मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 1 जानेवारी 2024 (17:25 IST)

मराठवाड्यातले विद्यार्थी पुण्यात शिकायला का येतात?

- प्राची कुलकर्णी
मराठवाडा-विदर्भातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बीबीसी मराठीने एक बातमी केली होती. त्यावर बीबीसी मराठीकडे अनेक प्रतिक्रिया आल्या.
 
या बातमीमुळे विद्यार्थ्यांच्या समस्या समजल्या असं काही जण म्हणाले, काही जणांनी असा प्रश्न विचारला की तालुका आणि जिल्ह्याला महाविद्यालय असताना मग ही मुलं-मुली पुण्यात का येतात? अनेकांना हे समजून घ्यावंसं वाटत होतं. त्यानंतर बीबीसी मराठीने या विषयावरही बातमी करण्याचा निर्णय घेतला.
 
आपलं गाव सोडून पुण्याला शिक्षणासाठी येण्यामागे विद्यार्थ्यांची काय भूमिका असते, त्यांची परिस्थिती काय असते? हे समजून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने या बातमीतून केला आहे.
 
26 वर्षांची रत्नमाला पवारचं शालेय शिक्षण सुरू असतानाच तिचं संपूर्ण कुटुंब तुळजापूरमधून पुण्यात रहायला आलं.
 
बहिणीला इंजिनीअरिंगचं शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासाठी तिच्या कुटुंबाला योग्य पर्याय वाटला होता तो अर्थातच पुण्यात येण्याचा.
 
खरंतर तिच्या पालकांकडे त्यांच्या गावी सांगवी मार्डीला 2 एकर शेतजमीन आहे. पाण्याचाही प्रश्न नाही. पण ती 2-3 एकरची जमीन पडिक ठेवून संपूर्ण कुटुंब पुण्यात स्थायिक झालं आहे.
 
रत्नमालाची आई पार्वती पवार या मिळेल ती वेगवेगळी कामं करतात आणि त्याच्या जोरावर रत्नमाला आणि तिच्या भावंडांचं शिक्षण होतं.
 
मुलांचं शिक्षण हे पार्वती पवार यांच्यासाठी कायमच प्राधान्याने होतं.
 
पार्वती पवार जेव्हा इयत्ता चौथीत शिकत होत्या तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर 7 वी पर्यंत शिकण्याची संधी त्यांना मिळाली. पण त्यानंतर मोठी मुलगी घराबाहेर पाठवायची नाही म्हणून त्यांचं शिक्षण थांबवण्यात आलं.
 
यामुळेच त्यांची जिद्द होती आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती मुलांच्या वाट्याला येऊ नये.
 
बीबीसी मराठीशी बोलताना पार्वती पवार म्हणाल्या, “गावात शिक्षणाची सोय नाही. गावापासून 7-8 किलोमीटरवर शाळा होती. पण ती सुद्धा 7वी पर्यंत.
 
"अशात मुलींना शिक्षण कसं द्यायचं हा प्रश्न होता. पुण्याबद्दल कायम ऐकलं होतं. इथं मुलांचं शिक्षण होईल आणि आपल्याला काम मिळेल याचा आत्मविश्वास होता.
 
"म्हणून मग मुलांना घेऊन घराबाहेर पाठवायचं ठरवलं. त्यातच मुलांना वेगवेगळं काही शिकायची इच्छा होती. मराठवाड्यात एका ठिकाणी शिक्षणाची सोय झाली नसती. पुण्यात सोय आणि काम दोन्हीचा प्रश्न सुटणार होता. त्यामुळे पुण्याची निवड केली."
 
पुण्यात आल्यानंतर पहिले 2 महिने त्यांनी फक्त कामाची शोधाशोध करण्यात घालवले. मग पुण्यातल्या भारती विद्यापीठातच स्वीपर म्हणून नोकरी मिळाली. ती करुन उरलेल्या वेळात त्या इतर कामं करायच्या. यातून कुटुंबाचा चरितार्थ भागत होता.
 
त्यांच्या मुलीने म्हणजेच रत्नमालाने आता एमएसडबल्यू पूर्ण केलं आहे आणि सरकारी नोकरीसाठी असलेल्या परीक्षा देत आहे.
 
पुण्याच्या निवडीबद्दल रत्नमाला म्हणते, "चांगलं शिक्षण मिळण्याचं आई वडिलांचं स्वप्न होतं. आणि बहिणीच्या शिक्षणाच्या निमित्ताने सगळेच पुण्यात आले. त्यामुळे संधी कळल्या. त्यामुळे एमएसडब्ल्यूचं शिक्षण घेऊ शकले.”
 
रत्नमालाचं कुटुंब पुण्याला आलं आणि तिला मार्ग सापडला.
 
पण धाराशीवच्या उमेश पाटोळेने मात्र धडपडत मार्ग शोधला. आई-वडील ऊसतोड कामगार म्हणून काम करत असलेल्या उमेशने पाचवीपर्यंतचं शिक्षण गावातल्या शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली. नवोदयमधून शिकत असतानाच पुढे काय असा प्रश्न खुणावत असताना त्याने निवड केली ती पुण्याची.
 
उमेश सांगतो, "पुण्यात शिक्षण चांगलं आहे. तेव्हा शिष्यवृत्ती मिळेल असंही वाटलं होतं. पण कोरोनामुळे शिष्यवृती मिळू शकली नाही.
 
"कमवा शिकाच्या माध्यमातून शिक्षण सुरू केलं. पुण्यात आल्यावर शिक्षणाबरोबरच मिळणारं एक्सपोजर, आणि इथं इंडस्ट्री असल्याने मिळणाऱ्या संधी मला महत्त्वाच्या वाटल्या."
 
"गावाकडे माझ्या वर्गात असलेल्या 50 मुलांपैकी फक्त 10-15 जणांचं शिक्षण सुरू आहे. मुलींचं शिक्षण कधीच सुटलं. आणि शिकणाऱ्या मुलांपैकी अगदी थोडेच जण शिकायला कॅालेजला जातात,” उमेश सांगतो.
 
रत्नमाला आणि उमेश मराठवाड्यातून पुण्यात शिक्षणासाठी दरवर्षी दाखल होणाऱ्या 20 ते 25 हजार मुलांची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
 
पुणे का याची उत्तरं यातल्या प्रत्येक जणच अगदी दोन शब्दात देतो- 'शिक्षण' आणि 'संधी.'