आता ऑनलाइन विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार सुरु
कोरोनाच्या महामारीमुळे शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद करण्यात ली होती. दरम्यान सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने कोरोना नियम पाळून शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. सर्व महाविद्यालयात कोरोनावरील डोसही बंधणकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे आता ऑनलाइन विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे.
या पार्श्वभुमीवर परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. के. शेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ऑनलाइन शिक्षणाचा विचार केला आहे. यानूसार आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी काय करावे, यासंंदर्भात अहवालही समिती देणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून शिक्षण घेणे शक्य नाही, या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन विद्यापीठाच्या स्थापनेमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच, विद्यापीठ शुल्काशिवाय निवासव्यवस्था, प्रवास आदी बाबींचा जास्तीचा खर्च विद्यार्थ्यांना भरावा लागणार नाही. ऑनलाइन शिक्षण घेण्याची इच्छा असणा-या विद्यार्थ्यांना हे शिक्षण आर्थिकबाबींच्या दृष्टीकोनातून सोयीचे असणार आहे.