शौनकादि मुनींनी निवेदन केली.
 
सवर्त मत्सरामुळे रेणुकादेवीचा प्राणघात करण्याचा यत्‍न केला ती अद्‌भुत कथा
 
गर्वाज्ञेप्रमाणे राजा-राणी, चंद्रकांत वगैरे श्री दुर्गादेवीचे ध्यान करीत व रेणुकादेवीची काळजीपूर्वक जोपासना करीत तिची बाललीला पाहून आनंदित होत असताना राजाच्या इतर स्त्रियांनी केवळ सवती मत्सराने प्रेरित होऊन रेणुका देवीचा जीव घेण्याच्या इराद्याने एका गारुड्याकडून घटसर्प आणविला व राजा शिकारीस गेल्याची संधि साधून आणि सायंकालचे सुमारास कोणी नाही असे पाहून त्या गारुड्याकडून तो सर्प रेणुकादेवीच्या पाळण्याखाली सोडविला व त्या गारुड्यास राजवाड्यातील गुप्तमार्गाने बाहेर काढले. पुढे तो साप फुत्कार करीत पाळण्याच्या दोर्‍यावर चढला तोच तो खड्‌गाने कापल्याप्रमाणे दोन तुकडे होऊन खाली पडला. इतक्यात दिवेलागणीची वेळ झाल्यामुळे चंद्रकांत हातात दिवा घेऊन पाळण्याच्या बाजूस गेला तेव्हा त्यास कापून तीन तुकडे झालेला घटसर्प दिसला. ते पाहून तो घाबर्‍या घाबर्‍या बाहेर आला व त्याने ही भयंकर बातमी राणी भोगावतीस कळविली. राणी गडबडीने चंद्रकांतासमवेत पाळण्याजवळ आली आणि अहो ! सर्पापासून रेणुकादेवीस बाधा झाली असेल काय ? असे म्हणुन पाळण्यात पाहते तो रेणुकादेवीने हातपाय हालवीत हास्यमुखाने मातेकडे पहात आपले चिमुकले हात पुढे केले; तेव्हा बाळा ये, आज तुझ्यावरील मृत्यूचे संकट टळले असे म्हणून राणीने तिला ह्रदयाशी धरून तिचे पटापट मुके घेतले.
 
इतक्यात शिकारीस गेलेला राजा परत आला व त्याने अद्‌भुत वार्ता ऐकली आणि तो राणीजवळ आला व सुखरुप असलेल्या आपल्या पुत्रीस पाहून राणीस म्हणाला, प्रिये, त्या सर्पाची बाधा दूर झाली ना? असे म्हणून स्वतः पाळण्याजवळ जाऊन तुकडे तुकडे झालेल्या सर्पास प्रत्यक्ष पाहू चंद्रकांतास सर्पाचे दोन्ही तुकडे काढून टाकून ती जागा शुद्ध करणेस व राणीस नेहमीप्रमाणे रेणुकादेवीस स्नानास घालणेस सांगितले व आपण देवीचे दर्शनास गेला. दुर्गादेवीचे दर्शन घेऊन व तिच्या हातातील रक्तांकित खड्ग पाहून राजा म्हणाला, "देवी, आपणच त्या सर्पाचा संहार केला ही आता मला खात्री पटली. गुरु अगस्तिऋषींनी मजवर आपली पूर्ण कृपादृष्टी असल्याचे सांगितले होते ते अन्यता कसे होईल ? असे म्हणून राजाने चंद्रकांतास बोलावून श्री दुर्गादेवीच्या हातातील रक्तरंजित खड्‌ग त्यास दाखविले व म्हणाला, 'पहा देवीनेच त्या सर्पास मारिले हे खरे झाले. तू राणी भोगावतीस ही हकीकत कळीव मी स्नान करून श्री दुर्गादेवीची पूजा करतो असे सांगून व त्याप्रमाणे पूजा संपवून राजाने दुर्गादेवीस प्रसाद अर्पण केला, व तो प्रसाद सर्वांनी सेवन केला.
 
