शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सातारा , मंगळवार, 10 मे 2016 (11:02 IST)

भुजबळांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सत्तेचा गैरवापर करुन अटक करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला सातार्‍यात दिला.
 
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी संपत्तीप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्याच्या आरोपाखाली भुजबळ सध्या जेलमध्ये आहे. राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेते भुजबळ यांना अटक करण्यात आल्याने ही कारवाई म्हणजे सुडाची कारवाई आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यापासून जेलमध्ये असलेल्या भुजबळावर कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर करून केली आहे असे सांगतानाच शरद पवार म्हणाले की, भुजबळांनी काही चुकीचे केले असेल तर त्याची किंमत त्यांना मोजू द्या परंतु त्यांनी काहीच चूक केली नसेल तर त्यांच्या अटकेची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा पवार यांनी दिला. 
 
भुजबळ यांना अटक केल्याने त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण सुद्धा पवार यांनी येथे बोलताना दिले. दरम्यान, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल्या भुजबळ यांचा दाढी वाढवलेला चेहरा पाहून अनेकांना का बसला होता. भुजबळांच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चाही खूप झाली होती.