मनसेची ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला वेग
मनसे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे शनिवारी संध्याकाळी पुण्यात दाखल होत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित करणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार राज ठाकरे साधारण सहाच्या सुमारास पुण्यात दाखल होतील. ते दोन दिवस पुण्यात मुक्काम करणार आहेत. मनसेकडून पुण्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तालुका पातळीवर मनसे नेत्यांच्या आढावा बैठका सुरु आहेत. आतापर्यंत इंदापूर, दौंड, मुळशी, शिरूर तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. या सगळ्याचा अहवाल आता राज ठाकरे यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनसेकडून ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल. जिकडे पॅनलमध्ये संधी मिळणार नाही तिकडे मनसे स्वतःचा पॅनल तयार करेल.