या दुष्टकार्यास प्रवृत्त झालेल्या इतर राजस्त्रिया एकामागून एक आल्या व राजापुढे हात जोडून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "प्राणप्रिया, या क्रूर कर्माच्या घटनेस आम्ही कारणीभूत आहोत. श्री दुर्गादेवीने आम्हास प्रायश्चित्त दिले आहे. आता यापुढे आम्ही सवतीमत्सर भाव सोडून, राणी भोगावतीशी सख्या बहिणीप्रमाणे वागून तिच्या सेवेत सदैव तत्पर राहू. आपण आमच्या चुकीची क्षमा करावी." राजा म्हणाला, "तुमच्या चुकीची क्षमा दुर्गादेवीच करणार तिजपुढे तुम्ही तुमच्या अपराधाची क्षमा मागा; त्यास त्या स्त्रिया कबूल झाल्या. व राजास त्याचप्रमाणे भोगावती राणीसही त्या नमस्कार करून गेल्या. अशी ही कथा शौनकादि मुनींनी सूतमहर्षिंना सांगितली. ती ऐकून ते आनंदित झाले व पुढील कथा श्रवण करण्यास आतुर झाले.
 
अगस्तिऋषींच्या आज्ञेप्रमणे श्री रेणुकादेवीचा जमदग्नीशी विवाह करणेचा निश्चय झाला ती कथा.
 
रेणुकादेवीची बाललीला पहात राजा-राणी आनंदाने रहात असता रेणुकादेवी सुवर्णवल्लीप्रमाणे दिवसें दिवस वाढू लागली व तिला आठवे वर्ष लागले, तशी तिच्या विवाहाची चिंता राजास लागली. राजाने योग्य वराच्या शोधार्थ आपल्या मंत्र्यास पाठविले. मंत्र्याने अनेक राजाधिराजांची वगैरे पुष्कळ स्थळे पाहिली पण रेणुकादेवीच्या रूप लावण्यास अनुरूप असा वर कोठेच मिळाला नाही म्हणून ४-६ महिने प्रवास करून मंत्री परत आपल्या राजधानीस आला व राजास म्हणाला, "महाराज, आम्ही इतके दिवस सर्वत्र संचार केला पण आपल्या पुत्रीच्या रुपास अनुरुप असा वर आम्हास कोठेच आढळला नाही." ही बातमी ऐकून राजा विशेषेच चिंताग्रस्त झाला व देवीचे ध्यान करीत झोपी गेला. श्री दुर्गादेवी राजाच्या स्वप्नात येऊन त्यास म्हणाली, 'राजा तू रेणुकादेवीच्या विवाहाची चिंता करू नकोस. तुम्हास तुमचे गुरु अगस्तिऋषि लवकरच येऊन भेट देतील व आशिर्वाद देतील आणि त्या योगे तुझी मनीषा पूर्ण होईल, असा आशिर्वाद देऊन देवी अंतर्धान पावली व पुढे थोड्या वेळाने राजा जागाच झाला. इतक्यात सूर्योदय झाला तेव्हा राजाने ही स्वप्नाची आनंदप्रद अशी बातमी राणीस कळविली व तो नित्याप्रमाणे चंद्रकांतसह देवीची षोडशोपचाराने पूजा करून गुरु अगस्तिऋषींच्या आगमनाची वाट पहात व त्यांचेच ध्यान करीत राहिला.
 
