मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (16:38 IST)

जागतिक पोहे दिन : इंजिनीयर तरुणांनी पोहे विक्रीतून असं उभं केलं स्वत:चं बिझनेस मॉडेल

राहुल गायकवाड
आज (7 जून) जागतिक पोहे दिन. नाश्त्याला काही नाही मिळालं तर सगळ्यांच्या आवडीचा आणि सहज तयार होणारा पदार्थ म्हणजे पोहे.
 
पोहे आवडत नाही अशी व्यक्ती अपवादानेच असेल. त्यातही वेगवेगळ्या भागामध्ये हे पोहे तयार करण्याची पद्धतही वेगळी आहे. त्यामुळे या पोह्यांना सगळीकडूनच स्वीकृती मिळाली. याच पोह्याचं महत्त्व ओळखून आयटी इंजिनिअर तरुणांनी पोह्याचा व्यवसाय करायचं ठरवलं.
 
संकेत, तुषार, सुरज, मेघराज, महेश, प्रितम या सहा मित्रांनी यासाठीचा व्यवसाय सुरू केला. हे सर्व जण आयटी इंजिनिअर. पुण्यात एकत्र राहायचे. आपला काहीतरी स्टार्टअप असावा अशी त्यांची इच्छा होती. कुठला व्यवसाय करायचा याबाबत सगळ्यांचाच खल चालू होता.
 
काही छोटे मोठे व्यवसाय सुरू करुन पाहिलं, पण हवं तसं यश मिळालं नाही. कामानिमित्त पुण्यात असल्याने त्यांचा बाहेर नाश्ता व्हायचा. त्यातही पोहे नेहमीच असायचे, मग यातूनच आपण पोह्यांचाच व्यवसाय का करू नये, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. मग नुसते पोहे द्यायचे असेल तर त्यात सर्व प्रकारचे पोहे असायला हवेत असं त्यांनी ठरवलं.
ज्याप्रमाणे पिझ्झा, बर्गर यांचे ब्रॅण्ड आहेत तसा पोह्यांचा देखील ब्रॅण्ड करायचा त्यांनी ठरवलं. त्यातूनच त्यांनी त्यांच्या हॉटेलची रचना आणि इंटिरिअर देखील केलं.
 
तुषारची बहिणी दर्शना एक स्टार्टअपची स्पर्धा जिंकली होती. तिने या सगळ्यांना मदत केली. तिने पोह्यांची चव डेव्हलप करून दिली. मग कुठल्या पोह्यासाठी किती मात्रा असायला हवी याचं प्रमाण ठरवण्यात आलं त्यामुळे पोह्याच्या चवीत बदल झाला नाही. आणि जन्म झाला 'आम्ही पोहेकर'चा
आम्ही पोहेकर'च्या संकल्पनेविषयी बोलताना संकेत शिंदे म्हणाला, "आम्ही पुण्यात बॅचलर रहायचो. नाश्त्यासाठी बाहेर पडलो की हमखास पोहेच असायचे. पण हेच पोहे संध्याकाळी हवे असतील तर मिळायचे नाहीत. मग आम्हाला वाटलं की पोहे दिवसभर मिळाले तर किती छान होईल.
 
त्यातच नुसचे एकाच प्रकारचे पोहे न ठेवता भारतातले विविध प्रकारचे पोहे ठेवण्याचं आम्ही ठरवलं. मग यातही आपलं काहीतरी इनोव्हेशन असावं म्हणून आम्ही पोह्याची भेळ, पोह्याचे बर्गर, पोह्याचा दहीतडका, पोह्याची मिसळ, पोहे चीझ बॉल असे विविध 15 प्रकार लॉन्च केले."
 
स्नॅक्स सेंटर सुरू कारयचं तर त्यासाठी भांडवल हवं होतं. मग या नव्या स्टार्टअपसाठी कर्ज काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कर्ज मिळालं पण जागा सुद्धा अशी असावी की तिथे ही संकल्पना यशस्वी ठरेल.
 
पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांचं हब म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ. याच भागात दुकान सुरू करायचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी शोधाशोध सुरू केली आणि त्यांना नारायण पेठेत ठिकाण मिळालं.
लोकांची आवड पाहून स्टार्टअप सुरू केलं तर त्याला यश मिळतंच, असं संकेतला वाटतं. त्यातही सुरू केलेल्या व्यवसायामध्ये सातत्य आणि कष्ट हेही महत्त्वाचे असल्याचं तो सांगतो.
 
पोह्यांची क्वालिटी सारखी रहावी यासाठी प्रत्येक प्रकारचे पोहे तयार करण्याचं प्रमाण देखील त्यांनी ठरवलंय. त्याचा फायदा चव कायम ठेवायला झाला. आता तर यासाठीचं मशीन देखील त्यांच्याकडून तयार करण्यात येत आहे. जेणेकरुन मशीनच प्रमाण ठरवेल आणि चव तशीच राहील.
 
नुसता पोह्याचा कुठे व्यवसाय असतो का, असं अनेकांनी या तरुणांना हिणवलं देखील. पण, हाच व्यवसाय करायचा त्यांनी मनाशी पक्क केलं होतं.
 
याचा परिणाम असा झाला की आता विविध भागांमधून या पोह्यांचा अस्वाद घेण्यासाठी लोक येत आहेत. त्यांचा व्यवसाय देखील विस्तारतोय. संध्याकाळी सुद्धा पोहे मिळायला हवेत या साध्या विचारातून पोह्याच्या या यशस्वी स्टार्टअपची सुरुवात झाली.
 
लॉकडाऊनचा फटका
संकेत आणि त्यांच्या मित्रांनी सुरू केलेल्या स्टार्टअपच्या आतापर्यंत 14 शाखा स्थापन झाल्या आहेत.
 
लॉकडाऊनच्या काळात व्यवसायाला फटका बसल्याचं तो सांगतो.
 
तो म्हणाला, "पहिल्या लॉकडाऊनपूर्वी दररोज 1 हजार प्लेट पोहे विकले जायचे. पण लॉकडाऊन लागलं आणि शाळा , कॉलेजेस बंद झाले. आमचे आऊटलेट याच भागात असल्यानं आम्हाला याचा फटका बसला. बिझनेस 31 टक्क्यांवर आला. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पार्सल सुविधा सुरू असल्यानं आता बिझनेस 50 टक्क्यांवर आला आहे. "
 
असं असलं तरी बर्गर, पिझ्झा सारखं पोह्याला देखील वेगळ्या उंचीवर घेऊन जायचंय, असा ठाम विश्वास संकेत व्यक्त करतो.