1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified: मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (18:20 IST)

लॅपटॉपवर टाइप केलेल्या शब्दांपेक्षा लिहिलेले शब्द जास्त काळ राहतात लक्षात

आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असल्याचे चित्र आहे. आपला मुलगादेखील प्रत्येक क्षेत्रात अव्वल असावा, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कम्प्युटर, मोबाइल आणि लॅपटॉपचा वापर करताना दिसतात. काही वर्षापूर्वी शाळेतून आल्यावर अभस लक्षात राहावा म्हणून तो वहीवर लिहून आपल्या किती लक्षात राहिला आहे हे बघितले जायचे. परंतु आज बर्‍याच शाळांमध्ये घरी गृहपाठ देण्याची पद्धत इतिहास जमा झालेली आहे. भारताबाहेरील शाळांमध्ये तर वह्या पुस्तकांची जागा लॅपटॉप, टॅब यांनी घेतल्याचे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी जरी वरील गोष्टींची आवश्यकता असली तरी या गोष्टींचा विपरीत परिणाम आपल्या मुलांच्या बौद्धिकतेवर होत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासादरम्यान काही विद्यार्थ्यांसमोर एका विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी प्रमुख मुद्दे लॅपटॉपवर नोंद करुन घेतले तर, काही विद्यार्थ्यांनी हाताने वहीत लिहून घेतले. चर्चासत्र संपल्यानंतर असे लक्षात आले की, लॅपटॉपवर लिहून घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या त्यांनी काय लिहून घेतले हे लक्षात नव्हते. तर हाताने लिहून घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या सर्व गोष्टी स्मरणात राहिल्या ज्या त्यांनी हाताने वहीत नोंद करुन घेतल्या होत्या.