गुरु अगस्तिऋषींनी रेणुक राजाची मनीषा पूर्ण केली ती कथा
 
इकडे गुरु अगस्तींनी रेणुक राजाची चिंता दूरदृष्टीने जाणून लागलीच रेणुक राजाची भेट घेतली. गुरुच्या आगमनाने राजा अत्यंत आनंदित झाला व राणी आणि चंद्रकांतासमवेत सर्वांनी त्यांना नमस्कार केला; तसाच सत्पुत्री रेणुकादेवीनेहि गुरुना नमस्कार केला. तेव्हा ये बाळा ये, असे म्हणून गुरुंनी तिला आपल्याजवळ बद्रासनावर बसवून घेतले व तिच्या मस्तकावर आपला हस्त ठेवून रेणुक राजाकडे कृपापूर्ण दृष्टीने पाहिले आणि सर्वांचे क्षेम विचारले व राजाचे मनोगत काय आहे ते निवेदन करण्यास सांगितले. राजा म्हणाला, गुरुवर्य मी काय सांगू ? रेणुकादेवी विवाहास योग्य झाली आहे हे पाहून मी आपल्या मंत्र्यास अनुरूप वराच्या शोधासाठी पाठविले. त्यांनी ५-६ महिने सर्वत्र संचार केला व हिच्या अनुरुप असा वर कोठेच आढळत नाही अशी बातमी आणली. यामुळे मी चिंतातूर होऊन श्री दुर्गादेवीचे ध्यान करीत निद्रावश झालो. तेव्हा सर्वाभरणभूषित अशी देवी स्वप्नात येऊन मला मार्गदर्शन देऊन म्हणाली, "गुरु अगस्ति लवकरच येऊन तुझ्या पुत्रीच्या विवाहाची चिंता दूर करतील." असे म्हणून देवी अंतर्धान पावली. मी या देवीच्या वचनावर आपल्या आगमनाची वाट पहात होतो. आपण आला, आम्हास दर्शन दिले. आता आपणच आमची इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहात असे राजा म्हणाला. ही राजाची विनंति ऐकून अगस्ति ऋषि म्हणाले, "हे राजा तू चिंता करू नकोस. येथून दक्षिण दिशेकडे अत्यंत महिमास्पद अशा मलापहारी नदीच्या काठी सिद्धाचल म्हणून सर्वांना सिद्धी देणारे असे एक ऋष्याश्रम आहे. त्या ठिकाणि हजारो ऋषि आपापल्या इच्छेप्रमाणे यज्ञयागादि सत्कर्मात निरंत आहेत. अशा या पवित्र ठिकाणी ऋषीमध्ये श्रेष्ठ असे रुचिकमुनी चतुर्वेद-षट्‌शास्त्र पारंगत आहेत त्यांना पतिव्रता शिरोमणी अतिथि-अभ्यागतांचे आदरातिथ्य करणारि अशी सत्यवती नामक एक पत्‍नी आहे आणि अशा या दंपतीस शिवांशसंभूत असा जगदग्नि नावाचा एक सत्पुत्र असून तो रुचिक मुनींच्या अनुग्रहास पात्र असा आहे. आणि हाच वर तुझ्या रेणुकादेवीस अत्यंत अनुरूप आहे. करिता चंद्रकांतास मंत्र्यासमवेत ताबडतोब रुचिकमुनीचे आश्रमास पाठवून त्यांना तुमची विनंति कळविल्यास तुझी इच्छा पूर्ण होईल." असे सांगून अगस्तिऋषि आपल्या स्थानास निघून गेले.
 
नंतर रेणुकराजाने चंद्रकांतास त्याचप्रमाणे आपल्या मंत्र्यासही गुरुची आज्ञा कळविली व तुम्ही रुचिकमुनींकडे जाउन आमची कन्या रेणुकादेवी हिचा विवाह त्यांच्या जमदग्नि नामक पुत्राशी करणेचा आमचा विचार त्यांना कळवून त्यांची आज्ञा घेऊन यावे असे सांगितले. त्याप्रमाणे ते सिद्धाचलास गेले व रुचिकमुनींचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला. रुचिकमुनींनी त्यांच्या आगमनाचे कारण विचारून सर्वांचे क्षेमकुशलही जाणून घेतले. त्यावर चंद्रकात व मंत्री म्हणाले, "हे यतिश्रेष्ठा, गुरु अगस्तींनी आमच्या राजास त्यांची पुत्री रेणुकादेवी हिचा विवाह तुमच्या जमदग्नि पुत्राशी करून देण्याबद्दल आज्ञा केली आहे म्हणुन आम्ही त्या कार्याकरिता आपल्या चरणसन्निधीस आलो आहोत. हे त्यांचे बोलणे ऐकून रुचिकमुनी म्हणाले, "आम्ही आपल्या सदिच्छेस संमति देतो." नंतर रुचिक मुनींनी आपल्या पुत्रास बोलाविले. जमदग्नि इतर ऋषिकुमारासमवेत आपल्या पित्यांच्या सन्निध आला व त्यांना प्रणिपात करून एकीकडे बसला. तेव्हा त्याच्या ब्रह्मचर्याचे तेज चंद्रकांत व मंत्री या दोघांनाही प्रत्यक्षच दिसले. ते पाहून ते उभयताही संतुष्ट झाले. रुचिकमुनींनी त्यांचा मनोभाव जाणून आपल्या पुत्राकडे कृपादृष्टीने पाहिले व तेथेच जवळ बसलेल्या ऋषिकुमारांना उद्देशून ते म्हणाले, "हे ऋषिकुमारहो ! काश्मीर देशाच्या रेणुकराजाने आपली कन्या रेणुकादेवी हिचा विवाह आमच्या जमदग्नि पुत्राशी करून देण्याच्या विचाराने आपल्या मंत्र्यास वगैरे इकडे पाठविले आहे ही मंगलवार्ता तुम्हास कळली ना ?" असे हास्यमुकाने रुचिकमुनी त्यांना म्हणाले. हे ऋषिवर्य आपल्या इच्छेनुरुपच वागणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे; आपला कुमार जमदग्निही आपल्या इच्छेनुरुपच वागणार आहे. असे सर्व ऋषिकुमार म्हणाले व ते आपापल्या वेदाध्ययनादि कार्याकडे व यज्ञयागादि कृत्याकडे वळले.
 
