रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. निळू फुले
Written By अभिनय कुलकर्णी|

निळू फुले यांचे निधन

मराठी - हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांचे अन्ननलिकेच्या कर्करोगाने आज, सोमवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून अन्ननलिकेच्या कर्करोगाने ते अंथरूणाला खिळून होते. काही दिवसांपूर्वी पुणे येथील जहांगीर रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मागच्या आठवडात त्यांना अतिदक्षता विभागातून हलविण्यात आले. मात्र अन्न गिळणेही त्यांना शक्य नसल्याने त्यांना सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.

नीळकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुण्यात झाला. लोखंडी सामान व भाजीपाला विक्रीचे त्यांच्या वडीलांचे दुकान होते. निळूभाऊं चे शिक्षण जेमतेम मॅट्रिक. मात्र पहिल्यापासून अभिनयाची आवड आणि ओढ होती. १९५७ मध्ये त्यांनी येरागबाळ्याचे काम नोहे या लोकनाटात प्रथम काम केले. यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या पुढारी पाहीजे या नाटकातून त्यांच्या रोंगे या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष गेले. कथा अकलेच्या कांद्याची या वगनाटामधे त्यांच्यातला लोकनाट कलाकार सर्वार्थाने पुढे आला. रंगभूमीवर सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबुतर, बेबी, घरंदाज आणि रण दोघांचे ही त्यांची प्रमुख नाटके तर पुढारी पाहीजे, कोणाचा कोणाला मेळ नाही, कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेल चुलीत, लवंगी मिरची - कोल्हापूरची आदी त्यांची लोकनाट्ये.

लोकरंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी वरून चित्रपटात गेलेल्या अभिनेत्यांमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ते प्रथम श्रेणीचे अभिनेते होते. लोकशैली आणि नागर शैली यांचे उत्कृष्ट रसायन निळूभाऊंच्या अभिनय शैलीत होते. सहज चिंतनशीलता हा त्यांचा अभिनयविशेष होता. रंगभूमीनंतर एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून त्यांनी चित्रसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर सामना, पिंजरा, सोबती, सहकार सम्राट, शापीत, हर्‍या नार्‍या, जैत रे जैत, पैजेचा विडा, पैज, कळत नकळत, प्रतिकार, पुत्रवती यांसह अनेक चित्रपटांतून निळूभाऊंनी आपला ठसा उमटवला.

कुली, सारांश, जरासी जिंदगी, रामनगरी, नागीन - २, मोहरे, मशाल, सूत्रधार, वो सात दिन, नरम गरम, जखमी शेर आदी त्यांचे हिंदी चित्रपटही विशेष गाजले. महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार त्यांना तीन वेळा मिळाला होते. याशिवाय संगीत नाटक अकादमी, अनंतराव भालेराव पुरस्कार इ. पुरस्कारही त्यांना मिळाले होते.
तमाम रसिक प्रेक्षकांच्या समोर ते खलनायक म्हणून परिचित असले तरीही एक मनस्वी समाजसेवक अशी भूमिका त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात मनापासून साकारली. ते सेवादलाचे सक्रीय कार्यकर्ते होते.

सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास पुणे येथे वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, म. चि. म. चे अजय सरपोतदार, बाबा आढाव, जब्बार पटेल. अमोल पालेकर, जयराम कुलकर्णी, ज्योती सुभाष, रवींद्र मंकणी आदी नामवंतांसह शेकडो रसिक प्रेक्षक उपस्थित होते.