राज्यात नव्याने निर्बंध लावण्याचा इशारा
रुग्णसंख्या कमी होत असताना काही ठिकाणी मात्र वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्याचे नव्याने निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे. ते पुण्यास प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात अक्षरश: कहर माजवला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश आणि दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यंदा २१ एप्रिलला देशात पहिल्यांदाच दिवसभरात तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. भारतात आढळलेली ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. धक्कादायक बाब म्हणजे या दिवसानंतर भारतात दररोज ३ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत होती. तर ६ मेपासून भारतातील दैनंदिन रुग्णसंख्येने तब्बल ४ लाखांचा टप्पा पार केला होता. मात्र १० मेपासून ही संख्या ४ लाखांच्या आत आहे. तर ८ जून रोजी दैनंदिन रुग्णवाढ ही १ लाखांच्या आत आली.
देशात मागील 24 तासांत 70,421 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,921 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 2,95,10,410 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 3,74,305 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 1,19,501 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 2,81,62,947 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 9,73,158 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.