इकडे रुचिकमुनींनी सत्यवतीस बोलावून तिला जमदग्नीचा विवाह कशाप्रकारे करावयाचा त्याची सूचना दिली व या कार्याकरिता येथवर आलेल्या रेणुकराजाच्या परिवाराच्या आदरातिथ्याची कामगिरी तिजवर सोपविली. तिनेही त्याप्रमाणे त्यांचा यथोचित सत्कार केला. रुचिकमुनींनी चंद्रकांत व मंत्री या दोघानाही आपल्याकडे बोलावले. व "हे चंद्रकांता, तुमच्या विनंतीस, आम्ही संमति दिलेली आहे" असे त्यास कळविले. ते ऐकून चंद्रकांत म्हणाला, 'हे ऋषिश्रेष्ठ आम्हासही आपल्या वचनाने अत्यंत संतोष झाला आहे. आपल्यासारख्या सूज्ञाना आम्ही जास्त काय सांगणार आहोत ? तेव्हा आता आम्हास आपण रेणुकादेवी जमदग्नि यांचा विवाहाचा निश्चित काल तेवढा कळविल्यास आम्ही येथवर ज्या कार्यासाठी आलो त्या कार्याची पूर्तता होणार आहे असे चंद्रकांत व मंत्री ऋषींना म्हणाले. त्यावर ऋषींनी बरे आहे असे म्हणून आपल्या आश्रमातील इतर ऋषी पत्‍नींना बोलावून आणविले व सर्वांच्या संमतीने वैशाख शुद्ध ३ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हे कार्य सिद्धाचलावर करणेची तयारी करावी असे तुमच्या राजास कळवा असे त्यांनी सांगितले. हे ऐकून चंद्रकांत संतुष्ट होऊन मंत्रीसमवेत आपल्या राजधानीस परत गेला.
 
