शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (08:46 IST)

पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार

पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा संकल्प असून त्यासाठी सर्वांना बरोबर घेत शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
 
खराडी येथे ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते.
 
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा आणि  लसीकरणाचा प्रयत्न केला. दोन वर्षात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले. शासनाच्या प्रयत्नांमुळे राज्य ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पार्क नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या प्रकल्पाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
ऑक्सिजन पार्क उपयुक्त ठरणार
 
पवार पुढे म्हणाले, या प्रकल्पावर साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सर्व वयोगटासाठी उपयुक्त ठरावा अशी याची रचना असणार आहे. त्यात ओपन थिएटर, जिम, मुलांसाठी अभ्यासिका, सायकल ट्रॅक, बालकांसाठी खेळाची जागा आदी अनेक सुविधा परदेशातील सुविधांच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. कडुनिंब, अशोका आदी झाडांसह अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने घोषित केलेली सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे या पार्कमध्ये लावण्यात येणार आहेत. या पार्कसोबत विविध प्रकारची झाडे लावून टेकड्या हिरव्यागार करण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या माध्यमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अर्थसंकल्पात पंचसूत्रीच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.
 
पायाभूत सुविधांच्या विकासाला गती
पुढील ३ वर्षात राज्यात सर्व सुविधांच्या निर्मितीसाठी ४ लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.  पुण्यात सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचार सुविधा असलेली देशातील पहिली मोठी ‘मेडिसिटी’ वसाहत उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे मेट्रोसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रिंग रोडच्या भूमी संपादनासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीं आहे. पुणे- नाशिक सेमी- हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर १६ हजार कोटी रूपये खर्च होणार आहे . मेट्रोची कामे करताना नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.