जुन्नरमध्ये चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला
जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांना अवघड होत असल्याचं दिसतंय. पुण्यातील जुन्नर तालुक्यात राजुरी येथे बिबट्याने एक 3 वर्षीय चिमुकल्यावरच हल्ला केला. बिबट्यानं राजूरच्या गव्हाळी मळयात राहणाऱ्या चासकर कुटुंबातील हे 3 वर्षांचं बाळ अंगणातून फरफटत ऊसात नेलं. या बिबट्याच्या हल्ल्यात हे बाळ गंभीर जखमी झालंय. रविवारी रात्री 9.30 ते 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वेद अक्षय चासकर असं या चिमुकल्याचं नाव आहे.
जुन्नरमधील गव्हाळी मळ्यात रहात असलेल्या अक्षय चासकर यांना वेद नावाच 3 वर्षाचा लहान मुलगा आहे. तो रविवारी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत होता. याचवेळी अचानक बिबटयाने या बाळावर जीवघेणा हल्ला केला. बिबट्यानं बाळाला तोंडात पकडून फरफटत शेजारच्या ऊसाच्या शेतात नेलं. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यानं बाळ रडायला लागलं. हा रडण्याचा मोठा आवाज आल्यानंतर घरातील लोक बाहेर आले. तेव्हा त्यांना बाळाला बिबट्यानं नेल्याचं लक्षात आलं.