मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (18:17 IST)

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळीबारात मृत्यू, असा झाला होता उदय

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज (5 जानेवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शरद मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
 
कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली.
 
गोळीबारात शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे.
 
बीबीसीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 8 दिवसांपासून एक व्यक्ती शरद मोहोळच्या बरोबर फरत होती. त्याच व्यक्तीने गोळीबार केला आहे.
 
शरद मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. त्यासाठी दोघे पतीपत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होतो त्यावेळी मोहोळवर गोळीबार झाला आहे.
 
40 वर्षीय शरद हिरामण मोहोळ हा पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर दिवसाउजेडी गोळीबार आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानं या भागात खळबळ उडाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झालीय. तसंच, पुढील तपासाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झालीय.
 
"पोलीस सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत. फॉरेन्सिक टीम बोलावण्यात आली आहे. पुढच्या तपासात सर्व गोष्टी निष्पन्न होतील," असं डीसीपी संभाजी कदम यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.
 
शरद मोहोळचा असा उदय झाला
गेल्या 10 ते 15 वर्षात शरद मोहोळ हे नाव पुण्यातील गुन्हेगारी विश्वात आहे. शरद मोहोळचा उदय नेमका कसा झाला, हे आम्ही वरिष्ठ पत्रकार राहुल खदळकर यांच्याकडून जाणून घेतलं. खदळकर यांनी पुण्यातील गुन्हेगारी विश्वाचं गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तांकन केल आहे.
 
राहुल खदळकर सांगतात की, “पुण्यात टोळीयुद्ध भडकण्यास कारणीभूत ठरली ती संदीप मोहोळची हत्या. गणेश मारणे नावाच्या गुंडाने पौंड फाट्याजवळ संदीप मोहोळची हत्या केली होती. हे वर्ष होतं 2006-07 चं.”
 
संदीप मोहोळचा पुण्यातील गुन्हेगारी विश्वात दबदबा होता. संदीप हा मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा रहिवासी होता. शरद मोहोळ हा संदीपचा विश्वासू साथीदार होता.
 
संदीप मोहोळच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी पिंटू मारणेची हत्या करण्यात आली. पिंटूची हत्या मिलन चित्रपटगृहाजवळील प्लॅटिनम बारमध्ये झाली. या हत्या प्रकरणात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांना तुरुंगवास झाला. त्यांची रवानगी अंडा सेलमध्ये झाली.
 
“याच अंडा सेलमध्ये बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवादी कातिल सिद्दिकी शिक्षा भोगत होता. या कातिल सिद्दिकीची कडेकोट सुरक्षा असलेल्या अंडा सेलमध्येच शरद मोहोळने हत्या केली. त्यामुळे शरद मोहोळ प्रचंड चर्चेत आला. याच काळात त्यानं ‘हिंदू डॉन’ म्हणून स्वत:ची ओळख तयार करण्याचा प्रयत्न केला,” असं राहुल खिदळकर सांगतात.
 
या कातिल सिद्दिकी हत्या प्रकरणात शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका झाली.
 
त्यानंतर मुळशीतल्या सरपंचाचं अपहरण झालं होतं. त्यातही शरद मोहोळ सामिल होता.
 
मोहोळ विरुद्ध मारणे संघर्ष
महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणवला जाणारा पुणे जिल्हा गँगवॉरचा आखाडा कसा बनला, याबाबत बीबीसी मराठीनं यापूर्वी सविस्तर वृत्त प्रकाशित केलं होतं. त्यात आम्ही ‘मोहोळ विरुद्ध मारणे’ संघर्षाबद्दल सांगितलं होतं. या संघर्षातील मोहोळवरच आता गोळीबार झाल्यानं ते इथे देत आहोत :
 
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, 2006 मध्ये मारणे गॅंगच्या सुधीर रसाळ यांची बाबा बोडके गँगच्या संदीप मोहोळने हत्या केली होती. सुधीर रसाळ यांच्या हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्धाला सुरुवात झाली होती. या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे गँगनं संदीप मोहोळची हत्या केली.
 
त्यानंतर या दोन टोळ्यांमधला संघर्ष तीव्र होत गेला. संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईक शरद मोहोळनं या हत्येचा कथित सूत्रधार किशोर मारणे यांची 2010मध्ये हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
मारणे गँग आणि नीलेश घायवळ गँगमध्ये देखील पुण्यात चकमकी उडाल्या आहेत. मारणे गँगच्या सदस्यांनी घायवळ यांच्यावर हल्ला केला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते.
 
घायवळ गॅंग कोथरूड भागात होती आणि पौड रोड भागात वर्चस्व स्थापन करण्याचा या गॅंगचा प्रयत्न होता, असं इंडियन एक्स्प्रेसनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.