मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जुलै 2021 (15:58 IST)

सोशल मीडियावर हवा करण्यासाठी वाढदिवसाचा केक तलवारीने कापला, फोटो व्हायरल होताच पोलिसांनी…

पुणे जिल्ह्यात सोशल मीडियावर हवा करण्यासाठी वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याचे फोटो व्हाट्सअप वर टाकणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सहकारनगर आणि समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, धनकवडी येथील दत्तात्रय लक्ष्मण धनकवडे (वय 42) याने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापून ते फोटो व्हाट्सअप वर टाकले होते. गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना ही माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धनकवडी येथील सावरकर चौक येथून त्याला अटक केली. पंचा समक्ष त्याची झडती घेतली असता शर्टच्या आत लपवून ठेवलेली तलवार पोलिसांना आढळली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.
 
दुसऱ्या एका घटनेत रेम्बो चाकूने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या टिपू उर्फ सलमान इम्तियाज शेख (वय 30) याला पोलिसांनी अटक केली. आरोपी टिपूने स्वतःच्या वाढदिवसाचे फोटो रेम्बो चाकूने कापून ते व्हाट्सअप वर पाठवले होते. तोच चाकू घेऊन टिपू मंगळवार पेठेतील सार्वजनिक रस्त्यावर उभा असल्याची माहिती पोलिस कर्मचारी इम्रान शेख यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील चाकू जप्त केला आहे. समर्थ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सध्या या काही गुन्हेगार आणि तरुण रात्रीच्या वेळी चौकाचौकांमध्ये गर्दी करून वाढदिवस साजरा करतात. दहशत निर्माण करण्यासाठी ते वाढदिवसाचा केक तलवार कोयता यासारख्या बेकायदेशीर हत्याराने कापतात. अशा घटना टाळण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशाप्रकारे सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करणार यावर यापुढे पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.