बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. मुस्लिम
  3. रमझान
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (17:55 IST)

नात्यात गोडवा असावा

उचित नातेसंबंध माणसाचे जीवन सुसह्य करतात. संबंधातूनच नाती निर्माण होतात. त्याला पर्याय नसतो. म्हणून ती तोडायची नसतात तर जोडायची असतात. नात्यात दुरावा निर्माण होऊ न देता त्यात  गोडवा कसा आणता येईल, याचा विचार करावा. नात्याचे पदर नाजूक असतात ते हळुवारपणेच हाताळले पाहिजेत. नात्यांची वीण घट्ट असली पाहिजे. ती कधीच सैलसर होता कामा नये. मानवी नातेसंबंध कसे जपावेत त्याचा इस्लामने तर वस्तुपाठच ठेवला आहे. नातेवाइकांना कधीच कमी लेखू नका, त्यांना नाराज करू नका. नाती-गोती, सगेसोरे, पै-पाहुणे यांचे सतत भान ठेवा.
 
आपल्या घरी आल्यानंतर हसतुखाने त्यांचे स्वागत करा, त्यांना खाऊ, पिऊ घालूनच त्यांची सन्मानाने पाठवणी करा. त्यांच्याविषयी मनात कटुता बाळगू नका. रमजानमध्ये जकात प्रदान करताना नात्यातील दुर्बलांना, निर्धनांना अग्रक्रम देण्याचा सल्ला कुरआनच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आपसातील  भांडणतंटे, वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणार्यांना माणुसकीची शिकवण दिली. सुख-दुःख, हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. यावरून नात्यांचे महत्व लक्षात येते. 
 
आपल्या जगण्याला नात्यांचा मोठा आधार असतो. संकटाच्या काळात कळते की त्यांची साथ किती मोलाची आहे. एरवी ही गोष्ट माणसांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ती गोत्यात येतात. रमजान तर शत्रूशीही न्रमतेने बोलण्याचा संदेश देतो. नाती केवळ रक्ताची असतात असे नाही मानलेली नातीही तितकीच महत्त्वाची असतात. ईश्वरभक्ती केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे, हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्याप्रतिही तुमची काही कर्तव्ये आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. आता रमजान महिन्याचेच पाहाना, सगळेच उपवासधारक नमाज पढण्यासाठी दिवसातून पाच वेळा मशिदीत एकत्र येतात. संध्याकाळी कोणी फळे आणतो, कोणी खजूर आणतो, कोणी आणखीन काही. एकमेकांची देवाणघेवाण होते. सामुदायिकरीत्या उपवास सोडतात. रोजच्या सहवासाने, सानिध्याने ओळख वाढत जाते. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. यातूनच मित्रत्वाचे नाते निर्माण होते. बंदे परस्परांना स्मरणात  ठेवतात. भेट झाली की शुद्ध अंतःकरणाने आपुलकीने बोलतात. याचा अर्थ असा की, रमजान महिना आपल्याला इबादती बरोबर मैत्रीच्या नात्यांचे दालन खुले करून देतो. मना-मनांना जोडण्याचे, नाते निर्माण करण्याचे कार्य रमजान करत असतो. म्हणूनच नात्यात कधीच अंतर येऊ द्यायचे नसते. खंड पडू द्यायचा नसतो. वागण-बोलण्यात तफावत नसावी. त्यात स्वच्छता आणि पारदर्शकता असावी. शब्दातील आश्वासकता प्रत्येक नात्याला सुखावणारी असते. प्रत्येकाने नात्याचा सन्मान केला पाहिजे, हा रमजानचा संदेश आहे. पण उपवास सोडणसाठी अथवा नमाज पढण्याकरिता कुणीही मशिदीत जाऊ नये. या गोष्टी वैयक्तिक पातळीवर घरातल्या घरात कराव्यात.
बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)