बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Updated : शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (13:39 IST)

लैंगिक ओळखीवरून वादात सापडलेल्या अल्जेरियाच्या ईमान खलिफला सुवर्णपदक

imane khalif
अल्जेरियाच्या ईमान खलीफने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. पॅरिसमध्ये ईमान खलीफवरून मोठा वाद निर्माण झाला होता.सुमारे वर्षभरापूर्वी कथितरित्या लिंग चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यानंतर ईमान खलीफला बॉक्सिंगच्या जागतिक स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आलं होतं आणि आता पॅरिसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरचा पराभव करत ईमानने जगभरातील तिच्या टीकाकारांना जोरदार ठोसा लगावला आहे.
 
पॅरिस ऑलिंपिकमध्ये ईमान खलीफ हा मोठ्या वादाचा विषय ठरली होती. तिचे प्रशिक्षक, ऑलिंपिक व्यवस्थापन यांनी वेळोवेळी स्पष्टीकरणं देऊनही सोशल मीडियावर ईमान खलीफच्या लिंग ओळखीवरून आणि पुरुषी दिसण्यावरून तिची हेटाळणी केली जात होती. पण अखेर ईमानने चीनच्या यांग लिऊचा पराभव करत सुवर्णपदक मिळवलं आहे.
 
अतिशय आक्रमक गर्जना करत 25 वर्षाच्या ईमानने अंतिम सामन्यासाठी बॉक्सिंग रिंगमध्ये पाऊल टाकलं. हा सामना बघायला आलेल्या अल्जेरियाच्या समर्थकांची संख्या देखील खूप मोठी होती. हिरवा, पांढरा आणि लाल रंग असलेले अल्जेरियाचे झेंडे घेऊन हे समर्थक ईमानला प्रोत्साहन देत होते.
 
सामन्याच्या शेवटी वेळ संपल्याची घंटा वाजली तेव्हाच ईमानने विजयाच्या आनंदात नाचायला सुरुवात केली. बॉक्सिंगच्या पंचांनी एकमताने ईमान खलीफला विजयी ठरवलं आणि दोन्ही प्रतिस्पर्धी बॉक्सर्सनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली.
 
ईमान खलीफने बीबीसीला सांगितलं की, "हे माझं स्वप्न होतं. मी खूप आनंदी आहे. हा विजय अप्रतिम आहे."
 
ईमान म्हणाली की, "आठ वर्षं मी झोपेचा त्याग केला, प्रचंड मेहनत घेतली. मी अल्जेरियाच्या तमाम लोकांचे आभार मानते. मी माझ्या कामगिरीवर खूप समाधानी आहे. मी एक खंबीर महिला आहे."
 
अंतिम सामन्यात विजय घोषित झाल्यानंतर चीनच्या यांगने ईमानचा हात उंचावत तिच्या विजयाची घोषणा केली. हा एक खूप मोठा विरोधाभास होता कारण ईमान खलीफच्या पहिल्या सामन्यात जे काही घडलं ते अनेकांनी बघितलं होतं.
 
पॅरिस ऑलिंपिकच्या पहिल्या सामन्यात ईमानची लढत इटलीच्या अँजेला करिनी या बॉक्सरविरुद्ध झाली होती. मात्र ईमान खलीफ विरुद्धचा सामना सुरू झाल्यानंतर अँजेला करिनीनं फक्त 46 सेकंदातच त्यातून माघार घेतली. तिने सामना सोडून दिला होता.
 
अंतिम सामन्यात खलीफच्या विजयाची घोषणा झाली आणि तिच्या प्रशिक्षकांनी तिला खांद्यावर उचलून या विजयाचा आनंद साजरा केला.
 
सुवर्णपदक गळ्यात पडल्यानंतर रौप्य आणि कांस्यपदक जिंकलेल्या इतर खेळाडूंनी तिचं अभिनंदन केलं. स्टेडियममध्ये अल्जेरियाचं राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर ईमान खलीफच्या डोळ्यातले अश्रू बरच काही सांगून जात होते.
 
हे प्रकरण इथपर्यंत नेमकं कसं पोहोचलं?
ईमान खलीफच्या पहिल्या सामन्यात इटलीच्या अँजेला करिनीने पहिल्या 46 सेकंदातच माघार घेतली. स्वतःचा 'जीव' वाचवण्यासाठी ही माघार घेत असल्याचं ती म्हणाली.
 
