सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (15:38 IST)

ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाची चीनमध्ये 3 हजार 245 लोकांना लागण, आकडा वाढण्याची भीती

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूनं सध्या थैमान घातलं असतानाच, चीनमध्येच नव्या संसर्गानं लोक आजारी पडत आहेत. ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाचा हा संसर्ग आहे.
 
चीनच्या उत्तर-पश्चिम भागातील गॅन्सू प्रांतातील लानजोऊ शहरात या ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाचा संसर्ग दिसून येतोय. शेकडो लोक या बॅक्टेरियामुळे आजार पडले आहेत.
 
चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं गॅन्सू प्रांताच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल विभागाच्या माहितीचा दाखल देत म्हटलंय की, ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाची आतापर्यंत जवळपास 3 हजार 245 लोकांना लागण झालीय.
 
गेल्या सोमवारी म्हणजे 14 सप्टेंबर रोजी 21 हजार लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात 4 हजार 646 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, ही संख्या आणखी जास्त असू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य लोकांमध्ये या आजाराची भीती दिसून येत आहे.
 
ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाच्या पार्श्वभूमीवर 11 सरकारी संस्थांना मोफत चाचण्या आणि उपचारासाठी हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला आहे, अशीही माहिती ग्लोबल टाइम्सनं दिलीय.
 
ब्रुसेलोसिस काय आहे आणि तो कसा पसरतो?
ब्रुसेलोसिस हा बॅक्टेरिया आहे. गाय, मेंढी, शेळ्या, डुक्कर आणि कुत्र्यांना याची मुख्यत: लागण होते. हा आजार झालेल्या प्राण्यांच्या सहवासात आलेल्या माणसांनाही हा आजार होण्याची शक्यता असते.
 
एखाद्या प्राण्याला हा आजार असेल, तर त्या प्राण्याच्या खाण्या-पिण्याच्या जागेत माणसाने श्वास घेतल्यास त्याच्या शरीरात ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाचा प्रवेश होऊ शकतो.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाग्रस्त प्राण्यांचं दूध किंवा त्यापासून बनवलेल्या पनीरमधून माणसांना त्याची लागण होऊ शकते. पण एका माणसातून दुसऱ्या माणसात होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण खूप कमी आहे.
 
जगातील अनेक देशांमध्ये हा आजार अधून-मधून डोकावत राहतो, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
 
या आजारावर उपचार आहेत. मात्र, एक-दीड वर्षे औषधं घ्यावी लागतात. उपचाराची तेवढ्या कालावधीची प्रक्रियाच असते.
 
लक्षणं काय आहेत?
ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाची लक्षणं दिसायला एका आठवड्यापासून दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. मात्र, सामान्यपणे दोन ते चार आठवड्यात लक्षणं दिसतातच.
 
ताप, घाम येणं, थकवा, भूक न लागणं, डोकं दुखणं, वजन कमी होणं आणि स्नायू दुखणं ही लक्षणं आहेत.
 
यातली काही लक्षणं मोठ्या कालावधीपर्यंत राहतात आणि काही कमी कालावधीसाठी. म्हणजे, वारंवार ताप येणं, सांधेदुखी, अंडकोश सुजणं, हृदय किंवा यकृत सुजणं, मानसिक लक्षणं, थकवा, तणाव इत्यादी.
 
अनेकदा काही लक्षणं अगदीच सौम्य असतात.
 
चीनमध्ये ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाची सुरुवात कशी झाली?
2019 च्या जुलै-ऑगस्टमध्ये एका फॅक्टरीतून झालेल्या गळतीतून या आजाराचा प्रसार चीनमध्ये झाला.
 
या बॅक्टेरियाच्या उपचारासाठी बनवण्यात येणाऱ्या ब्रुसीला लशीच्या उत्पादानात मुदत संपलेले किटकनाशकांचा वापर करण्यात आला होता. त्यातून बॅक्टेरियानं संक्रमित एरोसोल्सची हवेत गळती झाली.
 
या फॅक्टरीच्या जवळच लानजोऊ वेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्युट आहे, तिथे हवेच्या माध्यमातून लोकांना लागण झाली आणि आजाराला सुरुवात झाली.
 
चीनकडून काय पावलं उचलण्यात आली?
ANI वृत्तसंस्थेने लानजोऊ आरोग्य आयोगाचा दाखला देत माहिती दिलीय की, हा आजार पसरल्याच्या काही महिन्यांनंतर स्थानिक महापालिका अधिकारी आणि प्रांतीय अधिकाऱ्यांनी फॅक्टरीच्या गळतीबाबत चौकशी सुरू केली.
 
या वर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत फॅक्टरीचा परवाना रद्द केला. तसंच, फॅक्टरीत बनणाऱ्या एकूण सात प्राण्यांच्या औषधांची मंजुरीही रद्द करण्यात आली.
 
ANI च्या माहितीनुसार, फॅक्टरीने फेब्रुवारी महिन्यात जाहीररित्या माफी मागतिली आणि म्हटलं की, या हलगर्जीपणाला जबाबदार असणार्‍या आठ जणांना कठोर शिक्षा दिलीय.