शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

मराठी शब्दांचा शोध अँपवर

मराठी जगेल का? हा प्रश्न दरवर्षी विविध संमेलनांमधून विचारला जातो. त्यावर चर्चेचे गुर्‍हाळ लावण्यापलीकडे फारसे काही होताना दिसत नाही. त्यातच मराठीचा सराव शालेय जीवनापासून असणारी पिढी झपाटय़ाने कमी होत आहे. ही परिस्थती मानस गाजरे या तरुणाला अस्वस्थ करून जाते आणि यातून तयार होतो ‘मराठी शब्दशोध’ हा खेळ. 
 
‘मराठी शब्दशोध’ हा खेळ अँपच्या स्वरूपात गुगल प्ले-स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. मानस गाजरे हा मूळचा नाशिकचा. झाबुझा लॅब्स या कंपनीचा तो संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. 
 
मराठीची दिवसेंदिवस होत असलेली दुरवस्था ही केवळ मराठीची ओळख पूर्णपणे न झाल्याने होत आहे, हे त्याच्या लक्षात आले. ही ओळख सुलभपणे करून देण्यासाठी त्याला खेळाचे रूप देणे आवश्यक होते. यातून मराठी शब्दशोध या अँपचा जन्म झाल्याचे मानसने सांगितले. झाबुझा लॅब्सने हा खेळ तयार करायला या वर्षी मार्चमध्ये सुरुवात केली. 
 
मानससह अन्य दोघे यावर काम करीत होते. यातून जुलै महिन्यात हा खेळ पूर्णत: तयार झाला. प्रथम एक हजार जणांना हा खेळ खेळायला दिला. 

काही जणांनी शोध घेतल्या जाणार्‍या शब्दांचे शुद्धलेखन पाहण्याचा, तर काहींनी विभागवार किंवा गटवार शब्दांचे संच शोधण्याची कोडी तयार करण्याचा सल्ला मानस आणि त्याच्या टीमला दिला. यातून हा खेळ अधिकाधिक सुधारत गेला. आज या खेळात 300 लेव्हल्स देण्यात आल्या आहेत.