2022च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या ईमानने पहिल्या सामन्यानंतर जबरदस्त खेळ करत प्रत्येक सामन्यात पंचांच्या एकमताने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
 
अंतिम सामना अतिशय अटीतटीचा होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली होती. चीनच्या बॉक्सरने प्रतिकार करण्याचा चांगला प्रयत्नही केला पण ईमानने आणखीन एक स्पष्ट विजय मिळवला.
 
मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात चीनच्या यांगसमोर ईमान खलिफचंच आव्हान असणार होतं. पण, अंतिम सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने तिला अपात्र ठरवलं. त्या स्पर्धेत यांग लिऊने विजेतेपद मिळवलं.
 
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने म्हटलं होतं की, 'ईमान खलीफ आणि तैवानची बॉक्सर लिन यू-टिंग यांनी आयबीएच्या नियमांप्रमाणे महिलांच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे निकष पूर्ण केले नाहीत म्हणून त्या अपात्र आहेत."
 
ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOC) या दोन्ही खेळाडूंना ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी देत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या निर्णयावर कठोर टीका केली होती. ईमान खलीफ आणि लिन यू-टिंग हे दोन्ही खेळाडू स्त्री म्हणून जन्माला आले आणि त्यांचं संगोपनही स्त्री म्हणूनच झाल्याचं ऑलिंपिक समितीने स्पष्ट केलं होतं.
 
ऑलिंरिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी शुक्रवारी सांगितलं होतं समितीला 'अनिश्चितता आवडत नाही' परंतु 'स्त्री आणि पुरुषांची ओळख' पटवण्यासाठी 'कोणतीही वैज्ञानिकदृष्ट्या ठोस प्रणाली' अस्तित्वातच नसल्याचंही ते म्हणाले होते.
 
या दोघींना ऑलिंपिकमध्ये सहभागी केल्यामुळे अनेक प्रतिस्पर्धी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.
पहिल्या सामन्यत पराभव झाल्यानंतर इटलीची बॉक्सर अँजेला करिनी म्हणाली होती की, "हे योग्य नाही." मात्र, त्यानंतर अँजेलाने तिच्या सामन्यानंतरच्या वर्तनासाठी माफी मागितीला होती. तिचे प्रशिक्षक म्हणाले होते की त्यांनीच अँजेलाला लढतीतून माघार घेण्याचा सल्ला दिला होता. कारण, इतर काही जणांनी तिला 'पुरुषाविरुद्ध न लढण्याची' विनंती केली होती.
 
पुढील फेरीपूर्वी, हंगेरीची प्रतिस्पर्धी अ‍ॅना लुका हॅमोरीने म्हणाली होती की, "मला वाटत नाही की हे योग्य आहे." तर हंगेरियन बॉक्सिंग असोसिएशनने खलीफच्या समावेशाबद्दल निषेध व्यक्त केला होता. या लढतीनंतर हॅमोरीने ईमान खलीफला शुभेच्छा दिल्या होत्या.
 
उपांत्य फेरीत ईमानचा सामना थायलंडच्या जंजेम सुवान्नाफेंग हिच्याशी झाला. जंजेम किंवा थायलंडच्या बॉक्सिंग संघटनेने ईमानच्या स्त्री किंवा पुरुष असण्याबाबत काहीही टिपणी केली नाही. सामन्यानंतर सुवान्नाफेंग म्हणाली की, "ती एक महिलाच आहे परंतु खूप मजबूत आहे."
 
लिन यू-टिंगविरुद्ध खेळलेल्या दोन खेळाडूंनी सामन्यानंतर 'एक्स'ची खून केली. ही खून स्त्रीच्या शरीरातील क्रोमोजोम्स दर्शवतात. स्वेतलाना कामेनोव्हा स्टेनेव्हाने "नाही, नाही, नाही" म्हणत बॉक्सिंग रिंग सोडली आणि एक्सची खून करून दाखवली.
 
