1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 ऑगस्ट 2023 (20:17 IST)

तब्बल 6 किमी डोंगराळ पायवाटेने गर्भवतीला 3 महिलांनी डोलीतून नेले दवाखान्यात

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथील गर्भवती महिलेला रस्त्याअभावी दवाखान्यात पोहोचूनही प्राण गमवावा लागला, या घटनेला 15 दिवस झाले. तोच पुन्हा एकदा तब्बल 6 किमी डोंगराळ पायवाटेने गर्भवतीला 3 महिलांनी डोलीतून दवाखान्यात नेल्याची घटना घडली. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या अतिदुर्गम भागात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही रस्त्यांची समस्या आदिवासी नागरिकांच्या मुळावर उठली आहे.
 
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराय किल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपाडा येथे रस्त्याची सोय नसल्याने चक्क सहा किलोमीटर डोलीमध्ये टाकून गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आशासेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोहोचवल्याची घटना घडली आहे. डोंगराळ भाग असल्याने अनेक अडचणी आल्या असल्या, तरी महिलांनी त्यावर मात केली. संबंधित गरोदर महिलेचा जीव वाचला असून बाळसुद्धा सुरक्षित आहे. प्रशासनाला त्यांचे वाभाडे निघण्यापासून आशासेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वाचविले आहे.
 
खैराय किल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपाडा वस्तीची लोकसंख्या अवघी 150 आहे. येथे सरला ज्ञानेश्वर बाम्हणे (वय 20) ही आठ महिन्यांची गर्भवती महिला आहे. 14 ऑगस्टला अचानक तिचे पोट दुखायला लागले. याबाबत आशासेविका मंगल अंबादास सुबर, अंगणवाडी सेविका भारती रामदास गावित, मदतनीस तुळसा भगवान सापटे यांना माहिती समजली. वस्तीपासून ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर 6 किलोमीटर आणि डोंगराळ आहे.
 
रस्त्याची सोय नसल्याने पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तातडीने महिलेवर उपचार व्हावेत, यासाठी तिन्ही महिलांनी दोन लाकडाला डोली बांधून त्यामध्ये गर्भवती महिला नेण्याचा एकमुखी निर्णय घेतला. डोंगरी भागातील सहा किलोमीटर पायवाटेची पायपीट करून तिघी महिलांनी सदर मातेला आरोग्य केंद्रात दाखल केले.
 
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या वेळी ही महिला प्रसूत झाली. माता आणि बाळ दोन्ही सुरक्षित आहेत. आशासेविका मंगल अंबादास सुबर, अंगणवाडी सेविका भारती रामदास गावित, मदतनीस तुळसा भगवान सापटे यांच्या प्रयत्नांमुळे महिला आणि बाळ या दोघांचेही जीव वाचले आहेत.