एकतर्फी प्रेमातून तरुणाने 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बिबवेवाडी भागात मंगळवारी संध्याकाळी घडली. हल्ला करणारा तरुण या मुलीचा नातेवाईक असल्याचे समोर येत आहे.
एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशिरा बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला .
ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय 21, सध्या रा. चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. शुभम आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले होते. पोलिसांच्या टीम त्यांचा शोध घेत होत्या.
आज (13 ऑक्टोबर ) सकाळी पोलिसांनी शुभमला आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेली मुलगी ही कबड्डीपटू आहे. ती आठवीत शिक्षण घेत होती.
मुलगी दररोज संघ्याकाळी यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करण्यासाठी येत होती. मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास कबड्डीचा सराव झाल्यानंतर ती तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत होती. त्यावेळी आरोपी आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले.
आरोपीने मुलीला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी बोलताना त्यांच्यात वादावादी झाली. त्यामध्ये आरोपीने कोयत्याने मुलीवर वार केले. मुलीच्या मैत्रिणींनी मध्ये पडण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीच्या साथिदारांनी त्यांना धमकावले. मुलीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पळून गेले.
पोलिसांना घटनास्थळी कोयता, दोन तलवारी, सुरा, मिरची पावडर आणि मुलीला धमकावण्यासाठी आणलेले खेळण्यातले पिस्तुल मिळाले आहे. तीन मुख्य आरोपींना आणखी दोघांनी मदत केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयावरुन दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या, ''मुलगी कबड्डीनंतर फिटनेससाठी आली होती. इतर मुलींसोबत उभी असताना आरोपी त्याच्या दोन मित्रांसोबत घटनास्थळी आला. त्याने मुलीवर कोयत्याने आणि चाकून वार केले. त्याच्या साथीदारांनी देखील मुलीवर वार केले.
तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींना धमकावून आरोपी पळून गेले. प्राथमिक तपासातून हा खून एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याचे दिसत आहे. मुलीच्या नातेवाईकांकडे आम्ही चौकशी केली आहे. दीड - दोन वर्षापूर्वी देखील या मुलाने मुलीला त्रास दिला होता. तेव्हा मुलीच्या घरच्यांनी त्याला समज दिली होती. तरी त्याने आज हा प्रकार केला.''
माणुसकीला काळीमा फासणारी घटना - अजित पवार
बिबवेवाडीतील घटनेबाबत शोक व्यक्त करत ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
"बिबवेवाडीतील घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अधःपतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शान करण्यात येईल," असं देखील अजित पवार यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकींसाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद? - चित्रा वाघ
बिबवेवाडीच्या घटनेवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रोष व्यक्त केला. त्यांनी त्यांच्या ट्विट मधून राज्य सरकारवर टीका देखील केली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, 'अतिशय भयानक. काय चाललंय पुण्यात, कोयत्याने वार करुन खून. टाईप करतानाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने. कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पोलीस कायदे कागदावर. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद ?' असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.