हा सामना सुरु होण्यापूर्वी ती 'हे बॉक्सिंगसाठी योग्य नाही' असं म्हणाली होती. तर स्वेतलानाच्या बॉक्सिंग असोसिएअशनने ईमान खलीफ आणि लिन यू-टिंगच्या पॅरिसमधील सहभागावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
 
उपांत्य फेरीत लिनचा सामना एसरा यिल्डीझ कहरामन हिच्याविरुद्ध झाला. पराभवानंतर तुर्कीच्या एसराने 'एक्स ची खून करत बॉक्सिंग रिंग सोडली.
बीबीसीसाठी वरिष्ठ क्रीडा पत्रकार कॅटी फाकिंघम यांनी या सर्व वादावर 2 ऑगस्ट 2024 रोजी सविस्तर बातमी केली होती. ती खालीलप्रमाणे देत आहोत :
 
पॅरिस ऑलिंपिक मध्ये महिला बॉक्सिंग सामन्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
 
अल्जेरियाची महिला बॉक्सर ईमान खलीफ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
 
त्याचं झालं असं की पॅरिस ऑलिंपिकमध्ये अल्जीरिया च्या ईमान खलीफचा इटलीच्या अँजेला करिनी या बॉक्सर बरोबर सामना होता.
 
मात्र ईमान खलीफ विरुद्धचा सामना सुरू झाल्यानंतर अँजेला करिनीनं फक्त 46 सेकंदातच त्यातून माघार घेतली. तिने सामना सोडून दिला.
 
सामन्यानंतर ती म्हणाली, "मला माझा जीव वाचवण्यासाठी सामना सोडावा लागला."
 
दोन खेळाडूंनी मागील वर्षी पात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळे त्यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची परवानगी मिळाली नव्हती. पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या त्या दोन खेळाडूंपैकी एक ईमान खलीफ आहे.
 
गेल्या वर्षी जरी परवानगी मिळाली नसली तरी यंदा पॅरिस ऑलिंपिकमध्ये या दोन्ही खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी मिळाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं म्हटलं आहे की वेल्टरवेट (147 पौंड किंवा 67 किलो) वजनीगटात खेळणाऱ्या ईमान खलीफला भारतात सामना खेळता आला नव्हता. तिच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढल्याचं आढळून आल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं.
टेस्टोस्टेरॉनहे हार्मोन पुरुषांमध्ये आढळतं.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, वर्ल्ड चॅम्पियशिपचं आयोजन करत नाही.
ऑलिंपिकमधील सामन्यात पहिल्या फेरीत तिला बाय (Bye)मिळाला होता. म्हणजेच सामना न खेळताच ती पुढच्या फेरीत पोहोचली होती. त्यानंतर 25 वर्षांची ईमान खलीफ जेव्हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली तेव्हा प्रेक्षकांमधील अल्जीरियाच्या पाठिराख्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत केलं होतं.
 
त्या 46 सेकंदात घडलं तरी काय?
सामना सुरू झाल्यानंतर 30 सेकंदाच्या आतच ईमान खलीफनं करिनीच्या चेहऱ्यावर ठोसा लगावला होता. त्यानंतर आपला हेडगियर (डोक्यावर बांधलेलं सुरक्षा गार्ड) व्यवस्थित करण्यासाठी करिनी प्रशिक्षकाकडे गेली होती.
त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. मात्र काही सेकंदातच करिनीनं सामन्यातून माघार घेतली.
यानंतर ईमान खलीफला सामन्याची विजेती म्हणून जाहीर करण्यात आलं. त्यावेळेस 'हे योग्य नाही', असं म्हणताना करिनी दिसली.
सामन्यानंतर प्रसार माध्यमांसमोर येताना करिनीच्या डोळ्यात अश्रू होते.
करिनीनं बीबीसीला सांगितलं की, "मी पूर्ण सामना खेळू शकली नाही. माझ्या नाकात तीव्र वेदना झाली. या अनुभवानंतर मी स्वत:लाच म्हणाले की महिला म्हणून माझ्यामध्ये जी परिपक्वता आहे, त्यामुळे माझा देश याबद्दल नाराज होणार नाही."
 
"माझे वडील देखील नाराज होणार नाहीत. मी थांबली. मी स्वत:ला सामना खेळण्यापासून रोखलं."
 
ती म्हणाली, "संपूर्ण आयुष्यभरासाठी विस्मरणीय असा हा सामना होऊ शकला असता. मात्र त्या क्षणी मला माझा जीव देखील वाचवायचा होता."
 