त्यांच्या आगमनाची अत्यंत आतुरतेने वाट पहात असलेला राजा त्यांना आलेले पहाताच त्यांना म्हणाला, "हे चंद्रकांत व मंत्रीवर्यहो ! तुम्ही गेलेले कार्य सफल झाले ना ? त्यावर ते म्हणाले, गुरु अगस्तिऋषींच्या कृपेने कार्यसिद्धी झाली. त्या सिद्धाचलाची किर्ती सर्वत्र पसरली याचे मुख्य कारण, तेथे असलेल्या रुचिकमुनींची पतिभक्तिपरायण पतिव्रता शिरोमणि अशा सत्यवतीची पतिभक्ति हेच असले तरी रुचिकमुनींचे तपोबल हे ही एक प्रबल कारण आहे अशी त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाने आमची खात्री झाली. त्यांचा सत्पुत्र जमदग्नीही मातापित्यांच्या भक्तीने युक्त असा त्यांच्या कृपेस पात्र होऊन ब्रह्मचर्याच्या तेजाने तळपतो आहे आणि तोच आमच्या रेणुकादेवीस अत्यंत अनुरूप असा वर आहे. आम्ही त्या पुण्याश्रमाचा महिमा प्रत्यक्ष पाहूनच आपणास हे सर्व विदित केले आहे. तेव्हा राजा म्हणाला, "हे चंद्रकांत तुम्हाला झालेल्या संतोषावरुन मला सर्व काही समजून आले आहे तरीही पुढील विवाहाची रुपरेषा मला समजावून सांगा. त्यावर ते म्हणाले, "प्रभो, याच वैशाख शु. ३ तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्या सिद्धाचलावरच विवाह कार्य उरकून घेणेच आहे असे तुम्हास कळविणेबद्दल रुचिकमुनींनी आज्ञा केली आहे. तेव्हा पुढील सर्व कार्याचा भार सर्वस्वी आपणावरच आहे ही शुभसूचना ऐकून राजा अत्यंत आनंदित झाला व गुरु कृपेचे स्मरण करीत म्हणाला. "हे मंत्रिवर्या, या राज्यकारभाराचा भार तुझ्यावर आहे, मग मी काय सांगू असे म्हणुन व त्यांना आज्ञा करून आपणास कळलेल्या आनंदाची वार्ता आपली राणी व इतर स्त्रिया यांना कळविणेकरिता राजा गेला. त्या बातमीने त्या सर्वांना अपरिमित आनंद झाला अशी हि कथा सूतऋषींनी शौनकादिमुनींना कळविली व पुढे होणार्‍या रेणुकादेवी-जमदग्नि यांच्या विवाहाची माहिती सांगू लागले.
 
