लज्जास्पद प्रकार, कोविड सेंटरमध्ये काम करणा-या महिलेचा सहाजणांनी केला विनयंभग
पुण्यातील पिंपरीमध्ये कोविड सेंटरमध्ये काम करणा-या कर्मचारी महिलेच्या घरात घुसून सहाजणांनी धक्काबुक्की करत विनयभंग केला आहे. ”तु कोरोनाबाधित रुग्णांच्या दवाखान्यात काम करतेस, इमारतीमध्ये तु खाली वर ये-जा करायचे नाही”, अशा शब्दांत सहाजणांनी दमबाजी करत पीडितेला मुलांच्या समोर आश्लिल चाळे करत बेदम मारहाण केली. हा प्रकार 2 मे रोजी घडला होता. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी संतोष कुंभार, गणेश कुंभार, छाया कुंभार, सोनम कुंभार, आश्विनी कुंभार, सुहास कुंभार (सर्व रा. अनुराग बिल्डिंग सर्व्हे नंबर 61, अनंतनगर, साई मंदिराजवळ पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला या कोविड सेंटरमध्ये काम करतात. कामावरून सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना पाणी भरायचे होते. पाणी आहे की नाही, हे पाहण्यासाठी त्या इमारतीच्या छतावर जात होत्या. दरम्यान, छाया कुंभार यांनी त्यांना अडविले. ”तु वर कशाला चाललीस, तु कोरोना पेशंटच्या दवाखान्यात काम करते, तु वर येत जाऊ नकोस”, असे म्हणून त्यांना वर जाण्यास अटकाव केला. ”हिला खाली ढकलून द्या, हिला नवरा नसल्याने माज आला आहे. हिला दुसरा नवरा करा, तेव्हाच हिचा माज उतरेल”, असे म्हणून पीडित महिलेसोबत गैरवर्तन केले. त्यावर संतोषने ”आता हिचा माजच उतरवतो” असे म्हणत पीडितेच्या अंगावर धावून गेला. दरम्यान, स्वतःचा बचाव करण्यासाठी पीडित महिला स्वतःच्या घरात गेल्यानंतर सोनम आणि अश्विनी यांनी घरात घुसून त्यांच्याशी धक्काबुक्की केली.
पीडित महिलेची मुले टॅबमध्ये रेकॉर्ड करताना तो टॅब हिसकावून घेतला. त्यावेळी संतोषने काठीने महिलेला मारहाण केली. महिला खाली पडल्यानंतर त्यांच्या अंगावर पडून त्यांच्याशी झटापट करू लागला. दरम्यान, सर्वांनी पीडितेवर हल्ला चढवून त्यांचा विनयभंग केला.