गोदामाई कोपली (स्लाईड शो)
रामघाट पाण्याखालीदोन दिवसांपासून झालेली संततधार आणि गंगापूर धरणातून सोडलेला विसर्ग यामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापूर आला. १९६९ मध्ये आलेल्या पुरापेक्षाही गोदेचे हे रूप भयंकर होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रौद्ररूप धारण केलेल्या गोदेने आजूबाजूचा परिसर गिळंकृत केला. गोदेच्या या पुरामुळे धार्मिक महत्त्व असलेला पंचवटीतील रामघाटही पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. या घाटावरील सर्व मंदिरेही पाण्यात बुडाली होती. परिणामी श्राद्धादी विधी थंडावले.
कोपलेली गोदामाई हा नाशिकचा अहिल्याबाई होळकर पूल. ब्रिटिशांनी बांधलेला. पूर्वीचा व्हिक्टोरीया ब्रिज. या पुलाच्या पलीकडेच प्रसिद्ध पंचवटी भाग आहे. या पुलाच्या खाली गोदेचे पाणी टेकले होते. शहरातील बाकीच्या जवळपास सर्व पुलांवरून पाणी वाहत होते. त्यामुळे एकटा हा पूल वाहतुकीसाठी खुला होता. या पुलावरून पुराचे रूप धडकी भरविणारे होते. तरीही नित्यवर्षाप्रमाणे नाशिककरांनी हे रूप डोळ्यात साठविण्यासाठी गर्दी केली होती.
नारोशंकराच्या घंटेला पाणीबाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईच्या किल्ल्यातून आणलेली घंट रामघाटावरील प्रसिद्ध नारोशंकराच्या मंदिरावर बसवलेली आहे. ही घंटाही पाण्यात बुडाली. ही घंटा पाण्यात बुडणे म्हणजे पुराचा कहर असे मानले जाते. या मंदिराच्या आसपास असलेली इतर मंदिरेही पाण्यात बुडाली होती. प्रसिद्ध कपालेश्वर मंदिराच्या पायर्याही पाण्यात बुडाल्या होत्या. या परिसरात राहणार्या साधूंनाही स्थलांतरीत व्हावे लागले.