सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (08:31 IST)

पुस्तक पुरस्काराचा वाद : राज्य सरकारचा निषेध करीत प्रसाद कुलकर्णींचा सदस्यत्वाचा राजीनामा

facebook
पुणे  – ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला राज्य पुरस्कार राज्य सरकारने रद्द केला आहे. त्याचे विविध पडसाद उमटत आहेत. राज्य सरकार साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप केल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यात आता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
निषेध आणि राजीनामा :
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला राज्य पुरस्कार शासनाने जी आर काढून रद्द करणे यावरुन महाराष्ट्राच्या साहित्यिक वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. ’महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा ’ चा शासन नियुक्त सदस्य या नात्याने या संदर्भात सखोल माहिती करुन घेणे मला आवश्यक वाटले.
 
गेले दोन दिवस माझ्या आनंदयात्रेच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर होतो. आज सकाळी मुंबईत परत आल्यावर या सर्व प्रकरणाचा मी जेवढा सखोल आणि संतुलित करता येईल तेवढा अभ्यास केला.
शासनातर्फ़े नियुक्त केलेल्या तज्ञांच्या समितीकडून निवडल्या गेलेल्या पुस्तकाला आधी पुरस्कार जाहीर करणे आणि नंतर तो अपमानास्पदरित्या परत घेणे हे निव्वळ अनाकलनीय आहे.
 
माझ्या आतापर्यंतच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्क्रुतिक जीवनात मी कधीही एखाद्या विशिष्ट विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेतला नाही. किंवा कोणत्याही वादात पडलो नाही. माझी बांधिलकी नेहमीच माय मराठीच्या दुधाशी राहिली. तेव्हा कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता ह्या अनुचित निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा मी राजीनामा देत आहे.
– प्रसाद कुलकर्णी
 
Edited By-Ratnadeep Ranshoor