रेणुकराजा रेणुकादेवीच्या विवाहासाठी सिद्धाजलावर जाणेस निघाला ती कथा
 
चंद्रकांताने विवाहाची सर्व तयारी करून राजास कळविले तेव्हा राजाने चंद्रकांताचा भाऊ सूर्यकांत यास व काही मंत्र्यांना राज्यकारभार व्यवस्थित रीतीने चालविणेबद्दल आज्ञा केली व आपण हत्ती, घोडे, रथ इत्यादि चतुरंग दल घेऊन धर्मपत्‍नी भोगावती व इतर एकवीस राण्या, त्याचप्रमाणे पुत्री रेणुकादेवी हिला सुवर्णमय रथात बसवून, बरोबर त्यांची सेवा करण्यास तत्पर अशा दास-दासींना व छत्र-चामर वाद्यांसमवेत, श्री दुर्गादेवीचे ध्वनी सर्वत्र चंद्रकांतासह मंत्रिपरिवारा सहित निघाला. तेव्हा त्याच्या वाद्याचा ध्वनी सर्वत्र करीत व्यापून. राहिला अशाप्रकारे प्रवास करीत गोदावरी तीरावर असलेल्या गौतमऋषींचे दर्शनाशीर्वाद घेऊन ते सर्व पुढे चालले. तेथून ब्रह्मेश्वर, निवृत्तिसांग इत्यादी तीर्थांचे स्नान वगैरे आटोपून घेऊन सायंकाळी सगर राजाच्या देशास आले व त्या राजाकडून तसेच त्यांची धर्मपत्‍नी केशिनीदेवी इजकडून यथोचित सत्कार करून घेऊन तो दिवस त्यांनी तेथेच काढला. दुसरे दिवशी मंदाकिनि तीर्थामध्ये स्नान-दान-धर्म इत्यादि कार्ये उरकून घेऊन सायंकाळी ययाति राजाच्या देशास आले व त्याचा सत्कार स्वीकारुन दुसर्‍या दिवशी उत्तर दिशेस प्रयाण करून सिद्धाचलाचा मार्ग धरला व कृष्णा-मलापहारी यांच्या संगमस्थानी आले. या संगमाच्या ठिकाणी स्नान करून कपिलेश्वर देवास रुद्राभिषेक, कनकाभिषेक वगैरे करून देवाचा प्रसाद सर्वांनि स्वीकारला व दुसरे दिवशी पूर्वेकडे प्रयाण करुन कृष्ण-मलापहारा यांच्यामध्ये असलेल्या तुरुनाडीची राजधानी जे तोरगल त्या ठिकाणी ते सर्व आले आणि तेथील राजाकडून यथोचित आदर सत्कार करून घेऊन तेथे असलेल्या कर्मसिद्ध, ज्ञानसिद्ध, सत्यसिद्ध, कार्यसिद्ध इत्यादि महामहिमांचे दर्शन घेऊन दुसरे दिवशि त्यांनी पूर्वेकडे प्रयाण केले व जवळच असलेल्या मुनिपल्लीस आले आणि तेथे रहात असलेल्या वसिष्ठ मुनींचे दर्शन घेऊन त्यांनी आरंभिलेल्या यज्ञकार्यात जरूर ते सर्व साहित्य पुरविले व त्यांच्या आज्ञेप्रमाणे अमृततीर्थात व उत्तर वाहिनी दुलापहारी नदीमध्ये स्नान केले. नंतर सोमनाथ देवास रुद्राभिषेक करून वसिष्ठ मुनींची पाद्यपूजा केली. सर्वांनी पादतीर्थ आणि लिंग प्रसाद स्वीकारला. नंतर रेणुकराजाने अर्पिलेला नजराणा वसिष्ठ मुनींनी घेतला व रेणुकराजास सहपरिवार आपल्याजवळ बोलावून घेऊन त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारून घेतले व त्यांच्या प्रयाणाचेही प्रयोजन पुसले आणि ते त्यांना म्हणाले, "हे राजा, तुझ्या पुत्रीचा विवाह गुरु अगस्ति मुनींचे आज्ञेने, हजारो ऋषींचे गुरु असे जे रुचिकमुनी त्यांचे पुत्र जमदग्नि यांचेशी होणार आहे हे फार बरे आहे. मी जास्त काय सांगू ? असे राजास सांगून आपल्याजवळच विश्रांती घेत बसलेल्या रेणुकादेवीचे ओटीत वसिष्ठ मुनींनी पंचफले घातली व ते तिला म्हणाले, "हे देवी, तू रेणुकराजाची पुत्री आता जमदग्नीऋषींची पत्‍नी होणार आहेस मग काय ? तू अत्यंत महिमाशाली होऊन अनेक भक्तांची सेवा वगैरे करशील व तुझी सर्व जगात कीर्ति होईल." असा त्यांनी आशिर्वाद तिला दिला. हे पाहून राजास व त्यांच्या परिवारातील लोकांना अत्यंत संतोष झाला. नंतर वसिष्ठ ऋषी म्हणाले, "हे राजा. ऐक. येथून पश्चिमेकडे तीन कोसावर पूर्वी श्री पार्वतीदेवीने घोर तपाचरणाने श्री शंकरास प्रसन्न करून घेतले व त्याचेबरोबर विवाह करून घेतला, त्या पवित्र जागी सोगल ऋषींनी आपला आश्रम स्थापन केला आहे,, अशा या पवित्र ठिकाणि सुवर्णाक्षीर्लिंग, श्री विरभद्र भद्रकाळी व पार्वती-परमेश्वराची देवालये असून तेथे दोन धबधबेही आहेत. या खालच्या धबधब्याजवळ श्री दुर्गादेवीची मूर्ती व गायत्री तीर्थ दिसून येतील. तेथून पूर्वेकडे एक योजन अंतरावर मलापहारी नदी उत्तरवाहिनी होऊन या उरगाद्रीचे दोन भाग झाले आहेत व तेथे विठोबा मुनींचा आश्रम आहे. तेथून पूर्वेस (इंद्रादिक्क) ५-६ मैलावर श्री क्षेत्र काशी समान असे पूविल्ल क्षेत्र आहे तेथे पूर्वी कल्पांतामध्ये अंधकासुर व तारकासुर असे दोन दैत्य लोककंटक होऊन राहिले होते. तुझे गुरु अगस्तिऋषि यांनी आपल्या तपःप्रभावाने श्री शंकरास प्रसन्न करून घेतले व त्याजकडुन तसेच श्री शंकराचा पुत्र कार्तिक स्वामी यांजकडून अंधकासुर व तारकासुरांचा संहार करविला व त्यामुळे ते जगप्रख्यात झाले आहेत. अशा या महिमाशाली स्थानी अंधकेश्वर-तारकेश्वर व तुमचे गुरु अगस्ति यांच्या नावाने अगस्त्येश्वर लिंग, कपिलमुनींचा आश्रम, तसेच कपिलतीर्थ-नागतीर्थ-काशीतीर्थ इत्यादि तीर्थे आहेत. तेथे सोमनाथसिद्ध नावाचे शिवयोगी शिवलिंग पूजानिष्ट असे आहेत. याचाच एक शिष्य धर्मवर्धन नावाचा राजा शिवभक्तिसंपन्न व गुरुपाद सेवातत्पर असा आहे. व त्याने सिद्धाचलावर असलेल्या रुचिक मुनींच्या व माझ्या यज्ञकार्यास शक्त्यानुसार सहाय्य केले आहे. या ठिकाणि पुष्कळसे साधुसंत रहात आहेत तेथून ईशान्य दिशेस शिरश्रृंग ऋषींचा आश्रम आहे. या ऋषींनी आपल्या तपोबलाने श्री कालिकादेवीस प्रत्यक्ष प्रसन्न करून घेतले असून तिच्याकडुन नरुंद-नलुंद-चुकल-हिरेकुंभ नावाच्या दैत्याचा संहार करवून तपोनिष्ठांचे रक्षण केले आहे. श्री कालिकादेवीने त्या दैत्यांचा ज्या खड्‍गाने संहार केला ते खड्‌ग तेथेच असलेल्या सरोवरात धुतल्यामुळे त्या सरोवरास खड्‌गतीर्थ असे नाव प्राप्त झाले.
 
