गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. भटकंती
  4. »
  5. फिलिपाईन्स डायरी
Written By वेबदुनिया|

फिलिपाईन्स डायरी - 2

PR
'द फ्रिडम रायटर्स' चित्रपटात कहाणी आहे एका संपन्न घरातल्या महिलेची. एका सामान्य अशा शाळेत, ती शिक्षिका म्हणून नोकरी करू लागते. तिचे विद्यार्थी विविध वंशांचे आणि पार्श्वभूमीतून आलेले असतात. त्यांची आपआपसातली तेढ पाहून एकमेकांबद्दलचा राग, खुन्नस पाहून ही शिक्षिका व्यथित होते. तुम्ही सर्व समान आहात हे दाखवण्यासाठी ती वर्गात छोटो छोटे खेळ त्या विद्यार्थ्यांना खेळायला लावते. अनुभवांनी वैश्विकता Universatity of experiences... विद्यार्थ्यांना हे सूत्र समजू लागते.

आपण फक्त रंग, रूप, शारीरिक ठेवण यामध्येच वेगळे आहोत पण जे अनुभव अडचणी इतरांसमोर आहेत त्याच माझ्याही समोर आहेत याची सर्वच विद्यार्ध्यांमध्ये होऊ लागते. वेगळे दिसत असलो तरी आपण सारखेच आहेत... आपण मानव आहोत.

चित्रपटाची कथा अमेरिकेत घडते. अमेरिकन्स त्यांच्या देशाला मुशीची, Melting pot ची उपमा देतात. इटालियन, चायनीज, मेक्सिकन, आफ्रिकन अशा अनेक खंडातून, संस्कृतींमधून लोक अमेरिकेत आले. स्थायिक झाले. याच सर्वांनी अमेरिकेला एक 'ड्रीम डेस्टिनेशन' बनवले. चित्रपटामध्ये पण हीच संकल्पना होती... आणि एक विचार आला.... केवळ अमेरिका हाच एकमेव 'मेल्टिंग पॉट' आहे का?

राहुलने आज विचारले, ''मनिला मध्ये वावरताना कसं वाटतं? '' म्हटलं काही विशेष वेगळं नाही, आसाम किंवा नेपाळमध्ये आल्यासारखं वाटतंय. इथले लोक फार काही वेगळे दिसत नाहीत. रस्त्यावरून चालणार्‍या एखाद्या काकांची ओळख श्री. परांजपे किंवा श्री आठवले म्हणून करून देता येईल. काही मुलींचे चेहरे इतके भारतीय दिसतात की त्यांची नावे प्राजक्ता, रेश्मा किंवा सुकन्या असावीत असे वाटेल काही चेहरे एकदम युरोपियन तरतरीत नाक, ओठ, गालांची हाडं, बांधा... एकदम साहेबी. रंग म्हणाल तर पिवळा, गोरा ते अगदी गव्हाळ. मी पाहिलेले काही पिनॉय (फिलिपिनो लोक स्वत:ला 'पिनॉय' म्हणवतात) तर एकदम महाराष्ट्रीय देशस्थी रंगाचे होते... रंगाची एकदम फुल टू गॅरंटी!

साधारण 3000 वर्षांपूर्वी फिलिपाईन्समध्ये मानवी वसाहतीची सुरुवात झाली. स्पॅनिश लोकांचे आगमन होईपर्यंत हा देश म्हणजे600- 700 बेटांचा समूह होता. एकछत्री राजा कुणी नव्हताच. फर्डिनंड मॅगेलनने इथे स्पेनची सत्ता स्थापना केली आणि स्पेनचा राजा फिलिप याच्या सन्मानार्थ 'फिलिपाईन्स' असे नाव दिले. समान कायदा, शासनसंस्था या सर्व आधुनिक गोष्टी स्पॅनिअर्डस्नी इथे आणल्या. सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत इथे स्पेनचे राज्य होते. त्यानंतर झालेल्या एका युद्धात तह होऊन, हा देश अमेरिकेच्या दावणीला बांधला गेला. पुढची तीस चाळीस वर्ष फिलिपाईन्स हा अमेरिकेची वसाहत होता. (कोण म्हणतं की अमेरिका फार स्वातंत्र्यप्रिय देश आहे? दुसर्‍या महायुद्धामध्ये तीन चार वर्ष जपानी लोकांनी फिलिपाईन्सचा ताबा घेतला.

PR
पिनॉय लोक मुळांतच शांत आणि मृदू स्वभावाचे आहेत. फार आक्रमक नाहीत. जुळवून घेणार्‍यांपैकी. त्यामुळे या लोकांनी राज्यकर्त्यांच्या हिशोबाने स्वत:ला बदलले. स्वत:ला कॅथॉलिक राष्ट्र घोषित करणारा हा बहुतेक एकमेव आशियाई देश आहे. तिकडे दक्षिणेकडे जावा, सुमात्रा बेटांवर व्यापारासाठी येणार्‍या अरबांनी इस्लामचा प्रचार केला. आज दक्षिणेच्या मिंदानाओ प्रांतामध्ये मुस्लिमबहुल लोकसंख्या आहे. जे लोकं इथे आले, व्यापाराच्या राज्य करण्याच्या इच्छेने त्यांना हा शांत, निसर्गसुंदर देश फारच आवडला. बहुतेक लोक इथे स्थायिक झाले. फिलिपिनो स्त्रियांशी लग्न करून इथलेच रहिवासी बनले. आज परिस्थिती अशी आहे की सगळी लोकसंख्या म्हणजे विविध वंशांच्या गुणसूत्रांची खिचडी बनली आहे. एका मुशीची, मेल्टिंग पॉटची अवस्था तर इथेही आहेच की! आणि भारताची तरी काय वेगळी अवस्था आहे? सिकंदरच्या सैन्यामध्ये असणारे सैनिक सिंध, पंजाबमध्ये स्थायिक झाले. इथल्या मुलींशी संसार थाटून भारतीय बनले. आज तुम्ही त्यांना वेगळे ओळखू शकत नाही. शक, हूण अशा एकेकाळच्या विदेशी आक्रमक टोळ्या आज भारतीय आहेत. मंगोल वंशाच्या चेंगीजखानचे वंशज असणारे मोगल आज पूर्णपणे भारतीय आहेत. सर्वांनी एकमेकांच्या चालीरीती उचलल्या आहेत. इतिहास दाखवतो की गेल्या हजारो वर्षात ही 'मेल्टिंग पॉट' परिस्थिती जगाच्या कुठल्या न कुठल्या भागात चालूच राहिलेली आहे. थोडा व्यापक दृष्टिकोन आणि सहिष्णुता असली म्हणजे झालं!

- चारू वाक ( अनुवादित)
[email protected]