1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (08:28 IST)

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत, मात्र गर्दी केल्यास कठोर निर्णय

Since Ganeshotsav will be celebrated simply
पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून  प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही.आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीत,मात्र नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. 
 
पुणे जिल्ह्यातील कोविड लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीने करण्यावर शासनाचा भर आहे.सामाजिक दायित्वातून क्रांतीदेवी बजाज ट्रस्टने दीड लाख लस दिली, हे कौतुकास्पद आहे.स्वयंसेवी संस्थांचे अशा कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात मोठे यश आले आहे.खाजगी संस्थांमध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढवा,असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी आपण सर्वजण गत दीड वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. महानगरासह ग्रामीण भागात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये यासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे.त्यामुळे नागरिकांनी मास्क,स्वच्छता,सुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.