राष्ट्रीय महामार्गाचे काम कोणत्याही अडचणींशिवाय सुरळीत करण्यासाठी दोन कोटींची खंडणी मागणारा तोतया माहिती अधिकार कार्यकर्ता गजाआड
अहमदनगर जिल्ह्यातील आढळगाव ते जामखेड यादरम्यान सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम कोणत्याही अडचणींशिवाय सुरळीत करण्यासाठी 2 कोटींची खंडणी तोतया माहिती अधिकार कार्यकर्त्याने एका कंपनीकडे मागितली होती. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून पैसे स्विकारताना या तोतया माहिती अधिकार कार्यकर्त्यास रंगेहात अटक केली.
दत्तात्रय गुलाब फाळके (वय 46, रा. धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात प्रशांत लक्ष्मण कांबळे (वय 30, रा. कोंढवा, पुणे) यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीवर भांदवि कलम 386, 387 नुसार मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय फाळके याने तक्रारदार प्रशांत कांबळे यांना वारंवार फोन करुन त्याच्या कंपनीचे अहमदनगर जिल्हयातील आढळगाव ते जामखेड रस्त्यावर चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे कामाबाबत उत्खनन करता त्याच्या परवानग्या घेतल्या आहेत का?, रॉयल्टी पेमेंट केले का, असे विचारुन तुमच्या कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल व्यवस्थित काम करायचे असेल तर तुम्हाला दोन कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमच्या हायवेचे कामकाजाबाबत माहिती अधिकारखाली माहिती घेवून कोर्टात दावा दाखल करुन, तुम्हाला त्रास देऊ अशी धमकी दिली होती.