करिनी म्हणाली, "मला भीती वाटली नाही. बॉक्सिंग रिंगमध्ये मी अजिबात घाबरली नाही. रिंगमध्ये ठोसे खाण्याचीही मला भीती वाटत नाही. मात्र यावेळेस सर्वकाही संपणार होतं. मी पुढे लढू शकत नव्हते, म्हणूनच मी सामन्यातून माघार घेतली."
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की "सामना बरोबरीचा असला तर त्यात काही अर्थ असतो. माझ्या मते या सामन्यात बरोबरी सारखं काहीही नव्हतं."
 
करिनीनं पत्रकारांना सांगितलं, "ती शेवटपर्यत लढली असती आणि खूश झाली असतं तर बरं झालं असतं. मी कोणाचंच मूल्यांकन करत नाहीत. मी इथे निर्णय देण्यासाठी आलेली नाही."
 
ईमान खलीफ आपल्या कारकीर्दीत आतापर्यत 50 सामने खेळली आहे. त्यात ती फक्त नऊ वेळा पराभूत झाली आहे.
खलीफनं बीबीसीला सांगितलं, "मी इथे सुवर्णपदकासाठी आली आहे. मी प्रत्येकाशीच लढते."
या सामन्याच्या एक दिवस आधी अल्जीरियाच्या ऑलिंपिक समितीनं ईमान खलीफ विरोधात करण्यात आलेले आरोप निराधार ठरवले होते.
कोण आहे ईमान खलीफ?
बॉक्सर असलेली 25 वर्षांची ईमान खलीफ अल्जेरियातील तियारेत येथील निवासी आहे.
 
ती युनिसेफ ब्रँड अॅंम्बेसेडर आहे. ईमान खलीफ आतापर्यत एकूण 50 सामने खेळली असून त्यात फक्त नऊ वेळा हारली आहे.
ईमान खलीफचे वडील सुरूवातीला तिच्या बॉक्सिंग खेळण्याविरोधात होते. कारण त्यांना वाटत होतं की महिलांनी बॉक्सिंग खेळू नये.
2018 मध्ये खलीफनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने कारकीर्दीची सुरूवात केली होती. मात्र त्या स्पर्धेत ती 17 व्या स्थानावर राहिली.
2019 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती 19 व्या स्थानावर फेकली गेली. 2021 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या केली हॅरिंग्टननं तिचा पराभव केला होता.
 
त्यानंतर झालेल्या महिलांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियशिपमध्ये मुसंडी मारत खलीफनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. या स्पर्धेत खलीफला अॅमी ब्रॉडथ्रस्टकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र तिची कामगिरी नक्कीच उंचावली होती.
 
2022 ची आफ्रिकन चॅम्पियनशिप, मेडिटेरेनियन गेम्स आणि 2023 च्या अरब गेम्समध्ये तिनं सुवर्णपदक पटकावलं होतं.
 
नवी दिल्लीत खलीफला अपात्र का ठरवण्यात आलं होतं?
नवी दिल्लीत झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी म्हटलं होतं, "डीएनए चाचणीतून आम्हाला आढळलं की चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणाऱ्या अनेक बॉक्सर्सने चलाखी करत स्वत:ला महिला दाखवण्याचा प्रयत्न केला होता."
 
"मात्र चाचणीनंतर आढळलं की त्यांच्या शरीरात एक्स-वाय गूणसूत्रे होती. अशा खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर काढलं जातं," असं ते पुढे म्हणाले.
मात्र या निर्णयाबद्दल अल्जेरियाच्या ऑलिंपिक समितीनं म्हटलं होतं की खलीफला 'वैद्यकीय कारणां'मुळे अपात्र ठरवण्यात आलं.
 
तर अल्जेरियाच्या प्रसारमाध्यमांना वाटत होतं की टेस्टोस्टेरॉनच्या वाढलेल्या पातळीमुळे खलीफ ला अपात्र ठरवण्यात आलं.
 
या निर्णयामुळे खलीफ नाराज झाली होती. ती म्हणाली होती, "अल्जेरियानं सुवर्णपदक जिंकावं असं काही देशांना वाटत नाही. हे खूप मोठं कारस्थान आहे. याबाबत आम्ही गप्प बसणार नाही."
 
