शाळेतील एक शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह झाल्यामुळे 400 हून जास्त विद्यार्थ्यांसह कर्मचारी क्वारंटाईन
पुणे महापालिकेच्या कोंढव्यातील शाळेतील एक शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह झाल्यामुळे 400 हून जास्त विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप म्हणाले, कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्या शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांसह अन्य शिक्षक, कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून लवकरच सर्वांच्या कोरोना स्वॅब चाचण्या केल्या जाणार आहेत. तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
संत गाडगे महाराज शाळेत पाचवी ते आठवीचे वर्ग भरतात. शाळेत विविध सहा तुकड्यांमधील साडेअकराशे विद्यार्थी आणि 55 शिक्षक-इतर कर्मचारी आहेत. मात्र, शाळा सुरू झाल्यापासून केवळ सव्वाचारशे विद्यार्थी शाळेत उपस्थितीत राहात आहेत. शाळेतील वर्गखोल्यांसह इमारत आणि मैदानाचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत. गरजेनुसार शिक्षण आणि विद्यार्थ्यांची तपासणी करू. मात्र संबंधित शिक्षकाची चार दिवस सुटी होती. त्यामुळे ते कोणाच्या संपर्कात नव्हते, असे त्यांनी सांगितले.