बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जानेवारी 2021 (09:03 IST)

येत्या 30 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद घेणार, बी.जी.कोळसे पाटील यांची माहिती

येत्या 30 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद घेणार असल्याचे निवृत्त न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी सांगितले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये ‘भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच मिळाले नाही तर रस्त्यावर परिषद घेऊ किंवा जेलभरो आंदोलन करू. हे शेवटचे अस्त्र असेल, असा इशारा निवृत्त न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी दिला.
 
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या प्रश्नाभोवती राजकारण फिरावे, परंतु भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही भोवती सरकार फिरत राहते. जात, धर्म, पंथ, प्रांत सोडून अन्न, वस्त्र, निवारा या विषयावर राजकारण आम्ही करतो, असे न्या. पाटील म्हणाले.
 
एल्गार परिषदेचा आणि नक्षलवादी चळवळीचा काही संबंध नाही. आम्ही खरेच नक्षलवादी होतो, तर आधी आठ दिवस आणि नंतर आठ दिवस इंटेलीजन्स काय करत होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
भिडे समर्थकांनी एल्गार परिषदेशी नक्षलवादी चळवळीचा संबंध लावला. आम्हाला कितीही बदनाम केले, खोटे आरोप केले, तरी कुठे जोडू शकत नाही. जातीयता व धर्मांधता संपली पाहिजे, असा आमचा हेतू आहे. आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिक आहोत, शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध आहोत.
 
जो कायदा अमलात आणता येत नाही असे कायदे करू नयेत. एल्गार परिषद बदनाम केल्याने घेता येत नाही. आम्ही देशभक्त, गरिबांसाठीच काम करत आहोत. सगळ्यांना माहिती आहे, एल्गार परिषदेचा खोटा तपास होत आहे, मूलभूत प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना आत टाकले जात आहे. ज्यांना आत टाकले त्यांचा आमचा काही संबंध नाही. आम्ही त्यांना ओळखतही नाही, असे न्या. पाटील यांनी स्पष्ट केले.