बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (14:40 IST)

शिक्षकांच्या फोटोसंदर्भात अखेर शिक्षण विभागाने घेतला हा निर्णय

Deepak Vasant Kesarkar
पुणे-  शिक्षकांचे फोटो शाळेतील वर्गाच्या भितींवर लावण्याऐवजी आता शिक्षक परिचय फलकावर समाविष्ट केले जाणार आहेत. शिक्षकांचे फोटो वर्गात लावण्यास राज्यातून विरोध होत असल्याने मध्यममार्ग काढण्यात आला आहे. त्याला प्राथमिक शिक्षक संघाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
 
केसरकर याविषयी माहिती देताना म्हणाले, “शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्देश केंद्राने दिलेला असल्याने तो डावलता येणार नाही. शिक्षकांचे फोटो लावल्याने विद्यार्थ्यांनाही आपले शिक्षक कोण आहेत हे कळेल. तुलनेने महाराष्ट्रात गैरप्रकार कमी होतात. त्यामुळे राज्यातून शिक्षकांचे फोटो लावण्यास विरोध झाला. त्यामुळे शिक्षकांचे फोटो शिक्षक परिचय फलकावर लावण्याचा मध्यममार्ग काढण्यात आला आहे. त्याला बऱ्याच शिक्षक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.”
 
बोगस शिक्षकांना चाप लावण्यासाठी ‘आपले गुरुजी’ उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो शाळेतील वर्गाच्या भितींवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला राज्यभरातून शिक्षक, शिक्षक संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीसाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुण्यात आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. आता या निर्णयाला संघटना प्रतिसाद देत असल्याने परिचय फलकावर फोटोसह माहिती देण्यात येईल.