पिंपरी- चिंचवडमधील 12 पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर
एक मे,महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 799 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी माहिती देत सर्व सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पाच पोलीस हवालदार आणि दोन पोलीस नाईक यांचा समावेश आहे. पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय, प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांना हे पदक मिळाले आहे
सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख असल्याबद्दल भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सांगवीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांना हे पदक मिळाले आहे.
तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलीस हवालदार सतीश कुदळे, पोलीस हवालदार किरण पवार, पोलीस हवालदार मंगलदास वालकोळी, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, पोलीस हवालदार किरण आरुटे, पोलीस नाईक दत्तात्रय निकम यांना देखील सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेख असल्याबद्दल पदक मिळाले आहे.
दरोडेखोर / गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल पोलीस उपनिरीक्षक महेश मतकर आणि संदीप बोरकर यांना हे पदक मिळाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य दाखविल्याबद्दल पोलीस नाईक रश्मी धावडे यांना देखील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.