रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (15:58 IST)

सुनेने चुलीतील जळक्या लाकडाने सासर्‍याला केली मारहाण

माहेरहून पैसे, सोनेनाणे घेऊन ये, या कारणासाठी सुनेचा छळ केल्याचा प्रकार आपण नेहमी पाहतो. पण बारामती तालुक्यात (Baramati) एका सुनेने आपल्या सासर्‍याला चुलीतील जळक्या लाकडाने मारहाण करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.
 
याबाबत पोपट दिनकर गाडेकर (वय 56, रा. बर्‍हाणपूर, ता. बारामती) यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्यांची सून दिपाली नानासो गाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा  दाखल केला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट गाडेकर यांना दोन मुले असून त्यांची लग्ने झाली आहेत. गाडेकर यांची 15 एकर जमीन आहे. या जमिनीच्या वाटणीवरुन त्यांच्या घरात वाद सुरु आहे. बुधवारी सकाळी गाडेकर हे घरी असताना त्यांची धाकटी सून दिपाली हिने गाडेकर यांना माझ्या नावावर जमीन करुन द्या, असे सांगितले. त्याला पोपट गाडेकर यांनी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या दिपाली हिने समोरच असलेल्या चुलीतील जळके लाकुड घेतले व त्याने पोपट गाडेकर यांच्या डोक्यात, उजव्या खांद्यावर त्या जळक्या लाकडाने मारहाण केली. त्यानंतर हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या पोपट गाडेकर यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या सूनेविरुद्ध तक्रार  दिली आहे. पोलीस हवालदार पाटसकर तपास करीत आहेत.