अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर संचारबंदी
पुणे- संपूर्ण राज्यात मुसळधार पावसामुळे पुढील 48 तास धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मसळधार पाऊस पडत आहे. तर हवामान विभागाने पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
अतिवृष्टीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करु नये या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू केले आहे.
मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित होत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने पुण्यात 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी दिली आहे. तर पुणे महापालिकेने खासगी कंपन्या आणि आयटी कंपन्यांना घरून काम करण्याचे आवाहन केले आहे.
पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे.