रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राज्यसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (13:06 IST)

भाजपकडून पंकजा मुंडेंऐवजी उमा खापरेंना संधी, विधान परिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर

pankaja munde
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून पाच जागा लढवल्या जाणार आहेत.
 
या जागांसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र पंकजांऐवजी उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.
 
पिंपरी चिंचवड महापालिकेत उमा खापरे यांनी नगरसेविका म्हणून काम केलं होतं. 2001-2002 या काळात उमा खापरे पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेत्याही होत्या.
 
पंकजा मुंडे यांच्या नावासोबतच चित्रा वाघ यांच्या नावाचीही विधान परिषदेसाठी चर्चा सुरू होती.
 
"20 जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या जागांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या पाच उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे," अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
पंकजा मुंडेंच्या उमेदवारीबद्दल विचारले असताना पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला होता, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
 
पाटील यांनी म्हटलं की, "ज्यांची तिकिट मिळावी अशी इच्छा असते ते त्यांचा अर्ज पक्षाकडे देतात. त्यानंतर हे अर्ज केंद्राकडे पाठवले जातात. त्यावर केंद्राकडून निर्णय होतो. पंकजा मुंडे यांच्या बाबात केंद्राचा आणखी काही विचार असावा. राजकारणात कधीच पूर्णविराम नसतो. स्वल्पविराम असतो. त्यामुळे तिथून पुढचं राजकारण सुरू होतं."