1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2016 (15:34 IST)

दहावीच्या प्रमाणपत्रावर जन्मतारीख व जन्मठिकाणाची नोंद

माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याच्या जन्मतारखेबरोबरच आता जन्मठिकाणाचाही नोंद केली जाणार आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील आदेश दिला आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१७ पासून घेण्यात येणार्‍या परीक्षा प्रमाणपत्रावर हा बदल दिसणार आहे. 
 
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर विद्यार्थ्याचा जन्मदिनांक व जन्मठिकाणाची नोंद असते. या दाखल्यावरील जन्मठिकाणाची नोंद विविध बाबींकरिता ग्राह्य धरली जाते. विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट आदी बाबी मिळविण्यासाठी जन्मदिनांक व जन्मठिकाणाची खातरजमा करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्याकडून शाळा सोडल्याच्या दाखल्याची मूळ प्रत संबंधित यंत्रणेकडून मागविली जाते. दुसरीकडे अकरावीमध्ये अथवा अन्य अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांस मूळ शाळा सोडल्याचा दाखला संबंधित महाविद्यालयात अथवा संस्थेत जमा करावा लागतो. हा शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यास महाविद्यालय अथवा संबंधित संस्थेकडून परत दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्याना अनके समस्यांना सामोरे जावे लागते.  त्यामुळे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रावरच आता जन्मतारखेबरोबरच जन्मठिकाणही नमूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.