बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (21:08 IST)

राज्यातील चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी नाशिकमध्ये केंद्र उभारणार -खासदार हेमंत गोडसे

राज्यातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच इंधनाची बचत व्हावी यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेत विशेष धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामी केंद्रीय रस्ते , वाहतुक व महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार राज्यातील तेल इंडस्ट्रीने पुढाकार घेतला आहे. राज्यभरातील चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक येथे विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. सदर प्रशिक्षण केंद्रासाठी इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव किंवा पाडळी – देशमुख शिवारातील जागा निश्चित होण्याच्या मार्गावर आहे.

प्रशिक्षण केंद्राची उभारणी झाल्यानंतर राज्यातील प्रशिक्षित चालकांकडून अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होणार असून इंधनाचीही बचत होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
 
राज्यात मोठया प्रमाणावर अपघात होत असल्याने रोज शेकडो प्रवाशांचा हकनाक बळी जात असून शेकडो प्रवाशांचे वाट्याला कायमचेच अपंगत्व येत आहे. याबरोबरच चालकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने रोज लाखो लिटर इंधनही वाया जात आहे. यावर ठोस असा मार्ग काढावा यासाठी खा.गोडसे यांचा नामदार नितीन गडकरी यांच्याकडे सततचा पाठपुरावा सुरू होता. राज्यातील चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावेत असे आदेश केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.
 
प्रशिक्षण केंद्र उभारण्याची जबाबदारी भारत पेट्रोलियम कंपनीला दिली असून नागपूर येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहेत. आता नाशिक जवळील इगतपुरी तालुक्यात प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.पाडळी- देशमुख किंवा मुंडेगाव शिवारात प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चीत होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी सुमारे १५ एकर शासकीय जागा लागणार असून २० कोटी रूपयांचा निधी खर्च होणार आहे. राज्यभरातील विविध वाहनांवरील चालकांना या केंद्रातून अपघात टाळणे, इंधन बचतीचे धडे आणि प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहीती खा. गोडसे यांनी दिलेली आहे.