शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (08:14 IST)

भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना खंडणी प्रकरणी अटक

महापालिकेकडून गाळे मिळवून देतो, असे सांगून फसवणूक केली. शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने ५५ हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर पुन्हा एक लाखांची मागणी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नेपाळी मार्केट, डेक्कन होंडा शोरूमच्या समोर पिंपरी येथे २०१९ ते १ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर केशव घोळवे यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली.
 
केशव घोळवे, गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अली शेख, अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोहम्मद अली शेख (वय ४५, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांची नेपाळी मार्केट येथील जागा मेट्रो प्रकल्पाला जात असल्याने त्यांना महापालिकेकडून पर्यायी जागा एकूण १०० गाळे देण्यात येणार आहेत. ही जागा फिर्यादी व इतर व्यापाऱ्यांना महापालिकेकडून मिळवून देतो, असे आश्वासन आरोपींनी दिले. तसेच भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडून फिर्यादी व इतर व्यापार यांची फसवणूक केली. तसेच शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून ५५ हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीने त्यास विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.