दारू कारखान्याच्या पाण्यात 50 टक्के कपात
औरंगाबाद- मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दारू कारखान्याच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, आजपासून 50 टक्के आणि 10 मे पासून 60 टक्के पाणी कपात केली जाण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त 13 जिल्ह्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे.
मराठवाडय़ातील दारू निङ्र्किती कारखान्याना सध्या 20 टक्के पाणीकपात लागू आहे. न्यायालयाने ही मर्यादा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. दारू कारखान्यांशिवाय अन्य कारखान्याना होणार्या पाणीपुरवठय़ात सध्या 20 टक्के आणि 20 मे नंतर 25 टक्के करण्यात येणार आहे. या कपातीमुळे वाचणारे पाणी नागरिकांना पिण्यासाठी देण्यात यावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
जायकवाडी धरणात सध्या केवळ 21 टीएमसी पाणी असून ते आणखी सुमारे 100 दिवस पुरेल असे सांगितले जाते. 21 टीएमसीपैकी पिण्यासाठी व उद्योगांसाठी 9 टीएमसी पाणी लागणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरीही खबरदारीची उपाययोजना म्हणून याआधीच पाणीकपात करण्यात आली होती. त्याचबरोबर अतिरिक्त 20 टक्के पाणीकपात करण्यात आलेली होती.