गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:45 IST)

पुणे महापालिका क्षेत्रात ९ वी ते १२ वीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरु

पुणे महापालिका क्षेत्रात असलेल्या ९ वी ते १२ वीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. कोरोना प्रतिबंध करणाऱ्या सर्व अटी शर्थींचे पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. 
 
शाळा सुरु करताना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत १० नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना /अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी थर्मल स्कॅनर किंवा थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या आवश्यक वस्तू शाळा प्रशासनाने ठेवणं बंधनकारक आहे.
 
शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड १९ साठीची RTPCR चाचणी बंधनकारक आहे. चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सादर करणं आवश्यक आहे असंही आयुक्तांनी म्हटलं आहे.
 
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रशासनाला देणं आवश्यक आहे. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी शाळा आणि परिसर रोज स्वच्छ करणं आवश्यक आहे. स्वच्छतागृहांचे रोज निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे.