गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (20:03 IST)

नाशिक-पुणे महामार्गावर दाट धुक्यामुळे भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार

पुणे  :- आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
 
तिघा जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. क्रुझर गाडीने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. मृत हे एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पंकज खंडू जगताप (वय 36), मधुकर तुकाराम अहिरे (वय 52), शांताराम संभाजी आहिरे (वय 50) सर्व रा. जायखेडा ता. सटाणा अशी मृतांची नावे आहेत.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, मंचरजवळ भल्या पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना क्रुझरने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की क्रुझरच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दाट धुके असल्याने समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे क्रुझरमध्ये असलेल्या तिघांचा गाडीत अडकून जागेवरच मृत्यू झाला आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

Edited by -Ratnadeep Ranshoor