या तीर्थामध्ये स्नान करून तेथे असलेल्या श्री कालिकादेवीचे दर्शन घेतल्यास सर्व कामना पूर्ण होतात. या आपल्या देशात ही देवी अत्यंत पूज्य आहे येथून नैऋत्य दिशेस एक योजन अंतरावर सुगंधवती नावाचे एक शहर आहे तेथे एकनाथ, जोगिनाथ नावाचे सिद्ध रहात असतात. यांच्या ठिकाणासच लागून सिद्धाचल आहे. तुम्ही तुमच्या पुत्रीच्या विवाहाचे कार्य उरकल्यानंतर मी वर सांगितलेल्या सर्व ऋषींचे दर्शन घेऊन तुमच्या राजधानीस जावे." असे वसिष्ठ ऋषि त्यांना म्हणाले व आशिर्वाद देऊन त्यांनि राजास सिद्धाचलाकडे जाणेस परवानगी दिली.
 
रेणुकराजाने सिद्धाचलावर जाऊन रेणुकादेवीच्या विवाहाचे कार्य उरकून घेतले ती कथा
 
रेणुकराजा वसिष्ठ ऋषींचा आशिर्वाद घेऊन सिद्धाचलाकडे येण्यास निघाल्याची बातमी आधीच समजून घेतलेल्या रुचिकमुनींनी या विवाहाच्या कार्याकरिता येत असलेल्या रेणुकराजाच्या परिवाराचे राजे, महाराजे तसेच अनेक ऋषिवर्गाचे समवेत स्वागत करून आपल्याजवळ त्यांना बोलावून घेतले. रेणुकादेवि व जमदग्नी या दोघांचेही तेथे जमलेल्यांनी दर्शन घेऊन ते शुभलक्षण संपन्न असलेल्यांचे पाहून संतोष प्रकट केला व ती रात्र विश्रांती घेऊन घालविली. दुसरे दिवशी प्रातःकाळीच सर्व लोक उठून त्यांनी आपली स्नानादि कर्मे आटोपून घेतली व वस्त्राभरणभूषित होऊन विवाहस्थानी आले नंतर राजस्त्रियानी व ऋषिपत्‍नींनी जमदग्नी-रेणुकादेवी या उभयतांना तैलाभ्यंगस्नान घातले. नंतर रेणुकराजाने आपल्या राणीसमवेत, रेणुकादेवीस नानातर्‍हेचे अलंकार घालून तिचे जमदग्नीस कन्यादान केले पुढे सूर्योदयानंतर ११ घटकेच्या शुभलग्नावर मांगल्य धारण होऊन विवाहाचे काम आटोपले.
 