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचं उत्तर
2023 मध्ये भारतात महिलांची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप झाली होती. त्यावेळेस खलीफच्या लैंगिक ओळखीबद्दलचा मुद्दा समोर आला होता.
 
अशाच एका प्रकरणात मागील वर्षाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तैवानच्या लिन यु-थिंग कडून तिचं कांस्य पदक परत घेण्यात आलं होतं.
 
ती लिंगविषयक पात्रता चाचणीत अपयशी ठरली होती. मात्र यंदा ती पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी झाली आहे. शुक्रवारी ती एका सामन्यात खेळली होती.
 
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं म्हटलं की या स्पर्धेतील बॉक्सिंग सामन्यात भाग घेणारे सर्व बॉक्सर्स आवश्यक निकषांची पूर्तता करत आहेत.
समितीचे प्रवक्ते मार्क अॅडम्स म्हणाले, "हे खेळाडू अनेकवेळा असंख्य स्पर्धांमध्ये खेळले आहेत. ते इथे अचानक आलेले नाहीत. ते टोकियो ऑलिंपिकमध्ये देखील खेळले होते."
 
2023 मध्ये खलीफ आणि लिन यांना ज्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्याचं आयोजन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं केलं होतं.
 
मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं मागील जूनमध्ये रशियाच्या नेतृत्वाखालील या संघटनेचं जागतिक संचालक मंडळ म्हणून असलेलं सदस्यत्व रद्द केलं होतं.
 
टोकियो आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंग सामन्यांचं आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडूनच केलं जातं आहे.
 
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या तपासात काय आढळलं होतं?
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं बुधवारी सांगितलं की लिन आणि खलीफला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अपात्र ठरवण्यात आलं होतं. स्पर्धेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकून राहावी यासाठी असं करण्यात आलं होतं. मात्र त्यात टेस्टोस्टेरॉनची चाचणी घेण्यात आली नव्हती.
 
मात्र त्यांच्या वेगवेगळ्या मान्यताप्राप्त चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये विशेष माहिती गोपनीय ठेवली जाते.
 
या चाचणीत असं सांगण्यात आलं होतं की लिन आणि खलीफ यांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता केली नव्हती. इतर महिला खेळाडूंच्या तुलनेत त्यांची स्थिती अधिक मजबूत होती.
अर्थात बीबीसीला अद्याप हे कळू शकलेलं नाही की पात्रता चाचणीत नेमकं कोणत्या गोष्टीची चाचणी केली जाते.
लिन आणि खलीफ यांची चाचणी आधी 2022 मध्ये इस्तंबूलमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झाली होती. त्यानंतर 2023 मध्ये पुन्हा चाचणी झाली होती.
यासंदर्भात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं म्हटलं की लिननं या विरोधात अपील केलं होतं. मात्र खलीफनं आधी अपील केलं होतं. नंतर खलीफनं अपील मागे घेतलं होतं.
 
आयबीएचे मुख्य कार्यकारी क्रिस रॉबर्ट्स म्हणाले, "आमच्या वैद्यकीय समितीनं ज्या गोष्टींबद्दल चिंता व्यक्त केली होती, त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला होता."
 
ते म्हणाले, "आमच्या बॉक्सिंग कुटुंबासाठी जे योग्य आणि चांगलं होतं, तोच निर्णय आम्ही घेतला होता. महिला म्हणून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्या पात्र नव्हत्या असं आम्हाला आढळून आलं होतं."
 
त्यांना विचारण्यात आलं की ही चाचणी 'सेक्स टेस्ट' सारखीच आहे का? त्यावर ते म्हणाले, "हो, ते बरचसं तसंच आहे."
 
जर ठरवण्यात आलेले निकष आणि चाचणी याच्या आधारे एक बॉक्सर दुसऱ्या बॉक्सरच्या तुलनेत जास्त वजनाचा आणि ताकदवान असेल. तर तो बॉक्सर स्पर्धेतील महिला श्रेणीमध्ये सामना खेळण्यास पात्र नाही असं मानलं जाईल.
 
मंगळवारी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रवक्ते मार्क अॅडम्स म्हणाले, "हे खेळाडू अनेक वर्षांपासून खेळत आहेत. ते अचानक इथे ऑलिंपिकमध्ये आलेले नाहीत."
 
