मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , सोमवार, 24 मे 2021 (15:59 IST)

चिंताजनक! पुणे जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ४६३ रूग्ण

पिंपरी-चिंचवड शहरांमधील करोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहरासह जिल्ह्य़ात ४३ विविध रुग्णालयांमध्ये तब्बल ४६१ काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शनिवारी सांगण्यात आले. करोना संसर्गातून बरे झालेल्यांना काळी बुरशीची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
सध्या पुण्यात ३७३, पिंपरी-चिंचवडमध्ये ७८ आणि ग्रामीण भागात १२ अशा एकू ण ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १३ मेपासून आतापर्यंत तब्बल १७२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आजारावरील उपचारामध्ये बुरशीविरोधी औषधे हा महत्त्वाचा भाग असून त्याची टंचाई आहे. त्यासाठी राज्य शासनाने एक लाख ९१ हजार इंजेक्शन खरेदी करण्याचा कार्यादेश दिला आहे. तत्पूर्वी पुण्यातील रुग्णसंख्येनुसार आणि रुग्णालयांच्या मागणीनुसार औषधे, इंजेक्शनची मागणी जिल्हा प्रशासनाने नोंदवली आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.
 
४३ रुग्णालयांमध्ये उपचार सुरू औषधे, इंजेक्शनचा पुरवठा
या आजाराची औषधे महाग असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणेच म्युकरमायकोसिसच्या औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी स्तरावरून औषधांचे वाटप सुरू आहे. त्यानुसार लिपोसोमल अम्फोरटेरिसीन बी ५० एमजी इंजेक्शनच्या २६० कु प्या, इझावुकोनाझोल ३७२ एमजी इंजेक्शनच्या २५ कुप्या, पोसाकोनाझोल गोळ्या १२५ पट्टय़ांचे वाटप शनिवारी रुग्णालयांना करण्यात आले, असेही देशमुख यांनी सांगितले.