या शुभसमयी सर्वत्र देव दुंदुभीचा आवाज ऐकू येऊ लागला. देवतांनीही आनंदसूचक अशी पुष्पवृष्टि रेणुकादेवी-जमदग्नी या उभयतावर केली. नंतर सुवासिनी स्त्रियांनी रेणुका-जमदग्नींना आरती ओवाळून त्यांना श्री मल्लिकार्जुनाचे दर्शनास गेले. सर्वांनी रुचिकमुनि-सत्यवती यांनी तयार केलेला प्रसाद घेऊन ते सर्व आपापल्या स्थानी निघून गेले.
 
रेणुकादेवीस तैलाभ्यंगस्नान घातलेले पाणी साठून राहिले ते तैलतीर्थ झाले. या तीर्थात स्नान केलेले लोक पावन होतात. विवाह-कार्ये समाप्तीनंतर रेणुकराजा आपल्या स्त्रियांसमवेत व परिवारासहित रुचिकमुनी व सत्यवती यांच्याकडे आला व त्यांना नमस्कार करून म्हणाला, 'हे ऋषिश्रेष्ठ, ही माझी आठ वर्षांची कन्या मी रक्षण करून आपल्याकडे दिली आहे आता तिचा येथून पुढील भार सर्वस्वी आपणावरच आहे मी यापेक्षा जास्त काय सांगणार आहे ? इच्या क्षेमसमाचाराची वार्ता मात्र आपण आम्हास वरचेवर कळवावी असे सांगून त्यांचा राजधानीस निघणेकरिता आशिर्वाद मागितला. त्यावर ऋषी म्हणाले, "हे रेणुकराजा, तुझे म्हणणे बरोबर आहे. ही रेणुकादेवी पुढे जगन्माता होऊन फार प्रसिद्धी पावेल. असे झाल्यावर हिच्या संरक्षणाची शक्ति तुमचीहि नाही आमचीही नाही हिच्या संरक्षणाचा भार जगद्‌व्यापी जगदंबिकेवर (महादेवीवर) आहे यात बिलकुल संदेह नाही. हिच्या क्षेम समाचाराची बतमी आम्ही वरचेवर तुम्हास कळवून याजबद्दल बिलकुल काळजी करणेचे कारण नाही. आता आपण आपल्या राजधानीस प्रयाण करावे." अशी रुचिकमुनींनी त्यास आज्ञा केली.
 
राजा-राणी, चंद्रकांत या सर्वांनी आनंदाने रेणुकादेवीस सदुपदेश केला व आम्ही वरचेवर येऊन तुला भेटून जातो असे सांगून तिचे समाधान केले. तेथून निघून एकनाथ-जोगिनाथ, सोगलमुनि, विठोबामुनि वगैरेंचे दर्शन घेतले व पूवल्लि क्षेत्रास येऊन एक दिवस तेथिल सिद्धेश्वर राजाचा यथोचित आदरसत्कार स्वीकारून दुसरे दिवशी सर्वांनी तेथे असलेल्या तीर्थामध्ये स्नान केले आणि अंधकेश्वर, तारकेश्वर, अगस्त्येश्वर इत्यादि शिवलिगांना रुद्राभिषेक केला व राजगुरु सोमेश्वरसिद्ध यांची पादपूजा करुन पादतीर्थ आणि प्रसाद सेवन केला. नंतर त्यांची परवानगी घेऊन शिरश्रृंग ऋषींच्या आश्रमास येऊन तेथील खड्‍गतीर्थात स्नान केले व त्यांनी श्री कालिकादेवीची कुंकुमार्चनाने पूजा करून परिवारसहित भोजन केले आणि शिरश्रृंग ऋषींचा आशिर्वाद घेऊन उत्तराभिमुख होऊन आपल्या राजधानीस स