काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय - अजित पवार
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारकडून काही प्रमाणात निर्बंध सुद्धा लावण्यात येत आहेत.
त्याच दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर निर्बंध लावण्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत. यंदाच्या वर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ येथे 204 वा शौर्यदिन कार्यक्रम होतोय. यावेळी विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं, काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत.
सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल.दरम्यान या नव्यावर्षात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट समोर येऊन उभे ठाकले आहे. आधीच राज्यात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात तिसरी लाट धडकली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसंच, राज्यात आला लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.