पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये चोरी,चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला
पुण्यात घरफोडीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरात एका डॉक्टरच्या क्लिनिकचे शटर उचकटून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बिबवेवाडी,कोंढवा रोडवरील गंगाधाम चौपाटी येथे घडला आहे.
डॉ.संजय फत्तेचंद ओसवाल (वय-48 रा. ए/502,स्वयंभू हिल्स,मंजुरी,बिबवेवाडी,मार्केटयार्ड,पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मार्केटयार्ड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,डॉ. संजय ओसवाल यांचे मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौपाटी येथे क्लिनिक आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजता त्यांनी क्लिनिक बंद केले.त्यानंतरअज्ञात चोरट्याने त्यांचे क्लिनिकचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला.चोरट्यांनी क्लिनिकमधील लॅपटॉप ,चांदीचे शिक्के,मूर्ती,रोख रक्कम असा एकूण 1 लाख 50 हजार 700 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस करीत आहेत.