निर्णयावर टीका
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं (आयओसी) आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं मनमानीपणे घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेच्या बॉक्सिंग शाखेनं गुरुवारी यासंदर्भात एक वक्तव्यं दिलं आहे. त्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिग असोसिएशनवर टीका करत म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशननं मनमानी करत आणि घाईघाईनं घेतलेल्या निर्णयाच्या खलीफ आणि लिन या खेळाडू बळी ठरल्या आहेत.
आयओसीनं म्हटलं की 2023 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप च्या वेळेस खलीफ आणि लिन यांना कोणत्याही विशेष प्रक्रियेशिवाय अपात्र ठरवण्यात आलं होतं.
या दोन खेळाडूंसंदर्भात जो संताप व्यक्त करण्यात येतो आहे तो आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या मनमानी निर्णयाचा परिणाम आहे. हा निर्णय कोणत्याही योग्य प्रक्रियेशिवाय घेण्यात आला होता.
 
हे खेळाडू अनेक वर्षांपासून मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत, ही बाब विशेषकरून लक्षात घेतली पाहिजे.
 
हा प्रकार बॉक्सिंगच्या चांगल्या प्रशासनाच्या दृष्टीनं अयोग्य आहे.
 
'बॉक्सिंग साठी खूपच दुर्दैवी'
स्टीव्ह बन्स बीबीसी रेडिओ फाईव्हचे बॉक्सिंग विश्लेषक आहेत. ते म्हणाले की ही गोष्ट बॉक्सिंगसाठी खूपच वाईट आहे.
 
ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंगच्या भवितव्यबद्दल चर्चा होत असताना ही गोष्ट घडते आहे. मला वाटतं की यामुळे ऑलिंपिक स्पर्धेत बॉक्सिंगला धक्का बसला आहे.
 
या सामन्यातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, खलीफ विरुद्ध सामने खेळलेले, युरोपियन चॅम्पियन आणि जागतिक चॅम्पियन खेळाडूंचं म्हणणं आहे की खलीफ फसवणारी नाही, धोकेबाज नाही.
करिनी म्हणाली, "खलीफ बद्दल मला वाईट वाटतं आहे आणि तुम्हाला देखील वाईट वाटलं पाहिजे. दुर्दैवानं काही मुद्द्यांच्या कचाट्यात ती सापडली आहे. ही खूपच भयंकर बाब आहे आणि अजूनही हे संपलेलं नाही."
शनिवारी हंगेरीची बॉक्सर अन्ना लुका हमोरी बरोबर खलीफचा पुढचा सामना असणार आहे. जर खलीफ हा सामना जिंकली तर पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिचं पदक निश्चित होईल.

हमोरीनं बीबीसीला सांगितलं की काहीही झालं तरी ती हार मानणारी नाही. करिनीनं सामना अर्धवट सोडला, यावर ती म्हणाली की ही तिची इच्छा आहे.
ती म्हणाली, "मी वचन दिलं आहे की मी शेवटपर्यत लढेन. त्यानंतर मग काहीही होऊ दे. सत्य काय आहे हे मला माहित नाही. खरं सांगायचं तर मला त्यामुळे फरक पडत नाही. मला फक्त जिंकायचं आहे."
 
या प्रकरणाबाबत लोकांना काय वाटतं?
हॅरी पॉटरच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी खलीफ च्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं आहे, "आमच्या नव्या पुरुष आंदोलनाची मांडणी या फोटोपेक्षा अधिक चांगल्या रितीनं होऊ शकते का? बनावट हास्य असलेला एक पुरुष, ज्याला माहित आहे की एका पुरुषवादी क्रीडा संघटनेचं ज्याचं संरक्षण मिळालेलं आहे.
तो एका महिलेच्या डोक्यावर ठोसा लगावून त्याचा आनंद घेतो आहे. त्या महिलेच्या आयुष्यभराचं स्वप्नं त्यानं उद्धवस्त केलं आहे."
अर्थात अनेक घटक त्यांच्या या वक्तव्यावर टीका देखील करत आहेत.
भारतीय क्रिकेटर हरभजन सिंह याने खलीफसंदर्भातील वादाबद्दल लिहिलं, "माझ्या दृष्टीनं हे अयोग्य आहे. ऑलिंपिकमधील या घटना/सामन्याचा फेरआढावा घेतला गेला पाहिजे."
Published By- Priya Dixit